जीएसटी उपायुक्तांना लाच घेताना अटक; नागपूर सीबीआय, एसीबीची अमरावतीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:05 PM2018-02-16T13:05:00+5:302018-02-16T13:05:13+5:30

कराचा (जीएसटी) भुर्दंड चुकविण्यासाठी एका व्यक्तीला दीड लाखांची लाच मागणारे अमरावती येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नवीन केंद्रीय जीएसटी कार्यालय) उपायुक्त मुकुल विश्वास तेलगोटे यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले.

GST Deputy Commissioner arrested for taking bribe; Action in Amravati of CBI, ACB, Nagpur | जीएसटी उपायुक्तांना लाच घेताना अटक; नागपूर सीबीआय, एसीबीची अमरावतीत कारवाई

जीएसटी उपायुक्तांना लाच घेताना अटक; नागपूर सीबीआय, एसीबीची अमरावतीत कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देदीड लाख स्वीकारले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कराचा (जीएसटी) भुर्दंड चुकविण्यासाठी एका व्यक्तीला दीड लाखांची लाच मागणारे अमरावती येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नवीन केंद्रीय जीएसटी कार्यालय) उपायुक्त मुकुल विश्वास तेलगोटे यांना गुरुवारी रात्री रंगेहात पकडण्यात आले. सीबीआयच्या नागपूर युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अमरावती शहरात ही कारवाई केली. मात्र, संपर्क करूनही उशिरापर्यंत याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवसारीस्थित केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयातील उपायुक्त (आयआरएस) मुकुल तेलगोटे यांनी अमरावतीत खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या संचालकांना जीएसटीबाबत विचारणा केली होती. ते कर भरण्याचे टाळत असल्याचे ध्यानात आल्यामुळे त्यांनी एकाला कर कमी करण्याच्या बदल्यात दीड लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने त्याची तक्रार अमरावती एसीबीच्या युनिटकडे केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ते केंद्रीय स्तरावरील अधिकारी असल्याने त्याची माहिती नागपूर सीबीआयला देण्यात आली. गुरुवारी नागपूर सीबीआय युनिटने अमरावतीत सापळा रचून मुकुल तेलगोटेंना दीड लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याची माहिती अमरावती, नागपूरच नव्हे तर सर्वत्र  वेगाने पसरली. त्यामुळे जीएसटी कार्यालय व व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या संबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सध्या कारवाई सुरू आहे. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय माहिती देणे योग्य नसल्याचे म्हटले. सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावतीच्या गौरी इन हॉटेलमध्ये तेलगोटेसह प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू होती.

 

Web Title: GST Deputy Commissioner arrested for taking bribe; Action in Amravati of CBI, ACB, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा