हजारो नवमतदारांनी दिले मतदान करण्याचे वचन; मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून दिला प्रतिसाद

By आनंद डेकाटे | Published: April 5, 2024 06:01 PM2024-04-05T18:01:37+5:302024-04-05T18:01:59+5:30

युवकांच्या या जोशपूर्ण सकारात्मक सहभागाने सुरेश भट सभागृह निनादून गेले.

Thousands of new voters pledged to vote | हजारो नवमतदारांनी दिले मतदान करण्याचे वचन; मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून दिला प्रतिसाद

हजारो नवमतदारांनी दिले मतदान करण्याचे वचन; मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून दिला प्रतिसाद

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास उत्सुक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कर्तव्यासाठी साद घातली. त्यांनी केलेल्या आवाहनाला नव मतदारांनी एका हातात मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून मतदान करण्याचे वचन दिले. युवकांच्या या जोशपूर्ण सकारात्मक सहभागाने सुरेश भट सभागृह निनादून गेले.

ल्हा निवडणूक कार्यालय, महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सुरेश भट सभागृहात युवा मतदार जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. विपीन इटनकर, सौम्या शर्मा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, मनपाचे सहायक आयुक्त् महेश धनेचा, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने ‘मिशन युवा’ यशस्वीपणे राबवून १७ ते १९ वयोगटातील दीड लाख मतदारांची नोंदणी केली असून जिल्ह्यात ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून आखलेले ‘मिशन डिस्टींक्शन’ यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी निवडणूक व मतदानासंबंधीची बारीक सारीक माहितीही सादर करण्यात आली.
खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये रोप्य पदक पटकविणारी ॲथलिट्स नेहा ढबाले हीने उपस्थितांना मतदानात सहभागी होण्याची प्रतिज्ञा दिली.

मॅट्रीस वॉरियर्सच्यावतीने ‘एक वोटसे क्या फरक पडता है’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘अधिकार है’ या ध्वनीचित्रफितीचा टिझर तसेच भारत निवडणूक आयोगाकडून मतदार जागरुकतेसाठी तयार करण्यात आलेले ‘मै भारत हू, भारत है मुझमे....’ हे विशेष गीत यावेळी प्रदर्शीत करण्यात आले.

Web Title: Thousands of new voters pledged to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.