नागपूरच्या प्रॉपर्टी डीलरची हत्या: छिंदवाड्याच्या जंगलात मिळाले शव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:22 PM2018-01-10T13:22:57+5:302018-01-10T13:24:08+5:30

जामसावळीच्या हनुमान मंदिरात दर्शनाला गेलेल्या इतवारीतील एका तरुण प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अतुल रमेश डहरवाल (वय ३२) असे मृताचे नाव आहे.

Nagpur property dealer murdered: found dead in Chhindwara forest | नागपूरच्या प्रॉपर्टी डीलरची हत्या: छिंदवाड्याच्या जंगलात मिळाले शव

नागपूरच्या प्रॉपर्टी डीलरची हत्या: छिंदवाड्याच्या जंगलात मिळाले शव

Next
ठळक मुद्दे८ फेब्रुवारीला ठरले होते लग्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जामसावळीच्या हनुमान मंदिरात दर्शनाला गेलेल्या इतवारीतील एका तरुण प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अतुल रमेश डहरवाल (वय ३२) असे मृताचे नाव आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील लोधीखेडाजवळच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळला. सोमवारीच हा प्रकार घडल्याची शंका आहे. मंगळवारी सकाळी त्याचे वृत्त नागपुरात पोहोचताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
राजकीय पक्षात सक्रिय असलेला अतुल प्रॉपर्टी डीलर होता. सतरंजीपुऱ्यात त्याचे निवासस्थान असून, त्याच्या कुटुंबीयांचे गांधीबाग उद्यानाजवळ रेस्टॉरंट आहे. अतुल नेहमीच जामसावळीतील हनुमान मंदिरात दर्शनाला जायचा.
सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास तो त्याच्या रेस्टॉरंटमधील शिवा नामक कर्मचाऱ्यासह जामसावळीला दर्शनाकरिता कारने निघाला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. विशेष म्हणजे, अतुलचे लग्न येत्या ८ फेब्रुवारीला होणार होते. त्याचे साक्षगंध झाले होते. त्याचे सासर सौंसरजवळ आहे. त्यामुळे तो जामसावळीहून तिकडे दर्शनाला जायचा.
सोमवारी नागपुरातून निघताना त्याने त्याच्या भावी पत्नीला फोन करून तशी माहितीही दिली होती. दरम्यान, बेपत्ता झालेल्या अतुलचा मृतदेह लोधीखेडाजवळच्या जंगलात आढळल्याने पोलिसांनी नागपूरला माहिती दिली. त्यामुळे त्याचे शोकसंतप्त कुटुंबीय तिकडे रवाना झाले.
त्याची हत्या पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी केली असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी हे वृत्त नागपुरात येताच अुतलच्या मित्रांनी इतवारी परिसरात जोरदार नारेबाजी करून निषेध व्यक्त केला.
यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याची हत्या कटकारस्थान करूनच केली असावी, असा त्यांचा आरोप आहे.

 

Web Title: Nagpur property dealer murdered: found dead in Chhindwara forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा