नागपुरात खासगी हॉस्पिटलचा बुधवारी संप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:21 PM2018-07-14T21:21:41+5:302018-07-14T21:23:37+5:30

शहरातील हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. परंतु यातील जाचक अटी व नियमांमुळे डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. मनपाच्या जाचक अटीच्या विरोधात खासगी हॉस्पिटल संप करण्याच्या तयारीत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी यावर बैठक बोलवली असून, संपावर निर्णय होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे, जाचक अटीमुळे नागपुरातील ९० टक्के रुग्णालयांचे नूतनीकरण झाले नसल्याची माहिती आहे.

Nagpur private hospitals goes on strike on Wednesday! | नागपुरात खासगी हॉस्पिटलचा बुधवारी संप !

नागपुरात खासगी हॉस्पिटलचा बुधवारी संप !

Next
ठळक मुद्देआयएमएने बोलवली बैठक : हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या जाचक अटीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. परंतु यातील जाचक अटी व नियमांमुळे डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. मनपाच्या जाचक अटीच्या विरोधात खासगी हॉस्पिटल संप करण्याच्या तयारीत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी यावर बैठक बोलवली असून, संपावर निर्णय होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे, जाचक अटीमुळे नागपुरातील ९० टक्के रुग्णालयांचे नूतनीकरण झाले नसल्याची माहिती आहे.
‘मुंबई नर्सिंग अ‍ॅक्ट एम ५९’ नुसार खाटांची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. कायद्यानुसार नियमावलींची पूर्तता केल्यानंतरच हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन केले जाते. पूर्वी या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण दर पाच वर्षांनंतर दिले जायचे. २०१७ पासून दर तीन वर्षांनंतर नूतनीकरण करण्याची अट टाकण्यात आली आहे. परंतु यातील जाचक अटींमुळे अनेकांचे नूतनीकरण रखडले आहे. मनपाच्या नियमावलीनुसार ‘फायर सेफ्टी’चे निकष खूप कडक आहेत. कारण हॉस्पिटलच्या इमारतीत संभाव्य आगीची दुर्गघटना टाळण्यासाठी ५० हजार लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी आवश्यक आहे. यासह इमारतीत जागोजागी स्मोक डिटेक्टर, आग विझविण्याचे सिलिंडर बसवण्यात आले पाहिजेत. इमारतीला एक वापरासासाठी आणि दुसरा पर्यायी जिना असणे आवश्यक आहे. पर्यायी जिन्याची लांबी व रुंदी ही इमारतीच्या मजल्यांनुसार निश्चित अशी रचना केलेली असावी. हॉस्पिटल इमारतीच्या मजल्यांनुसार पार्किंगचे नियम बंधनकारक आहेत. जे दवाखाने रहिवासी ठिकाणी म्हणजेच फ्लॅटमध्ये आहेत अशांसाठी ‘चेंज आॅफ यूज’परवानगी बंधनकारक केली आहे. मात्र ही परवानगी घेण्यासाठी मूळ इमारतीच्या रचनेत बदल करावे लागत असल्याने डॉक्टरांकडून याबाबत प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. नागपुरात सुमारे ६० टक्के हॉस्पिटल हे जुन्या इमारतीत आहेत. त्यांना ‘चेंज आॅफ यूज’ परवानगी घेणे कठीण जात आहे. याला घेऊनच अनेक हॉस्पिटलमध्ये नाराजी असून, संपाचे हत्यार उपासण्याची तयारी सुरू केली आहे.
सूत्रानुसार, ‘आयएमए’कडे याविषयी तक्रार आल्यावर सोमवार १६ जुलै रोजी सर्व खासगी हॉस्पिटल संचालकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत संपावर निर्णय झाल्यास बुधवारपासून रुग्णालय संपावर जाण्याची शक्यता आहे. नागपुरात सुरू असलेल्या राज्य पावसाळी विधिमंडळाला घेऊन संपाच्या हालचाली वाढल्याची माहिती आहे. संपाला घेऊन आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: Nagpur private hospitals goes on strike on Wednesday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.