अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे; आयआरएसच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 07:52 PM2023-04-05T19:52:41+5:302023-04-05T19:53:10+5:30

Nagpur News नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि करदात्यांना सुलभ सेवा प्रदान करताना करदाते आणि सरकारमधील दुवा बनून कार्यरत राहण्याचे आवाहन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी येथे केले.

Officers should act as a link between taxpayers and the government; Convocation ceremony of 75th batch of IRS | अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे; आयआरएसच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ

अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे; आयआरएसच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ

googlenewsNext

नागपूर : आवश्यक कर संकलनात अनेक आव्हाने येतील, पण त्यावर मात करीत पुढे जा आणि यशस्वी व्हा. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि करदात्यांना सुलभ सेवा प्रदान करताना करदाते आणि सरकारमधील दुवा बनून कार्यरत राहण्याचे आवाहन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी येथे केले.

भारतीय महसूल सेवेच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ बुधवारी छिंदवाडा रोड येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सभागृहात पार पडला. समारंभात मुख्य अतिथी म्हणून गुप्ता यांनी नवीन आयआरएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक (प्रशिक्षण) संजय पुरी यांच्यासह एनएडीटीचे अप्पर महासंचालक (प्रशासन) मुनीश कुमार, अप्पर महासंचालक (प्रशिक्षण) बी. व्यंकटेश्वर राव, अप्पर महासंचालक, डॉ. विनय कुमार, अप्पर संचालक एम. कार्तिक माणिक्कम आणि संयुक्त संचालक व ७५ व्या बॅचचे कोर्स संचालक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.

अधिकाऱ्यांसमोर कर संकलन वाढीची आव्हाने

गुप्ता म्हणाले, अमृतकाळाच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही अधिकारी म्हणून रुजू होणार आहात. कर संकलन वाढीची आव्हाने असतील. त्याला सामोरे जा. विभागाने अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. तंत्रज्ञानात बदल होत आहे. त्यामुळे दरवर्षी महसूल वाढत आहे. करदात्यांसाठी सकारात्मक धोरणे आणि प्रक्रिया सुलभ केल्यामुळे आयकर विभागाने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक १६.०६ लाख कोटी रुपयांचे कर संकलन नोंदवले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा

गुप्ता म्हणाले, गेल्या काही दशकांपासून विभागाच्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले जात आहेत. वर्ष १९८६ मध्ये आयकर संकलन ७ हजार कोटी होते. ते आता १६.६ लाख कोटींवर पोहोचले आहेत. कर वाढीसाठी आयआरएस अधिकारी महत्त्वाचे ठरले आहेत. ई-गव्हर्नस आले आहे. ई-फायलिंगची पद्धत संगणकीकृत झाली आहे. याआधी एकाच दिवशी ७२ लाख रिटर्न फाइल झाले होते. २०१९ मध्ये फेसलेस पद्धत आली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पोर्टलद्वारे ७.५ कोटी रिटर्न फाइल झाल्या आहेत. आयआरएसला देशात आणि देशाबाहेरही संधी आहेत. त्यांना अनेक विभागात काम करता येते.

प्रारंभी सौरभ अग्रवाल यांनी नवीन आयआरएस अधिकाऱ्यांची माहिती दिली. महक मित्तल या अधिकाऱ्याने विविध विषयात एकूण पाच सुवर्ण पदके मिळविली. समारंभात आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त वसुंधरा सिन्हा आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Officers should act as a link between taxpayers and the government; Convocation ceremony of 75th batch of IRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार