भूजल पातळी सव्वादोन फुटांनी घसरली : कामठी खैरी धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 09:30 PM2019-06-13T21:30:44+5:302019-06-13T21:34:37+5:30

जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. धरणांनी तळ गाठला आहे. नागपुरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन फुटांनी खाली आली आहे. कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात पाऊस बरसला नाही, तर पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Groundwater levels fall by two and quarter ft: The base reached by Kamathi Khairi Dam | भूजल पातळी सव्वादोन फुटांनी घसरली : कामठी खैरी धरणाने गाठला तळ

गोरेवाडा तलाव कोरडा झाल्याने तलावातील विहीर दिसून आली आहे.

Next
ठळक मुद्देतोतलाडोह, गोरेवाडा तलाव कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. धरणांनी तळ गाठला आहे. नागपुरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन फुटांनी खाली आली आहे. कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात पाऊस बरसला नाही, तर पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विभागातील धरणांची परिस्थिती भयावह झाली आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही २९६४.४३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला म्हणजे १३ जून रोजी केवळ १८३.७८ दलघमी म्हणजेच केवळ ६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यात नागपूर जिल्ह्यातील पाच मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या पाचपैकी तोतलाडोह व लोवर वणा हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तोतलाडोह प्रकल्पाचा साठा १०१६ दलघमी इतका आहे. तर लोवर वणाचा साठा ५३ दलघमी इतका आहे. या दोन्ही प्रकल्पात ० टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरित धरणांची स्थितीही वेगळी नाही. कामठी खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची क्षमता १४१.७४ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या घडीला ३३.६३ दलघमी म्हणजेच २४ टक्के इतकेच पाणी आहे. रामटेक धरणाची क्षमता १०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ७.९२ दलघमी म्हणजेच ८ टक्के इतका साठा आहे. वडगाव धरणाची क्षमता १३५ दलघमी इतकी असून त्यात केवळ १५.१२ दलघमी म्हणजेच ११ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांसोबतच मध्यम प्रकल्पांची स्थितीही वाईट आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकारचे प्रकल्प (धरणे) आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. त्यात १३ जून रोजीपर्यंत केवळ १८.१२ दलघमी म्हणजेच केवळ ९ टक्के इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.
पाऊस न पडल्याने एकीकडे धरणे आटली आहेत, तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील भूजलाची पातळीसुद्धा घसरली आहे. यंदा ती ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन मीटरने खाली आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता लवकरच पाऊस न आल्यास ही परिस्थिती भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोरेवाडा तलावातील विहीर पडली उघडी
नागपूर शहरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव हा कधीच आटलेला दिसला नाही. आज हा तलाव कोरडा पडला आहे. परिसरातील अनेक लोक गोरेवाडा जंगलात पहाटे फिरायला जातात. त्यांना ही विहीर दिसल्याने त्यांनाही आश्चर्य वाटले. पसिरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक तभाने हे सुद्धा येथे फिरायला येतात. त्यांनी सांगितले की, गोरेवाडा हा तलाव १०० वर्षे जुना आहे. इंग्रजांनी तो बांधला. तलाव कधीच आटलेला आम्ही पाहिला नाही. परंतु आज तलाव आटल्याने येथे एक सुस्थितीत असलेली विहीर आढळून आली. काही जुन्या मंडळींनी सांगितल्यानुसार पूर्वी तलावाच्या परिसरात वस्ती होती. त्यासाठीच ती विहीर बांधलेली होती. इंग्रजांनी तलाव बांधण्यासाठी वस्ती हटविली. आज तलाव कोरडा पडल्याने येथे वस्ती असल्याची साक्ष ही विहीर देत आहे.
१११ विहिरींच्या निरीक्षणातून भूजल पातळीची नोंद
नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यातील १११ विहिरींच्या निरीक्षणातून आणि मागील पाच वर्षांच्या तुलनात्मक सरासरीतून नोंदवली जाते. जिल्ह्यातील १११ निरीक्षण विहिरी आहेत. त्यांचे वर्षातून चारवेळा निरीक्षण करून तसा अहवाल तयार केला जातो. हे निरीक्षण सप्टेंबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात केले जाते. त्या आधारावर पाणीटंचाईचा अहवाल तयार केला जातो. मे महिन्यात करण्यात आलेले निरीक्षण आणि मागील पाच वर्षातील भूजल पातळीची तुलना करून सरासरी भूजल पातळीची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ८.४६ मीटर इतकी आहे. ती ०.६८ मीटर म्हणजेच दोन फुटांनी खाली घसरली आहे. तालुकानिहाय विचार केला असता भिवापूर ०.६७ मीटर, हिंगणा ०.६६ मीटर, कळमेश्वर ०.५४ मीटर, कामठी ०.७२ मीटर, काटोल ०.६४ मीटर, कुही ०.३८ मीटर, मौदा ०.९४ मीटर, नागपूर ०.०९ मीटर, नरखेड १.२९ मीटर, पारशिवनी ०.४९ मीटर, रामटेक १.१३ मीटर, सावनेर ०.७१ मीटर आणि उमरेड तालुक्यातील ०.५७ मीटरने भूजल पातळी खाली घसरली आहे.
रामटेक-नरखेडला काटकसरीची गरज
नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाली असली तरी महाराष्ट्राच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याला फार चिंता करण्याची गरज नाही. १ ते २ मीटर पाणी पातळी कमी झाली तरी ती चिंताजनक समजली जात नाही. ती सांभाळून घेता येते. नागपुरातील एकाही तालुक्यात तशी परिस्थिती नाही. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी काही जाणकारानुसार येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास नरखेड व रामटेक तालुक्याला जून व जुलै महिन्यापर्यंत पाण्याची काटकसर करावी लागेल. तसेच मौद्यालाही किमान जून महिन्यापर्यंत तरी पाण्याच्या काटकसरीची आवश्यकता आहे.
पाच वर्षातील सर्वात भयावह स्थिती
नागपूर विभागाचा विचार केल्यास पाणीसाठ्यााबत मागील पाच वर्षात यंदा सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. विभागातील एकूण १८ मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह, नांद, दिना, पोथरा, गोसेखुर्द टप्पा १, व बावनथडी प्रकल्प कोरडे पडले आहेत.

वर्ष        मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा (१३ जून रोजी)
२०१९ - १८३.७८ दलघमी
२०१८ - ४०५ दलघमी
२०१७ - ३०३ दलघमी
२०१६ - ६७६ दलघमी
२०१५ - ७०९ दलघमी
२०१४ - १४४२ दलघमी

Web Title: Groundwater levels fall by two and quarter ft: The base reached by Kamathi Khairi Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.