टागोरांनी भारतीय साहित्याला नवे आयाम दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:03 AM2019-05-13T11:03:21+5:302019-05-13T11:03:48+5:30

रवींद्रनाथ टागोरांचे मानवतेवर प्रेम होते. देशप्रेम या भावनेपेक्षा मानवतेची भावनाच सर्वात मोठी असल्याबद्दल म. गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती.

Tagore gave new dimension to Indian literature | टागोरांनी भारतीय साहित्याला नवे आयाम दिले

टागोरांनी भारतीय साहित्याला नवे आयाम दिले

Next
ठळक मुद्दे वि. सा. संघातर्फे टागोर जयंतीवर विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रवींद्रनाथ टागोरांचे मानवतेवर प्रेम होते. देशप्रेम या भावनेपेक्षा मानवतेची भावनाच सर्वात मोठी असल्याबद्दल म. गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. मराठीतील महेश एलकुंचवार, कवी ग्रेस आदी अनेक लेखक त्यांच्यावर प्रेम करतात. येथे कधीच भाषेची अडचण आली नाही. भाषेच्या पलिकडे भावनांची भाषा बोलणारे कलावंत होते. त्यांनी बंगाली साहित्यालाच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्याला नवे आयाम दिले, असे मत सुपंथ भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघातर्फे रवींद्रनाथ टागोर यांच्या १५८ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यावर भाष्य करणाऱ्या ‘मोने रेखो’या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी वि. सा. संघाच्या ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी मृणालिनी केळकर, सुपंथ भट्टाचार्य, मंदिरा गांगुली आणि माधवी भट यांनी भाष्य केले. भट्टाचार्य म्हणाले, बंगालमध्ये लघुकथा नव्हती पण रवींद्रनाथांनी ती आणली. रवींद्रनाथ टागोर बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. कविता, संगीत, समालोचन, लेखन, कथा, चित्रकला अशा बहुविध कलाप्रांतात यशस्वी मुशाफिरी करणारे होते. त्यामुळेच माणसांमध्ये परस्परांमध्ये प्रेम आहे तोपर्यंत टागोर जिवंत राहतील, असे गौरवोद््गार त्यांनी काढले.
मंदिरा गांगुली यांनी निसर्ग आणि रवींद्रनाथ विषयावर प्रकाश टाकला. रवींद्रनाथ १२ वर्षे लोकांपासून दूर एका बंगल्यात राहिले. त्या बंगल्याच्या खिडकीतून त्यांना नेहमी निसर्ग खुणावायचा. आपण चार वर्ण मानतो ते वर्ण त्यांनी निसर्गाशी जोडले. निसर्गाचा मानवी जीवनाशी असणारा संबंध त्यांनी अनेक वेळा अधोरेखित केला आहे. झाडे वाढावीत म्हणून त्यांनी निसर्गाच्या पंचतत्त्वांना एका कवितेतून केलेले आवाहन त्यांची वैश्विकता सांगणारी आहे. मानवी जीवनाला उपकारक असणारा निसर्ग, त्याचे लाभ आणि निसर्गाच्या वृत्तींचे दर्शन त्यांनी साहित्यातून घडविले. मृणालिनी केळकर यांनी ‘राजपथ’ङ्क या त्यांच्या लघुकथेचा अनुवाद रसाळपणे सादर करुन रस्त्यांची मनोभूमिका वाचिक अभिनयातून सादर केली.
माधवी भट यांनी रवींद्रनाथांच्या कथेतील पाच नायिकांची भूमिका उलगडली. ज्यावेळी मराठीत चूल, मूल विषय लिहिल्या जात होता त्यावेळी रवींद्रनाथांच्या नायिका बंड करुन उठत होत्या. त्यांना नेमकेपणाने काय हवे आहे त्याचा शोध घेत होत्या. विनोदिनी असो वा कंकाल, गिरीबाला, कल्याणी या त्यांच्या नायिकांचे मनोज्ञ दर्शन त्यांनी भाष्यातून केले. अतिथींचे स्वागत माधुरी वाडिभस्मे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधवी भट यांनी केले.

Web Title: Tagore gave new dimension to Indian literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.