९ महिन्यांत ‘एसटीपी’ला नाही मुहूर्त, आयुक्तांचे आश्वासन विरले हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:23 AM2018-12-19T00:23:39+5:302018-12-19T00:24:05+5:30

महापालिकेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह : आयुक्तांचे आश्वासन विरले हवेत

In nine months, the Commissioner has no issues, the Commissioner's assurances should be scarce | ९ महिन्यांत ‘एसटीपी’ला नाही मुहूर्त, आयुक्तांचे आश्वासन विरले हवेत

९ महिन्यांत ‘एसटीपी’ला नाही मुहूर्त, आयुक्तांचे आश्वासन विरले हवेत

Next

बोपखेल : येथील मुळा नदीशेजारी एसटीपी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. अमृत प्रकल्प योजनेअंतर्गत या एसटीपी प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाची मार्च २०१८ रोजी निविदा मंजूर करून एसटीपी प्रकल्पास हिरवा कंदील दाखवण्यात आला. परंतु अनेक महिने उलटूनही या कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांनी डिझाईनचे कारण पुढे केले होते. मात्र डिझाइन तयार असूनही कामास सुरुवात का केली जात नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. मागील महिन्यात झालेल्या स्थायीच्या बैठकीत नगरसेवक विकास डोळस यांनी आयुक्तांना एसटीपी प्रकल्पाच्या दिरंगाईबाबत विचारणा केली होती़ त्यांना एक आठवड्यात कामास सुरुवात करू, असे आयुक्तांनी उत्तर दिले होते. परंतु एक महिना उलटूनही आजतागायत कामास सुरुवात केलेली नाही.

कंपनीवर दंडात्मक कारवाई
1बोपखेल येथील एसटीपी प्रकल्पाचा कार्यकाळ मार्च २०१८ ते मार्च २०२० एवढा आहे. तर या प्रकल्पाची रक्कम ४.३३ कोटी व पंपिंगसाठी ९० लाख असे दोन्ही मिळून ५.२२ कोटी रक्कम आहे. अमृत प्रकल्प योजनेअंतर्गत बोपखेल एसटीपी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परंतु निविदा दिलेल्या पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा या कंपनीचे काम हळूवार असल्याने या कंपनीला महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

जलचरांवर होतोय विपरीत परिणाम
2बोपखेल भागात तीन भाग आहेत. या तीनही भागातील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी येथील ड्रेनेजमध्ये सोडले जाते. पुढे जाऊन हेच पाणी बोपखेल येथील मुळा नदीमध्ये कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाते. या घाण पाण्यामुळे जलचर जीवसृष्टीवर मोठा परिणाम होत आहे. तसेच नदीपात्रात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.मुळा नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बोपखेल बरोबर भोसरी व दिघी येथीलही सांडपाणी सीएमई भागातून उघड्या गटारीमार्फत मुळा नदीमध्ये सोडले जात आहे. एकीकडे केंद्र सरकार नदी स्वच्छता अभियान राबवित आहे, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मैलामिश्रित पाणी ड्रेनेजमार्फत कुठलीही प्रक्रिया न करता बोपखेल येथील मुळा नदीपात्रात सोडत आहेत़

एक वर्ष झाले तरी काम पूर्ण होईना
3लाखो करोडो रुपयांचे टेंडर खासगी कंपन्यांकडून घेतले जातात़ मात्र प्रत्यक्ष कामास दिरंगाई केली जात आहे. बोपखेल येथील एसटीपी प्रकल्पाच्या कामाचा अवधी दोन वर्ष एवढा आहे. परंतु कामाची निविदा देऊन एक वर्ष पूर्ण होत आले आहे. उरलेल्या एक वर्षात एसटीपी प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यास या कामाचा दर्जा कसा असेल हे सांगता येत नाही. मैलामिश्रित पाणी, कत्तलखान्यातील घाण व सांडपाणी हे सर्व मुळा नदीत सोडले जात आहे़ त्यामुळे बोपखेलमध्ये मैला शुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी बोपखेल येथील नागरिकांकडून व चारही नगसेवकांकडून होत आहे.

बोपखेल येथील नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एसटीपी प्रकल्प ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. कारण रामनगर स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधायचे आहेत; परंतु या भागात ड्रेनेज व एसटीपी नसल्याने हे काम राहिले आहे. एसटीपी प्रकल्पाच्या दिरंगाईमुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- विकास डोळस, नगरसेवक, दिघी बोपखेल प्रभाग

एसटीपी प्रकल्पाची जागा निमुळती असल्याने काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यासाठी पुन्हा नव्याने डिझाइन बनविण्यात येत आहे. प्रत्यक्ष जागेवर मार्किंग करून त्याप्रमाणे डिझाइन करण्यात येत आहे. व पुढील आठवड्यात कामास सुरुवात करण्यात येईल. बोपखेल येथील कामास दिरंगाई होत आहे. संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली आहे.
- संजय भोसले, अभियंता, पीसीएमसी ड्रेनेज विभाग

बोपखेल येथील मुळा नदीमध्ये रामनगर, गणेशनगर व बोपखेल या तिन्ही भागांतील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी व येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. येथील अनेक ड्रेनेजचे काम अपूर्ण आहे. एसटीपी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
- प्रकाश घुले, नागरिक, बोपखेल

निविदा मंजूर केलेल्या कंपनीवर महापालिकेने फक्त दंड न करता काळ्या यादीत टाकून कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. कारण बोपखेलमधील एसटीपी प्रकल्पाला खूप दिरंगाई होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार महापालिका व अधिकारी आहेत.
- हिराबाई घुले, नगरसेविका,
दिघी बोपखेल प्रभाग

बोपखेल एसटीपी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा याकरिता आम्ही सर्व नगरसेवक मिळून महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. मंजुरी मिळूनही दिरंगाई होत असल्याने याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका अधिकाºयांची आहे.
- लक्ष्मण उंडे, नगरसेवक,
दिघी बोपखेल प्रभाग

Web Title: In nine months, the Commissioner has no issues, the Commissioner's assurances should be scarce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.