गुण पासचे, निकाल नापास!

By admin | Published: August 7, 2015 02:44 AM2015-08-07T02:44:50+5:302015-08-07T02:44:50+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ प्रथम वर्षाचे काही विद्यार्थी उत्तीर्ण असूनदेखील गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे.

Passes the attributes, not to the result! | गुण पासचे, निकाल नापास!

गुण पासचे, निकाल नापास!

Next

‘बीकॉम’चे विद्यार्थी संकटात : खासगी शिकवणी चालकांची फूस?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ प्रथम वर्षाचे काही विद्यार्थी उत्तीर्ण असूनदेखील गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. अखेर ‘बीकॉम’च्या प्रथम वर्षाचे निकाल जाहीर झाले अन् अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. सुमारे ८२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. गुणपत्रिका पाहिल्या असत्या काही विद्यार्थी उत्तीर्ण असूनदेखील त्यांना अनुत्तीर्ण दर्शविण्यात आले आहे.
‘लोकमत’कडे असलेल्या काही गुणपत्रिकांमध्ये ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘पीएलआय’ व ‘इडीव्ही’ या विषयाची लेखी परीक्षा ही ७० गुणांची असते, तर अंतर्गत मूल्यमापनाचे ३० गुण असतात. नियमांनुसार या लेखी परीक्षेत २५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण असतो.
परंतु अनेक विद्यार्थ्यांना ३० हून अधिक गुण मिळाले आहेत, तरीदेखील त्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची ‘एटीकेटी’ची संधीदेखील हुकली असून संपूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक चुकांमुळे असे घडले असल्याचे मान्य केले. परंतु अशा चुका काही मोजक्या विद्यार्थ्यांबाबत घडल्या असून त्यांच्या गुणपत्रिका नव्याने देण्यात येतील व त्यांना त्या विषयांत उत्तीर्ण दाखविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
विद्यापीठात आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
विद्यापीठाने घाईगडबडीत निकाल लावण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ केल्याचा आरोप करत ‘आप’च्या छात्र युवा संघर्ष समितीच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी व्हावी, विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल हे त्वरित लावावेत, डॉ.धवनकर प्रकरणातील योग्य माहिती देण्यात यावी, मोहता सायन्सच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्या छात्र युवा संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये नागपूर संयोजक कृतल वेळेकर यांच्यासह भाग्यश्री व्यवहारे शुभम मिरे, मयुरी पौनीकर, प्रिया जैन, अंकिता नखाते, गुलशन ठाकरे, पावन पंचभाई, नदीम, अभिलाष गजभिये, विश्वास देलोरे, प्रभात अग्रवाल, प्रतिक मिरे, मनीष गिरडकर, सोनू फटिंग आदींचा समावेश होता.

Web Title: Passes the attributes, not to the result!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.