आता आईच्या दुधापासून कुणी वंचित नसणार!; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:01 AM2019-07-23T11:01:53+5:302019-07-23T11:06:04+5:30

बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू करण्याचे निर्देश नुकतेच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

No one will be deprived of breast milk now! | आता आईच्या दुधापासून कुणी वंचित नसणार!; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

आता आईच्या दुधापासून कुणी वंचित नसणार!; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देसर्व मेडिकलमध्ये ‘ह्युमन मिल्क बँक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू करण्याचे निर्देश नुकतेच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. सोबतच रुग्णालयाने जागा, स्वतंत्र कर्मचाऱ्यांची व्यवस्था व जिल्हाधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षांपूर्वी ‘ह्युमन मिल्क बँक’चा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला. ‘लोकमत’ने ‘मातृ दुग्ध पेढीचा प्रस्ताव बारगळला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. यावर पावसाळी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. याची दखल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली. १७ जून २०१९ रोजी या संदर्भात त्यांनी बैठक घेतली. यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रुग्णालयाने ‘बँके’ला लागणारी जागा व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र त्यांच्या स्वाक्षरीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या संदर्भाचे एक पत्र नुकतेच नागपूरच्या मेडिकलला प्राप्त झाले. उल्लेखनीय म्हणजे, येथील अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी पदभार हाती घेताच मेडिकलमध्ये ‘ह्युमन मिल्क बँक’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्तावही जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला.
मेयोने नाकारताच मेडिकलचा पुढाकार
आईच्या दुधापासून नवजात अर्भक वंचित राहिल्यास त्याचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. मानवी दुग्ध पेढीची गरज लक्षात घेऊन मेयोच्या बालरोग विभागाच्या तत्कालीन विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी रोटरीच्या मदतीने मानवी दुग्ध पेढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. जिल्हा विकास नियोजन समितीने मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात ही पेढी व्हावी म्हणून प्रत्येकी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु मेयोने या प्रकल्पासाठी जागा नसल्याचे सांगून हात वर केले. मेडिकलने सुरुवातीला उदासीनता दाखविली. परंतु अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्याकडे प्रस्ताव येताच जागा उपलब्ध करून देऊन नवीन प्रस्तावही तयार केला.
या बालकांना होईल फायदा
माता म्हटलं की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. त्यामुळे अनाथालयात आईच्या दुधाची तहान गाई-म्हशीच्या दुधावर किंवा दुधाच्या भुकटीतून भागविली जाते. याशिवाय सिझेरियन झालेल्या अनेक मातांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांत दूध येत नाही. काही माता या कुपोषित असतात तर काहींना अन्य कारणास्तव स्तनपान शक्य होत नाही. अशांमध्ये आईला क्षयरोगाची बाधा असणे, कावीळ, एड्स, इतर मानसिक आजारांची लागण होणे, या कारणांमुळे बाळाला दूध पाजता येत नाही. झोपेची औषधे, कॅन्सरवरील औषधे, सल्फा, टेट्रासायक्लीन, इस्ट्रोज ही औषधे चालू असतील तर बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावे लागते. स्तनात गळू झाल्यावर, आई हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्यावर, बाळाचा जन्म होताच आईचा मृत्यू झाल्यामुळेही मातेच्या दुधाला मुकावे लागते. या जन्मदात्रीच्या दुधापासून वंचित राहणाऱ्या बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’चा पर्याय आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी पुढाकार घेतल्याने अशा बालकांना मोठा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला

आईचे दूध उपलब्ध होऊ न शकणाऱ्या बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’चा पर्याय योग्य आहे. मेडिकलमध्ये अशा रुग्णांची संख्या पाहता ही पेढी सुरू करणे गरजेचे होते. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतल्याने व त्यांच्या निर्देशानुसार या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. यामुळे लवकरच ही पेढी मेडिकलमध्ये सुरू होईल.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: No one will be deprived of breast milk now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध