Four lakh lacs fraudulently taken out from the retired judge of the Supreme Court's bank account | सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून साडेचार लाख लंपास
सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून साडेचार लाख लंपास

ठळक मुद्देसायबर गुन्हेगाराची बनवाबनवीनागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून चक्क साडेचार लाख रुपये आॅनलाईन वळते करून घेतले. ५ नोव्हेंबरला घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास केला. त्यानंतर गुरुवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
विकास श्रीधर शिरपूरकर (वय ७२) हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होय. धरमपेठमधील देवालय, खरे टाऊन येथे ते राहतात. त्यांच्या मोबाईलवर ५ नोव्हेंबरला सकाळी ८४२०० ७९७७६ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने मी एसबीआयच्या दिल्ली मुख्यालयात व्यवस्थापक आहोत. आपले नाव राकेश वर्मा आहे, असे त्याने सांगितले. तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड एक्स्पायर होत आहे. त्यामुळे नवीन कार्ड मिळवण्यासाठी (रिनिवल करण्यासाठी) माहिती सांगा, असे म्हणत आरोपीने त्यांच्याकडून कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर शिरपूरकर यांच्या मोबाईलवर ओटीपी नंबर आला. तो विचारून शिरपूरकर यांच्या विविध बँक खात्यातून आरोपीने ४ लाख, ४९ हजार, ७६० रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिरपूरकर यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला. चक्क निवृत्त न्यायाधीशाच्या बँक खात्यावरच सायबर गुन्हेगाराने डल्ला मारल्याने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सायबर सेलने सुरू केला. प्रदीर्घ तपासानंतर या प्रकरणात गुरुवारी हात घातल्याने सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कलम ४२०, ४१९ तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 


Web Title: Four lakh lacs fraudulently taken out from the retired judge of the Supreme Court's bank account
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.