बहिणीसोबत बोलताना दिसल्यामुळे केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:30 PM2018-09-07T22:30:10+5:302018-09-07T22:31:51+5:30

बहिणीसोबत गुजगोष्टी करीत दिसल्याने आॅटोचालक अमरेंद्र ऊर्फ मोनूसिंग परमेंद्रसिंग (वय २०) संतप्त झाला. त्यामुळे त्याने आधी बहिणीला बदडले आणि नंतर भरतसिंग शिवनारायण धाकड (वय २०) याची निर्घृण हत्या केली. एमआयडीसीतील गजाननगर, राजीवनगरात गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडलेल्या हत्याकांडाचे कारण आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर पुढे आले आहे.

Murdered due to the conversation with the sister | बहिणीसोबत बोलताना दिसल्यामुळे केली हत्या

बहिणीसोबत बोलताना दिसल्यामुळे केली हत्या

Next
ठळक मुद्देआरोपीचे गुन्हेशाखेत आत्मसमर्पण : एमआयडीसी पोलिसांनी घेतला ताबा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीसोबत गुजगोष्टी करीत दिसल्याने आॅटोचालक अमरेंद्र ऊर्फ मोनूसिंग परमेंद्रसिंग (वय २०) संतप्त झाला. त्यामुळे त्याने आधी बहिणीला बदडले आणि नंतर भरतसिंग शिवनारायण धाकड (वय २०) याची निर्घृण हत्या केली. एमआयडीसीतील गजाननगर, राजीवनगरात गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडलेल्या हत्याकांडाचे कारण आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर पुढे आले आहे.
मृत धाकड ग्वाल्हेर येथील मूळ निवासी असून, काही वर्षांपूर्वी त्याचा मोठा भाऊ सुरेंद्रसिंग शिवनारायण धाकड (वय ३०) हा रोजगाराच्या शोधात नागपुरात आला. येथे तो भाड्याचा आॅटो चालवित होता. बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने त्याने भरतसिंगला येथेच बोलवून घेतले. त्यानंतर त्यालाही एक भाड्याचा आॅटो घेऊन दिला. आरोपी मोनूसिंगसुद्धा आॅटो चालवितो. त्यामुळे त्याची भरतसिंगसोबत ओळख झाली होती. मैत्री घट्ट झाल्यामुळे तो मोनूच्या घरी येऊ लागला. त्यामुळे मोनूच्या बहिणीसोबत त्याचे सूत जुळले. तशात भरतसिंग हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्याविरुद्ध मोबाईल हिसकावून नेल्याचा तसेच त्यामुळे तो दीड महिना कारागृहात होता, अशी माहिती मोनूला कळली. तशात त्याचे बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने मोनूने भरतसिंगसोबत मैत्री तोडली. त्याला आपल्या घरी यायचे नाही आणि बहिणीसोबत भेटायचे, बोलायचे नाही, असे बजावले. बहिणीलाही त्याने समजावून सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद वाढला. तो कळताच सुरेंद्रसिंगने भाऊ भरतसिंगला आधी स्वत:च्या पायावर उभा हो आणि नंतर लफडे कर, असे म्हणत सहा महिन्यांपूर्वी गावाला पाठविले.
आॅनलाईन संपर्काने केला घात
भरतसिंग गावाला गेला असला तरी तो मोनूच्या बहिणीच्या आॅनलाईन संपर्कात होता. त्यामुळे तो तीन दिवसांपूर्वी गावाहून परतला आणि भावाला माहीत न होऊ देता परस्पर रोहित नामक मित्राच्या रुमवर राहू लागला. गुरुवारी रात्री मोनूच्या दोन्ही बहिणी रोहितच्या रूमवर भरतसिंगला भेटायला गेल्या. त्याची माहिती कळताच मोनू तेथे पोहचला. एकाच रूममध्ये बहिणीसोबत भरतसिंग गुजगोष्टी करताना दिसल्याने चिडलेल्या आरोपी मोनूने आधी बहिणीचे केस धरून तिला मारहाण केली. त्यानंतर भरतसिंगवर नेलकटरमधील चाकूने वार केले. तशाच अवस्थेत आपल्या आॅटोत बसवून बहीण आणि भरतसिंगला त्याने राजीवनगरात आणले.त्यानंतर जखमीला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी धाकडला मृत घोषित केले. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस घटनास्थळी धावले. तत्पूर्वीच आरोपी फरार झाला. दरम्यान, सुरेंद्रसिंग धाकडच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

मुख्यालयातून हलले सूत्र
फरार आरोपी मोनूचा एक वादग्रस्त मित्र पोलीस दलात असून तो सध्या मुख्यालयात कार्यरत आहे. आरोपी मोनूने त्याच्याशी फोनवरून संपर्क केला. झालेल्या घटनेची माहिती दिली. हत्याकांडातील आरोपीचा फोन आल्याने ‘आनंदलेल्या’ मित्राने एमआयडीसी पोलिसांना कळविण्याऐवजी आज सकाळी गुन्हेशाखेसोबत संपर्क करून आरोपीच्या आत्मसमर्पणाची योजना बनविली. दरम्यान, आरोपीचे लोकेशन कळाल्याने एमआयडीसी पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी तिकडे जात असताना हवलदाराच्या दुचाकीचे पेट्रोल संपले अन् मुख्यालयातील मित्रासोबत आरोपी गुन्हेशाखेत पोहचला. औपचारिकता पार पाडल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यातून एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आरोपी मोनूसिंगचा ताबा घेऊन त्याला दुपारी ४ वाजता अटक केली. शनिवारी त्याला कोर्टात हजर करून त्याचा पीसीआर मिळवला जाणार आहे.

 

Web Title: Murdered due to the conversation with the sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.