नागपुरातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:26 AM2019-07-15T11:26:17+5:302019-07-15T11:27:17+5:30

उपराजधानीला शैक्षणिक ‘हब’कडे नेण्यात मौलिक वाटा असणाऱ्या ‘ट्रीपल आयटी’ मधील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र तयार केले आहे.

'Smart' irrigation equipment created for farmers in Nagpur IIIT | नागपुरातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र

नागपुरातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र

Next
ठळक मुद्दे‘ट्रीपल आयटी’च्या विद्यार्थ्यांची कमाल ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये देशात पटकाविला अव्वल क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला शैक्षणिक ‘हब’कडे नेण्यात मौलिक वाटा असणाऱ्या ‘ट्रीपल आयटी’मध्ये (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी) देशाच्या विविध भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र ज्या विदर्भाच्या मातीत तंत्रज्ञानाचे धडे ते घेत आहेत, तेथील शेतकऱ्यांच्या अवस्थेची जाणीव येथील विद्यार्थ्यांना आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करावे, या विचारातून विद्यार्थ्यांनी एक संकल्प घेतला. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र तयार केले. विशेष म्हणजे त्यांच्या या कष्टाची राष्ट्रीय पातळीवरदेखील नोंद झाली. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९’मध्ये (हार्डवेअर एडिशन) नागपुरातील ‘ट्रीपल आयटी’च्या चमूने देशात अव्वल क्रमांक पटकाविला.
विदर्भातील अनेक भागात सिंचनासंदर्भातील विविध समस्या आहेत. शेतजमिनीला आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळाले की नाही, हे पाहण्यासाठी अनेकदा रात्री जागावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मोबाईलवर आधारित व कमी खर्चातील ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र विकसित केले. या यंत्राच्या माध्यमातून सिंचनाचे ‘शेड्युलिंग’ करणे शक्य झाले आहे. या प्रणालीत ‘ऑटोमेशन मोड’ असून, यामुळे पंप हा आपोआप चालू व बंद होऊ शकतो. तापमान, मातीतील ओलावा, आर्द्रता इत्यादींची चाचपणी केल्यावर पंप चालू किंवा बंद होतो. या प्रणालीला उपयुक्त करण्यासाठी पावसाचे प्रमाण, पर्जन्यमानाचा दर, सिंचनाचा प्रकार, पिकाच्या वाढीचा टप्पा यांच्या आधारावरदेखील पंपाचे कार्य चालते.
या ‘स्मार्ट’ प्रणालीमुळे पिकाला आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर होतो व यामुळे पाण्याची बचत होऊ शकते. डॉ. आतिष दर्यापूरकर यांच्या मार्गदर्शनात सहा विद्यार्थ्यांच्या चमूने हे यंत्र विकसित केले. यात सौरव गजभिये, पूर्वा गोयडानी, वेदांत गन्नारपवार, हर्षल खंडाईत, प्रणव रबडे व कौशिक येलने यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवर यश
‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९’मध्ये (हार्डवेअर एडिशन) ‘ट्रीपल आयटी’च्या चमूने हे यंत्र सादर केले. दुसऱ्या टप्प्यात १ हजार १०१ चमूंमध्ये ‘ट्रीपल आयटी’चा समावेश होता. दोन महिन्यांच्या खडतर प्रयत्नांनतर चमूला अखेरच्या फेरीत जाण्याची संधी मिळाली. ‘सीएसआयआर-सीएसआयओ’ चंदीगढ येथे देशातील १४ चमूंचे आव्हान होते. यात ‘ट्रीपल आयटी’च्या चमूने बाजी मारली. यंत्राची कल्पना ते प्रत्यक्ष ते विकसित करणे या प्रवासात अनेक अडचणी आल्या. मात्र आम्ही एकत्रितपणे प्रयत्न केले. त्यामुळेच यश मिळाले, अशी भावना सौरव गजभिये या ‘टीम लीडर’ने व्यक्त केली. संस्थेचे संचालक डॉ.ओ.जी.काकडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ.ए.जी.कोठारी, प्रभारी कुलसचिव के.एन.दाखले, डॉ.विपीन कांबळे यांचे आम्हाला मौलिक मार्गदर्शन लाभले असेदेखील त्याने सांगितले.

Web Title: 'Smart' irrigation equipment created for farmers in Nagpur IIIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.