In Nagpur, speedy truck dashed biker's : one was killed and another seriously injured | नागपुरात भरधाव ट्रकची दोन दुचाकीचालकांना धडक : एकाचा मृत्यू दुसरा गंभीर

ठळक मुद्देगिट्टीखदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रकचालकाने एका पाठोपाठ दोन दुचाकीचालकांना जोरदार धडक मारली. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा टोल नाका मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते ११.५० च्या दरम्यान हा भीषण अपघात घडला.
हरीओमनगर सुराबर्डीच्या परिसरात राहणारा उरफान अब्दुल्ला उरफान सिद्दीकी (वय २०) हा त्याच्या होंडा युनिकॉन (एमएच ३१/ डीवाय ०५४४) ने काटोल नाक्याकडून दाभा टोल नाक्याकडे जात होता. त्याला भरधाव ट्रकच्या चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे उरफान अब्दुलाचा करुण अंत झाला. काही अंतरावरच याच ट्रकचालकाने सय्यद सलीम सय्यद युसूफ (वय ४३, रा. राठोड ले-आऊट, अनंतनगर) यांच्या दुचाकीलाही जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी आरोपी ट्रकचालक पळून गेला. या भागातील मंडळींनी जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. इरफान अब्दुला सिद्दीकी (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.