असंघटित क्षेत्रातील श्रमिकांच्या सक्षमीकरणाचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:01 PM2018-09-19T21:01:46+5:302018-09-19T21:07:06+5:30

संघटित-असंघटित व ग्रामीण भागातील कामगारांच्या अधिकार जागृती व सक्षमीकरणासाठीच केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती. त्यानुसार गेल्या ६० वर्षांत मंडळाने ४ लाख ८१ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून दीड कोटी श्रमिकांना प्रशिक्षणाने सक्षमीकरण केले आहे. संघटित कामगारांमध्ये त्यांच्या अधिकारांबाबत बऱ्यापैकी जागृती करण्यात आम्ही यश मिळविले आहे. मात्र असंघटित क्षेत्र आणि ग्रामीण भागातील श्रमिकांचे प्रश्न आहेत. त्यामुळे आता मंडळाच्या अखत्यारितील ८० टक्के काम असंघटित व ग्रामीण भागातील श्रमिकांसाठी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. दत्तोपंत ठेंगडी  राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास मंडळाचे नवनियुक्त संचालक हर्ष वैद्य यांनी लोकमतशी बोलताना मंडळाचे कार्य आणि वर्तमान व भविष्यातील योजनांची माहिती दिली.

The goal of empowering workers in the unorganized sector | असंघटित क्षेत्रातील श्रमिकांच्या सक्षमीकरणाचे लक्ष्य

असंघटित क्षेत्रातील श्रमिकांच्या सक्षमीकरणाचे लक्ष्य

Next
ठळक मुद्देश्रमिक शिक्षण मंडळाचे संचालक हर्ष वैद्य : लोकमतशी खास मुलाखत

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघटित-असंघटित व ग्रामीण भागातील कामगारांच्या अधिकार जागृती व सक्षमीकरणासाठीच केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती. त्यानुसार गेल्या ६० वर्षांत मंडळाने ४ लाख ८१ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून दीड कोटी श्रमिकांना प्रशिक्षणाने सक्षमीकरण केले आहे. संघटित कामगारांमध्ये त्यांच्या अधिकारांबाबत बऱ्यापैकी जागृती करण्यात आम्ही यश मिळविले आहे. मात्र असंघटित क्षेत्र आणि ग्रामीण भागातील श्रमिकांचे प्रश्न आहेत. त्यामुळे आता मंडळाच्या अखत्यारितील ८० टक्के काम असंघटित व ग्रामीण भागातील श्रमिकांसाठी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. दत्तोपंत ठेंगडी  राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास मंडळाचे नवनियुक्त संचालक हर्ष वैद्य यांनी लोकमतशी बोलताना मंडळाचे कार्य आणि वर्तमान व भविष्यातील योजनांची माहिती दिली.
हर्ष वैद्य हे १९९५ बॅचचे आयएएस अधिकारी असून, यापूर्वी ते अंबाझरी ग्रुप आॅफ फॅक्टरीजचे कन्ट्रोलर आॅफ फायनान्स म्हणून कार्यरत होते. केंद्र शासनाने नुकतीच त्यांची श्रमिक शिक्षण मंडळाच्या संचालक पदावर नियुक्ती केली. मंडळाचे कार्य ६ विभागीय, ५० क्षेत्रीय संचालनालय आणि ७ उपक्षेत्रीय संचालनालयाच्या माध्यमातून भारतभर पसरले आहे. मंडळाचे मुख्यालय नागपूरला असून, मुंबई येथे श्रमिक शिक्षण संस्था आहे. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून पूर्वोत्तर राज्यांमध्येही मंडळाचे कार्य विस्तारले आहे. हर्ष वैद्य यांनी सांगितले, यावर्षी मंडळातर्फे ११ हजार कार्यक्रमातून चार लाख श्रमिकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे आमचे दरवर्षीचे लक्ष्य राहील. देशातील ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे आणि या भागात असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान ४६ टक्के आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजनांचा लाभ पोहचविणे हे आमचे मुख्य दायित्व असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी कामगार प्रशिक्षणाच्या एका कार्यक्रमावर १० हजार रुपये मिळायचे, मात्र या निधीत २४ हजारापर्यंत वाढ झाल्याने प्रशिक्षण अधिक सुचारू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काम सोडून प्रशिक्षणाला येणाऱ्या श्रमिकांनाही याचा लाभ होईल. पूर्वोत्तर राज्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळाकडे कर्मचारी आणि श्रमिकांना प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या ४० टक्के कमी आहे. मात्र अशा परिस्थितीतही मंडळाचे प्रशिक्षक ग्रामीण भागात व असंघटित क्षेत्रातील श्रमिकांपर्यंत पोहचून त्यांना प्रशिक्षण देत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मंडळाचे कार्य व उद्देश
श्रमिकांना डिजिटल इंडियाबाबत साक्षर करणे, विविध कामांसाठी डायरेक्ट बेनिफिट योजना(डीबीटी)बाबत प्रशिक्षित करणे, मनरेगा व इतर कल्याणकारी योजनांबाबत माहिती देणे व त्यांच्या अधिकाराबाबत जागृत करणे या प्रमुख गोष्टी आहेत. याशिवाय श्रमिकांना रोजगाराबाबत प्रशिक्षण देणे, संघटनांच्या सदस्यांना प्रशिक्षण, त्यांच्यात नेतृत्वक्षमता निर्माण करणे, महिला श्रमिकांसाठी विशेष प्रशिक्षण, श्रमिकांना स्वयंकोष निर्मितीसाठी प्रेरित करून सहाय्य करणे, अनुसूचित जाती-जनजातींसाठी विशेष कार्यक्रम, बालश्रमिकांसाठी शिक्षणाचे कार्यक्रम, एड्स जनजागृती असे १ ते ३ दिवसांपासून ४५ दिवस व सहा महिन्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम मंडळातर्फे राबविले जात आहेत. रोजगारापासून बँकेतील कामकाज व समूहाने उद्योग स्थापनेपर्यंतचे सर्व प्रशिक्षण दिले जात असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

अभिनव स्वयंसहाय्यता ग्रुप
मंडळातर्फे ग्रामीण भागातील शेती कामगार, उद्योग कामगार, बचत गट अशा विविध क्षेत्रातील अनेक कामगारांना एकत्र आणून स्वयंसहाय्यता ग्रुप तयार केला जात आहे. कोल्हापूर क्षेत्रात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. या ग्रुपद्वारे रिअल रुरल बँक आॅफ इंडिया (आरआरबीआय)ची स्थापना करण्यात आली. आज या बँकेचा टर्नओव्हर एक कोटीपर्यंत पोहचला आहे. मंडळाच्या प्रशिक्षकांनी यात मोलाची भूमिका बजावली आहे. विशाखापट्टणममध्ये अशीच सीड बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. असे अभिनव उपक्रम सर्वत्र राबविण्याचा मानस वैद्य यांनी व्यक्त केला.

स्वच्छता अभियानाला सुरुवात
मंडळातर्फे १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण मुख्यालयाची स्वच्छता करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात आसपासच्या वस्त्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: The goal of empowering workers in the unorganized sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.