दोन वर्षांतच ‘मायनर ओटी’ची दुर्दशा

By admin | Published: April 6, 2016 03:20 AM2016-04-06T03:20:39+5:302016-04-06T03:20:39+5:30

डोळ्यांच्या गंभीर दुखापतीवर अद्ययावत सेवा मिळण्यासाठी ३५ लाख रुपये खर्चून मेडिकलच्या नेत्ररोग

Minor OT's plight in two years | दोन वर्षांतच ‘मायनर ओटी’ची दुर्दशा

दोन वर्षांतच ‘मायनर ओटी’ची दुर्दशा

Next

मेडिकलचा नेत्ररोग विभाग : इमारतीला तडे गेले
नागपूर : डोळ्यांच्या गंभीर दुखापतीवर अद्ययावत सेवा मिळण्यासाठी ३५ लाख रुपये खर्चून मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला किरकोळ शस्त्रक्रिया कक्षाचा (मायनर ओटी) ताबा २०१३ मध्ये मिळाला. परंतु सहा महिन्यातच या ओटीच्या इमारतीला तडे गेले. सध्याच्या स्थितीत या इमारतीत काम करणे कठीण झाल्याने अखेर बांधकाम विभागाने बुधवारपासून इमारतीच्या डागडुजीचे कार्य हाती घेतले आहे. दोन वर्षांतच इमारतीची दुर्दशा झाल्याने बांधकामाला घेऊन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेत्ररोग विभागामध्ये येणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना त्याच ठिकाणी तत्काळ व अद्ययावत उपचार मिळावा यासाठी ‘मायनर ओटी’ला राज्यशासनाने मंजुरी दिली. २०१०-११ मध्ये सुमारे ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. निधी प्राप्त झाल्याने नवीन नेत्ररोग विभागाच्या बाजूलाच सुमारे दोन हजार स्क्वेअरफूटवर बांधकामाला सुरुवात झाली. दोन वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. मात्र दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळाला नसल्याचे कारण पुढे करीत बांधकाम विभागाने ही ओटी कुलूपात बंद ठेवली. याच दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ओटीचे लोकार्पण झाले, मात्र, नेत्ररोग विभागाला ओटीचा ताबा मिळायला तब्बल एक वर्ष लागले. सहा महिने होत नाही तोच मायनर ओटीला भेगा पडणे सुरू झाले. या संदर्भाची माहिती तत्कालीन अधिष्ठात्यांना देण्यात आली. परंतु कारवाई झालीच नाही. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या भेगांमुळे इमारतीत काम करणे कठीण झाल्याने नेत्ररोग विभागाने या संदर्भातील एक पत्र बांधकाम विभागाला दिले. विभागाने याची पाहणी करून दुरुस्तीसाठी काही दिवस ओटी बंद ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार बुधवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला जबाबदार कोण, हा प्रश्न अद्यापही अधांतरी आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Minor OT's plight in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.