रमण विज्ञान केंद्रात इतिहासजमा झालेल्या पुरातन वस्तूंचे पुन्हा दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:21 PM2019-05-17T23:21:30+5:302019-05-17T23:28:42+5:30

नोटबंदी झाली आणि एका रात्रीत चलनात असलेले नोट इतिहासजमा झाले. ही घटना आताच घडल्याने आपल्याला माहीत आहे. पण केवळ पैसा किंवा नाणीच नाही तर अशा असंख्य वस्तू आहेत ज्या आपण, आपले पूर्वज किंवा शेकडो वर्षापूर्वीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत्या आणि त्या वस्तु आज इतिहासजमा झाल्या आहेत. काहींना या वस्तू अनावश्यक वाटतात व अडगळीत फेकल्या जातात. पण काही लोक हा आठवणीतला ठेवा जतन करून ठेवतात. अशा संग्रहकर्त्यांनी जतन करून ठेवलेल्या आपला पुरातन वारसा सांगणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन सध्या रमण विज्ञान केंद्र व तारामंडळ येथे लागले आहे.

In Raman Science Center Historical things exhibition | रमण विज्ञान केंद्रात इतिहासजमा झालेल्या पुरातन वस्तूंचे पुन्हा दर्शन

डॉ. एस.आर. गुप्ता यांच्या संग्रहामध्ये असलेले बेबी सिनेमा प्रोजेक्टर आणि १९०१ सालचा पुरातन केरोसीन स्टोव्ह.

Next
ठळक मुद्देजागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोटबंदी झाली आणि एका रात्रीत चलनात असलेले नोट इतिहासजमा झाले. ही घटना आताच घडल्याने आपल्याला माहीत आहे. पण केवळ पैसा किंवा नाणीच नाही तर अशा असंख्य वस्तू आहेत ज्या आपण, आपले पूर्वज किंवा शेकडो वर्षापूर्वीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत्या आणि त्या वस्तु आज इतिहासजमा झाल्या आहेत. काहींना या वस्तू अनावश्यक वाटतात व अडगळीत फेकल्या जातात. पण काही लोक हा आठवणीतला ठेवा जतन करून ठेवतात. अशा संग्रहकर्त्यांनी जतन करून ठेवलेल्या आपला पुरातन वारसा सांगणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन सध्या रमण विज्ञान केंद्र व तारामंडळ येथे लागले आहे. 


जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून रमण विज्ञान केंद्रातर्फे हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. ईस्ट इंडिया कंपनी भारतात येण्यापूर्वी राजेरजवाडे यांनी काढलेली नाणी, ऐतिहासिक स्टॅम्प ते स्वातंत्र्यानंतर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामुळे अडगळीत पडलेले स्टॅम्प, नाणी, नोटा, शिवाजी महाराज यांच्या काळातील सोन्याचे होन व तांब्याची शिवराई, महात्मा गांधी अंकित असलेल्या आतापर्यंतच्या नोटा, नाणी, स्टॅम्प असे पोस्टाच्या व चलनाच्या क्षेत्रातील वस्तू या प्रदर्शनात आहेत. सोबत १९०१ मध्ये केरोसिनवर पेटणारा स्टोव्ह, बेबी सिनेमा टेलिस्कोप, पूर्वीची वजन मापे, वेगवेगळ्या भागातील समुद्रात सापडणारे शंख, वेगवेगळ्या भागातील माती, जुन्या काळातील भांडीकुंडी असे सर्व या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. 

चिमुकल्या अनन्या उदय गोंडाणे हिने सोबत १७ व्या, १८ व्या शतकात जगभरात जहाजावर प्रवास करताना दिशा दर्शविण्यासाठी उपयोगात येणारे कंपासयंत्र ठेवले आहे. यात ग्रॅहम बेल, एडवर्ड -७, अलेक्झांड्रा व्होल्टा यांचे कंपासही आहे. सोबत २४ कॅरेट सोन्याने मढविलेली लहान सायकल, विविध भाषेतील सर्वात लहान आकाराचे भगवद्गीतेची पुस्तके ठेवली आहेत. लहानग्या ओजस जयंत तांदुळकर याने जगभरातील कारचे मॉडेल्स प्रदर्शनात ठेवले आहेत. आशुतोष कौशल यांनी लावलेली हिटलर विषयीची सामुग्रीही लक्ष आकर्षित करते. डॉ. अनिल मेश्राम यांनी लावलेली जुनी भांडीकुंडी लक्ष वेधून घेतात. कपिल बन्सोड, सुधाकर सोनार आणि इतरांनी लावलेले स्टॅम्प व नाण्यांचे कलेक्शनही आपल्याला इतिहासात घेऊन जाते. रोहित सारडा यांचा शंखसंग्रह व अनिता सुधाकर सारडा यांचा मातीसंग्रह मार्गदर्शक आहे. दिलीप डहाके यांचे सेलिब्रिटी ऑटोग्राफ व त्यांच्यासोबतचे फोटोग्राफ प्रदर्शनात मांडले आहे.
जनार्दन केवटे यांनी जपानी ओरिगामी हा कलाप्रकार दर्शविणारे पेपर फोल्डींग कलेतून बनविलेले आकर्षक साहित्य, जयंत तांदुळकर यांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकुसरीच्या वस्तू पाहताना कौतुक वाटते. ७५ वर्षांचे डॉ. एस.आर. गुप्ता यांनी १९०१ मधील केरोसीन स्टोव्ह, मुलांना दाखविण्यात येणारा बेबी सिनेमा प्रोजेक्टर, भोपाळमध्ये १९२२ दरम्यान वापरात असलेली वजन मापे, शहजहान बेगम यांचे मोनोग्राम असलेले वजन मापे, मुद्रण दोष असलेले सिक्के व नोटा, सायकल लॅम्प आणि दुसऱ्या महायुद्धाचे वर्णन करणाऱ्या कॉमिक्स असे बरेच काही पहायला मिळत आहे. यातील आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे लोकमतने काढलेले थ्रीडी वर्तमानपत्र.
सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भारतीय पुरातत्त्व, इतिहास व संस्कृती विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी व रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विजयशंकर शर्मा यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. आकर्षक अशा वस्तूंचे हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. काहीतरी अलौकिक पाहण्याचा आनंद नागरिकांनी घ्यावा व मुलांनाही द्यावा.

Web Title: In Raman Science Center Historical things exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.