प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन सार्वजनिक करणार नाही : पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 08:18 PM2019-03-12T20:18:38+5:302019-03-12T20:30:38+5:30

आम्ही आमचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन सार्वजनिक करू इच्छित नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी राज्य पोलीस दल सज्ज आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोधकांत जयस्वाल यांनी दिली.

The Plan of Action will not be made public: The Director General of Police clarifies | प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन सार्वजनिक करणार नाही : पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती

प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन सार्वजनिक करणार नाही : पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती

Next
ठळक मुद्देराज्य पोलीस दल साधनसुविधा अन् प्रशिक्षणाने सज्ज : लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आम्ही आमचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन सार्वजनिक करू इच्छित नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी राज्य पोलीस दल सज्ज आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोधकांत जयस्वाल यांनी दिली.
डीजीपी जयस्वाल मंगळवारी सकाळी नागपुरात आले. त्यांच्यासोबत राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) संदीप भारंबे हे देखील होते. त्यांनी येथील पोलीस जिमखान्यात नागपूर आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या तसेच नागपूर, अमरावती आणि गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रथम त्या त्या आयुक्तालय आणि जिल्ह्यातील पोलीस दल तसेच समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने कसा बंदोबस्त करायचा, काय उपाययोजना करायच्या त्यासंदर्भाने सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईक नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने निवडणूक आयोगाचे काय दिशानिर्देश आहेत तसेच राज्य पोलीस दलाचा बंदोबस्त कसा राहील याचे थोडक्यात विश्लेषण केले. मुंबईपासून तो गडचिरोलीपर्यंत निवडणूक बंदोबस्ताचे काय आव्हान आहे, या संबंधाने पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना त्यांनी आम्ही सर्वच प्रकारची तयारी केली आहे. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक साधनसुविधा आणि प्रशिक्षण पोलीस दलाला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शांततेत निवडणूका पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुलवामा हल्ल्यानंतर घातपाताचा धोका आहे काय, राज्यातील कोणते जिल्हे संवेदनशील आहेत आणि काय उपाययोजना आहेत, असे प्रश्न उपस्थित झाले असता त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी प्रत्येक प्रश्नाला सारख्याच प्रकारचे उत्तर दिले. राज्य पोलीस दल प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, त्यासाठी आवश्यक साधनसुविधा आणि प्रशिक्षणयुक्त मनुष्यबळ आमच्याकडे आहे. मुंबई आणि अन्य काही ठिकाणी यापूर्वी दहशतवादी हल्ले झाले. आता मात्र असे होणार नाही. त्यासाठी खबरदारी घेण्यात आली असून, मुंबईत आम्ही वेळोवेळी रिहर्सलही करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलप्रभावित गडचिरोली-गोंदियासारख्या काही जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान भयमुक्त वातावरणात होत नसल्याचे वास्तव उपस्थित झाले असता, यावेळी तसे काही होणार नाही. भयमुक्त आणि शांततेत मतदान पार पडेल, असे डीजीपी जयस्वाल म्हणाले. १९९२ ते ९५ अशी तीन वर्षे मी गडचिरोलीत पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्याचा अनुभव आणि सध्याची स्थिती लक्षात घेऊन आम्ही गडचिरोली-गोंदियात बंदोबस्ताची व्यूहरचना करणार असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सर्व प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचे ते म्हणाले.  
ईव्हीएम सुरक्षा, सोशल मीडियाचे आव्हान
मतदानानंतर वायफाय झोनमध्ये ठेवल्या जाणाऱ्या ईव्हीएममध्ये ‘गडबड’ केली जाते, असे एका पत्रकाराने म्हटले असता त्यांनी ज्या ठिकाणी ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी वायफाय अन् हायफाय व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियाचे आव्हान कसे पेलणार, असे विचारले असता राज्यातील सर्व युनिट कमांडर्सना सतर्क करण्यात आले असून, हे आव्हान पेलण्यासाठी सायबर सेलच्या माध्यमातून उपाययोजना आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला तसेच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.
सर्वोत्तम दल बनवायचेय
महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जयस्वाल पहिल्यांदाच नागपुरात आले. डीजीपी म्हणून तुमचा काय संकल्प आहे, असे पत्रकारांनी विचारले. देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी राज्याराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची को-ऑर्डिनेशन कमिटी अधिक प्रभावी बनविणार आहे. त्यातून आंतरराज्यीय गुन्हेगारी आणि शस्त्रांची तस्करी रोखण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

Web Title: The Plan of Action will not be made public: The Director General of Police clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.