मनसर उत्खननात आढळले नागार्जुनाचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:10 AM2017-08-20T01:10:00+5:302017-08-20T01:10:24+5:30

उपराजधानीपासून जवळच असलेल्या रामटेकजवळील मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन अवशेष सापडले आहेत.

 Nagarjunas remnants found in Mansar excavation | मनसर उत्खननात आढळले नागार्जुनाचे अवशेष

मनसर उत्खननात आढळले नागार्जुनाचे अवशेष

Next
ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची माहिती : बंद पडलेले उत्खनन पुन्हा सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीपासून जवळच असलेल्या रामटेकजवळील मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत जवळपास २७६६ बुद्धकालीन मूर्ती उत्खननात सापडल्या असून दगडाने तयार करण्यात आलेले तीन स्तूप आढळले आहेत. इतकेच नव्हे तर स्तूपातील एका छोट्या खोलीत डोके नसलेली मूर्ती तसेच अवशेष आढळले आहेत. ही मूर्ती व अवशेष नागार्जुन यांच्या आहेत, अशी माहिती बोधिसत्त्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली. इंदोरा बौद्ध विहार येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
मनसर टेकडीवर असलेल्या तलावाखाली उत्खनन केल्यास बौद्धकालीन स्तूप असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. येथील उत्खनन सध्या बंद पडले आहे. आणखी ५० फूट खोल उत्खनन केल्यास तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी मिळतील, असे पुरातत्त्व विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी ए. के. शर्मा यांनी सांगितल्याचा हवाला देत येथील उत्खनन पुन्हा सुरूकरावे, अशी मागणी सुद्धा भदंत ससाई यांनी यावेळी केली. भदंत ससाई यांनी सांगितले, बोधिसत्त्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्रातर्फे १९९२ मध्ये उत्खननाला सुरुवात झाली. मनसर टेकडीवर एकेकाळी बौद्धकालीन विद्यापीठ होते. येथे बौद्धकालीन अवशेष आजही आहेत. त्यामुळे येथे उत्खनन करण्यात यावे, अशी विनंती पुरातत्त्व विभागाला करण्यात आली होती. परंतु त्यावेळी त्यांना यावर विश्वास बसला नाही. रामटेकचे तत्कालीन खासदार तेजसिंगराव भोसले व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुनसिंग यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. त्यांनी उत्खननाला मंजुरी दिली. पुरातत्त्व विभागाच्या चमूंनी दोन वर्षे उत्खनन केल्यानंतर आपण स्वखर्चाने उत्खनन केले. पहिल्यांदा झालेल्या उत्खननात टेकडीवर तीन स्तूप आढळले. स्तूपाच्या खाली महापुरुषांचे अवशेष आणि त्याखाली बौद्धकालीन मूर्ती, सातवाहनकालीन शिलालेख मिळाले. दुसºयांदा झालेल्या उत्खननात बौद्ध विद्यापीठ आढळले. या विद्यापीठात बौद्ध भिक्खुंना धम्म आणि सदाचाराची शिकवण दिली जात होती. संपूर्ण उत्खनन जवळपास नऊ वर्षे चालले. इंग्रजांनी १७ नोव्हेंबर १९०६ ला राष्ट्रीय स्वरक्षित स्मारक म्हणून मनसर टेकडी घोषित केली होती, असेही भदंत ससाई यांनी सांगितले.
अन् नागार्जुनाने मान कापली
मनसर परिसरात सातवाहनकालीन राज्य होते. राजा यग्याश्री सातकर्णी यांच्याशी नागार्जुनांची मैत्री होती. नागार्जुन त्यांना संजीवनी औषध द्यायचे. त्यामुळे राजाचे आरोग्य उत्तम असायचे. ते चिरतरुण दिसायचे. इतकडे राजाच्या मुलाला राजा होण्याची घाई झाली. परंतु वडील म्हातारे होत नसल्याने त्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. मुलाने आईला नागार्जुन जिवंत असेपर्यंत तुझे वडील म्हातारे होणार नाही, असे सांगितले. तेव्हा नागार्जुनाला मारावे लागेल, असे ठरले. परंतु युवराजही नागार्जुनांचा मोठा आदर करीत होता. तो त्यांच्याकडे गेला आणि मला तुमची मान कापून द्या, अशी विनंती केली. नागार्जुनाने आपली मान खाली केली. परंतु युवराजांचे हात थरथर कापू लागले. तेव्हा नागार्जुन युवराजला म्हणाले, उद्या माझ्याकडे या मी एकटा असेल तेव्हा माझी मान कापून घ्या. दुसºया दिवशी सकाळी नगार्जुनांनी स्वत: आपली मान कापली. काही वेळाने युवराज त्यांची मान कापण्यासाठी गेले असता त्यांचे शीर मानेपासून वेगळे पडले होते. त्यांचे डोके नागार्जुन टेकडीवरच्या गुहेत फेकण्यात आले. तेव्हापासून त्या टेकडीला सीर पर्वत असेही म्हणतात. सीर पर्वत मनसर टेकडीपासून १० कि.मी. अंतरावर आहे.
कोण आहेत नागार्जुन?
तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ५०० ते ६०० वर्षांनी नगार्जुनाचा जन्म झाला. ते आयुर्वेद आणि रसायनाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी महायान पंथाची स्थापना केली होती. आयुर्वेदाच्या अभ्यासामुळेच ते १५० वर्षे जगल्याचे सांगितले जाते. एका ऋषीने नगार्जुनमुळे काहीतरी विपरीत होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी ते ८ ते १० वर्षाचे असताना त्यांना गुहेत नेऊन सोडले. त्यानंतर बौद्ध भिक्खूंनी त्यांचे पालनपोषण केले. पुढे नागार्जुनांनी आयुर्वेद व रसायनचा अभ्यास केला आणि ते रामटेक परिसरात स्थायिक झाले.
 

Web Title:  Nagarjunas remnants found in Mansar excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.