मृत्यूच्या दाढेतील विद्यार्थ्यांसह अनेकांचे जीव वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:25 AM2018-07-07T10:25:55+5:302018-07-07T10:30:37+5:30

रस्ते पाण्यात गेलेले. अशात विद्यार्थ्यांनी भरलेली बस वाहनचालक पुढे काढतो. ती बस पुलाच्या अलीकडे काहीशा खोलगट भागात बंद पडते अन् पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कलंडते. बसमधील विद्यार्थ्यांची रडारड, किंचाळ्या वाढतात.

Save the lives of many people with students | मृत्यूच्या दाढेतील विद्यार्थ्यांसह अनेकांचे जीव वाचविले

मृत्यूच्या दाढेतील विद्यार्थ्यांसह अनेकांचे जीव वाचविले

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस उपायुक्त भरणेंची प्रशंसनीय कामगिरी डिझास्टर मॅनेजमेंटच्या उत्तराखंड पॅटर्नचा उपराजधानीत वापर

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :

पोलीस उपायुक्त, हुडकेश्वरचे ठाणेदार अन् पोलिसांचा ताफा तसेच परिसरातील शेकडो नागरिक पुलाच्या पलीकडून हे काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य बघत असतात. पुलावर पाच फुटांपेक्षा जास्त पाणी असल्यामुळे कुणी जीव धोक्यात घालण्याची हिंमत दाखवत नाही. मात्र, आणखी काही क्षण गेल्यास काय आक्रित घडू शकते, याची कल्पना असल्यामुळे पोलीस उपायुक्तांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांसोबतच नागरिकांनाही मदतीसाठी तयार करून घेतले. स्वत: पुलाच्या पाण्यात शिरून पलीकडे दोर घेऊन पोहचले. त्यांनी कलंडलेल्या बसमधून विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी पोहचवले. काळजाची धडधड वाढवणाऱ्या तब्बल तासाभराच्या या थरारक घटनाक्रमात खुद्द पोलीस उपायुक्तांचाच जीव दोनदा धोक्यात आला होता. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वत:सोबतच अनेकांचा जीव वाचवून खाकीची शान वाढवली.
नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरलेल्या आज ६ जुलैचे रिअल हिरो ठरलेल्या या पोलीस अधिकाऱ्याचे नाव नीलेश भरणे असून ते परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आहेत. मुसळधार पावसामुळे उपराजधानीत एकच गोंधळ निर्माण झाला असताना स्थानिक प्रशासन पांगळे झाल्यासारखे जाणवत होते. अनेकांच्या घरात, कार्यालयातच नव्हे तर शाळांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे राज्य सरकारच्या उपस्थितीत उपराजधानीतील विविध भागात हाहाकार उडाला होता. सर्वत्र धावपळ, आरडाओरड, मदतीसाठी याचना सुरू होती. तिकडे आपत्ती व्यवस्थापनाची पुरती ऐशीतैशी झाल्यासारखे भासत होते. अशात नैसर्गिक आपत्तीच्या, आणीबाणीच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन (डिझास्टर मॅनेजमेंट) कसे करायचे, याचा धडा पोलीस उपायुक्त भरणे यांनी घालून दिला. प्रश्न होता हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळकरी मुलांच्या जीविताचा.
नागपूर शहराच्या दक्षिणेला असलेल्या पिपळा भागातील सुमारे एक किलोमिटरचा परिसर तलावासारखा झाला. रस्ते पाण्याखाली आले. त्यामुळे त्या भागातील शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पिपळा ग्राम येथील आदर्श संस्कार विद्यालयाच्या प्रशासनाने शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची घिसाडघाई केली. विद्यार्थ्यांनी भरलेल्या दोन बस भयावह स्थितीत शाळेबाहेर काढल्या. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे पुलाच्या अलीकडे एक बस खोलगट भागात बंद पडली. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले.
बस अडकून पडल्याने असहाय विद्यार्थी किंचाळू लागले. पुलाच्या पलीकडे मोठ्या संख्येत नागरिक होते. पोलीसही होते. परंतु पुलावर पाच फुटांपेक्षा जास्त वेगात पाणी वाहत असल्यामुळे कुणी जीव धोक्यात घालण्याची हिंमत दाखवत नव्हते. वेळ असाच दवडल्यास काय आक्रित घडू शकते, याची कल्पना आल्यामुळे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांसोबत नागरिकांनाही मदतीसाठी तयार करून घेतले.
स्वत: पुलाच्या पाण्यात शिरून पलीकडे दोर घेऊन पोहचले. त्यांनी कलंडलेल्या बसमधून विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये बसवले.

मृत्यूशी दोनदा सामना
पाण्यातून बस बाहेर काढायची होती. मात्र, तिच्या चालकाची भीतीमुळे गाळण उडाली होती. त्यामुळे बस सुरूच होत नव्हती. अशात चालकाने बस चालविण्यास नकार देऊन खाली उडी घेतली. उपायुक्त भरणे यांनी त्यांच्या शासकीय कारचा चालक पोलीस कर्मचारी प्रफुल्ल आमले याला बस चालवण्यास सांगितले. बस वाहून जाऊ नये म्हणून चारही बाजून दोर बांधून शंभरावर नागरिकांची मानवी साखळी तयार करीत बसला पाण्यातून ओढण्यास सांगितले. ज्यांना पोहणे जमते अशांना धक्का मारायला सांगितले. धक्का मारताना चिखलात पाय घसरल्याने उपायुक्त भरणे पाण्यात पडले. मात्र, लगेच ते उठून उभे झाले. हा एक प्रसंग. तर, दुसरा प्रसंग त्याहीपेक्षा थरारक होता. बसला धक्का मारताना अचानक पाण्यातून वाहत आलेला लांबलचक साप त्यांच्या अंगावर आला. त्यांनी तो झटकून फेकला. असाच एक साप हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने यांच्याही अंगावर आला आणि तेसुद्धा बचावले. अशा प्रकारे मृत्यूशी सामना करीत त्यांनी बसला धक्का मारून सुरू करत बाहेर काढले अन् विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले.

Web Title: Save the lives of many people with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.