नागपूर विद्यापीठ@ 2024; ‘स्कील डेव्हलपमेंट’वर विद्यापीठाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:44 AM2018-09-22T10:44:27+5:302018-09-22T14:06:56+5:30

नागपूरचा झपाट्याने होणारा विकास व उद्योगक्षेत्राची भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता नागपूर विद्यापीठाने कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस केला आहे.

Nagpur University @ 2014; University's emphasis on 'Skeel Development' | नागपूर विद्यापीठ@ 2024; ‘स्कील डेव्हलपमेंट’वर विद्यापीठाचा भर

नागपूर विद्यापीठ@ 2024; ‘स्कील डेव्हलपमेंट’वर विद्यापीठाचा भर

googlenewsNext
ठळक मुद्दे८९ नवीन अभ्यासक्रम सुरू करणार संत्राप्रक्रिया, ग्रामविकास, कृषी व्यवस्थापनाचाही समावेश

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आवश्यक तेवढ्या प्रमाणात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम नसल्याची अनेकदा ओरड होते. मात्र नागपूरचा झपाट्याने होणारा विकास व उद्योगक्षेत्राची भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता नागपूर विद्यापीठाने कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस केला आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत ८९ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. बृहत् आराखड्याच्या माध्यमातून विद्यापीठाने याचा आराखडा राज्य शासनालादेखील सादर केला आहे.
सद्यस्थितीत विद्यापीठात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांची संख्या ४७ इतकी आहे तर उद्योजकतेसंदर्भात २६ अभ्यासक्रम चालविण्यात येतात. २०२४ पर्यंत ही संख्या वाढविण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. यासाठी बृहत् आराखड्यात विविध विभागांमध्ये कुठल्या प्रकारचे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम असू शकतील याचा विद्यापीठाच्या मसुदा समितीने सखोल अभ्यास केला. उद्योगक्षेत्राची गरज व भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन प्रस्तावित अभ्यासक्रमांची यादीच तयार करण्यात आली. २०१९ ते २०२४ या कालावधीत एकूण ८९ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील व विविध शाखांची संख्या लक्षात घेता ही संख्या सुमारे १३० इतकी राहणार आहे.

उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा
नागपूरचा झपाट्याने विकास होत असून ‘मिहान’मध्ये नवीन उद्योग सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. ‘मेट्रो’मुळे विकासाची गती आणखी वाढणार असून उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळ विद्यापीठातून तयार झाले पाहिजे. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून आम्ही कौशल्याधिष्ठित व उद्योजकतेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस केला आहे. नेमके कुठले अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे याबाबत मसुदा समितीने उद्योग जगतातील तज्ज्ञांची मतेदेखील विचारात घेतली. सखोल अभ्यासानंतर प्रस्तावित अभ्यासक्रमांची नावे अंतिम करण्यात आली, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

‘इंटर्नशीप’ अनिवार्य करणार 

‘इंटर्नशीप’च्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थी उद्योगक्षेत्राशी जोडले जातात. सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना २ ते ६ महिन्यांची ‘इंटर्नशीप’ किंवा उद्योगक्षेत्रातील प्रशिक्षण अनिवार्य आहे. गैरव्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ही बाब अनिवार्य नाही. मात्र काळाची गरज लक्षात घेता गैरव्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना तिसऱ्या व चौथ्या सत्रात एक महिना तर पदवी अभ्यासक्रमांना अंतिम सत्रात एक महिना ‘इंटर्नशीप’ अनिवार्य असेल, असे बृहत् आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे.

३५० हून अधिक ‘प्लेसमेंट सेल’चा मानस
विद्यापीठ किंवा संलग्नित महाविद्यालयांत ‘प्लेसमेंट सेल’ असणे आवश्यक झाले आहे. आजच्या तारखेत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये मिळून ११० ‘प्लेसमेंट सेल’ आहेत. या माध्यमातून ५ हजार २६९ विद्यार्थ्यांचे थेट ‘प्लेसमेंट’ होते. २०२४ पर्यंत ‘प्लेसमेंट सेल’ची संख्या ३५० हून अधिक करण्याचा मानस आहे. या माध्यमातून १३ हजार ७५० विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ होऊ शकेल, असा विश्वास बृहत् आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे.

कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम

  • संत्रा प्रक्रिया
  • ‘सॅनिटरी पॅड्स मार्केटिंग’
  • ‘सॉफ्ट कॉम्पुटिंग’
  • ‘नेटवर्क सिक्युरिटी’
  • ‘बायो-फर्टिलायझर’
  • ‘फ्लोरिकल्चर’
  • ‘ज्वेलरी डिझाईन’
  •  ग्रामविकास
  •  शाळा व्यवस्थापन
  • सामाजिक उद्योजिकता

व्यावसायिक अभ्यासक्रम पदवी

  • ‘बीएसस्सी-एलएलबी’
  • ‘बीबीए-एलएलबी’
  • ‘बीकॉम-एलएलबी’
  • ‘बीएस्सी’ (फायनान्स)
  • ‘ड्राय पोर्ट मॅनेजमेंट’

पदव्युत्तर

  • ‘सोशल वर्क मॅनेजमेंट’
  • ‘एमएसस्सी (फायनान्स)

पदविका

  • ‘इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’
  • ‘वेस्ट मॅनेजेमेन्ट’
  • ‘वॉटर मॅनेजमेन्ट’
  • ‘ट्रायबल स्टडीज्’
  • ‘रिजनल प्लॅनिंग’
  • ‘डिजिटल मार्केटिंग’
  • ‘एअरक्राफ्ट मेंटेनन्स’


प्रमाणपत्र

  • कृषी व्यवस्थापन
  • ‘टूर आॅपरेशन’
  • ‘रिटेल मार्केटिंग’
  • ‘इंडस्ट्रीयल सेफ्टी’
  • ‘हाऊसकिपिंग मॅनेजमेंट’
  • ‘फिटनेस मॅनेजमेंट’
  • नेटवर्क सिक्युरिटी’

Web Title: Nagpur University @ 2014; University's emphasis on 'Skeel Development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.