दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:28 PM2018-10-15T22:28:54+5:302018-10-15T22:30:45+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.

Service security of three thousand Samta Sainik Dal on Diksha Bhoomi | दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

Next
ठळक मुद्देदेशाच्या कानाकोपऱ्यातून येतात सैनिक : सलग चार दिवस अनुयायांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.
१९२७ च्या त्या काळात समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होती. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, हे स्वाभिमानाचे नवे वारे होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावागावात अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा, १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येक वेळी समता सैनिक दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. आजही दीक्षाभूमीच्या व्यवस्थेसाठी हे सैनिक तेवढ्याच प्रेरणेने झटतात. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जीओसी प्रदीप डोंगरे म्हणाले, भदन्त नागदीपंकर थेरो यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर होणाऱ्या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात आपली सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावण्यासाठी देशातून अडीच हजार सैनिक येणार आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथूनही सैनिक येतात.

सुरक्षेसोबतच सहकार्यही
समता सैनिक दलाचे अतिरिक्त महासचिव पृथ्वी मोटघरे यांनी सांगितले, १६ ते १९ आॅक्टोबर असे सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक दीक्षाभूमीच्या परिसरात अनुयायांना सेवा दिली जाणार आहे. यात दीक्षाभूमीच्या सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, आजाऱ्यांना हेल्थ कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामाची जबाबदारी सैनिकांवर असेल.

Web Title: Service security of three thousand Samta Sainik Dal on Diksha Bhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.