व्यासपीठावरून अभिव्यक्त झाला डिजिटल साहित्याचा प्रवाह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:49 PM2019-02-18T22:49:43+5:302019-02-18T22:51:16+5:30

समूह माध्यमे आणि डिजिटल माध्यमांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले असताना साहित्य क्षेत्र यापासून वेगळे ते कसे राहिले? साहित्याचे शेकडो पोर्टल या डिजिटल जगात आपल्याला पहावयास मिळतात. त्यातीलच एक म्हणजे बुक हंगामा डॉट कॉम हे वेबपोर्टल व नुक्कड हे वेबपेज. याचे प्रवर्तक विक्रम भागवत यांनी जगभरातल्या मराठी लेखकांना त्यांचे लेखन डिजिटल माध्यमांवर मांडण्यासाठी एक ऑनलाईन व्यासपीठ दिले असून त्याचअंतर्गत नुक्कड साहित्य संमेलनाचे आयोजन करून चर्चेचे व्यासपीठही दिले आहे.

The flow of digital literature that was released from the platform | व्यासपीठावरून अभिव्यक्त झाला डिजिटल साहित्याचा प्रवाह 

व्यासपीठावरून अभिव्यक्त झाला डिजिटल साहित्याचा प्रवाह 

Next
ठळक मुद्देनुक्कडच्या वैशिष्ट्यपूर्ण संमेलनाचे यशस्वी आयोजन : ऑनलाईन लेखकांचा उत्स्फूर्त मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समूह माध्यमे आणि डिजिटल माध्यमांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले असताना साहित्य क्षेत्र यापासून वेगळे ते कसे राहिले? साहित्याचे शेकडो पोर्टल या डिजिटल जगात आपल्याला पहावयास मिळतात. त्यातीलच एक म्हणजे बुक हंगामा डॉट कॉम हे वेबपोर्टल व नुक्कड हे वेबपेज. याचे प्रवर्तक विक्रम भागवत यांनी जगभरातल्या मराठी लेखकांना त्यांचे लेखन डिजिटल माध्यमांवर मांडण्यासाठी एक ऑनलाईन व्यासपीठ दिले असून त्याचअंतर्गत नुक्कड साहित्य संमेलनाचे आयोजन करून चर्चेचे व्यासपीठही दिले आहे.
संमेलनाच्या आयोजनातील एक सदस्या मंजूषा अनिल यांनी या वैशिष्ट्यपूर्ण संमेलनाविषयी सांगितले. या नुक्कड लेखकांचे तिसरे साहित्य संमेलन नागपूरला झाले. पुणे व औरंगाबादनंतर हे संमेलन नागपूरला घ्यावे, हा त्यांचा विचारही महत्त्वाचाच. हे साहित्याचे संमेलन असले तरी परंपरागत साहित्य संमेलनापेक्षा वेगळे होते. अध्यक्ष, स्वागत, हारतुरे, दिंडी किंवा तसले काही नाही. नागपूरच्या संमेलनाचे उद्घाटनही असेच झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वसंत आबाजी डहाके यांचे मार्गदर्शन, गणेश कनाटे यांचे बीजभाषण व कथावाचनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. नुक्कड हा दीडशे लेखक व कवींचा आणि लाखो ऑनलाईन वाचकांचा परिवार. बुक हंगामाअंतर्गत कथा लेखनाचे नुक्कड पोर्टल, कवितेसाठी ‘एक पान कवितेचे’, खास पुरुषांसाठी ‘मिशी’, ‘एफसी रोड’ हे मॅगझीनचे आणि ‘न लिहिलेले पत्र’ हे वेगळ्या विषयावरचे पोर्टल. या विविध पोर्टलवर व्यक्त होणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर सिंगापूरपासूनचे लेखक संमेलनात सहभागी झाले होते.
नागपूरच्या संमेलनापासून कथा अभिवाचनाचा वेगळा प्रयोग सुरू करण्यात आल्याचे मंजुषा यांनी सांगितले. आणखी विशेष म्हणजे या संमेलनाच्या संयोजिका स्वाती धर्माधिकारीपासून सर्व विदर्भाच्या लेखकांच्या कथा अभिवाचन कार्यक्रमात सादर झाल्या. हा नवीन प्रयोग लेखकांना व श्रोत्यांनाही आवडला. दुसरीकडे यावेळी झाडीपट्टीचे नाटककार व अभ्यासक सदानंद बोरकर यांच्या झाडीपट्टीवरील विशेष कार्यक्रमाची भर यामध्ये पडली. विदर्भाबद्दल फार ज्ञान नसलेल्या लेखकांना एवढ्या मोठ्या रंगभूमीच्या अस्तित्वाची जाणीव बोरकर यांच्या व्याख्यानाने झाली. नुक्कडसाठी भावनिक क्षण होता तो डॉ. प्राजक्ता हसबनीस यांच्या ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत कार्यक्रमाचा. आपल गाणंच विस्मृतीत गेल्याची भीती बाळगणाऱ्या या गायिकेने अप्रतिमपणे हा कार्यक्रम केला. श्रोतेही भारावले पण ‘मला माझ गाणं आठवलं’ हे डॉ. हसबनीस यांचे मनोगत सर्वांना भावनिक करणारे होते. संमेलनादरम्यान आयोजित कविसंमेलनाने तर भरभरून दाद मिळविली.
विक्रम भागवत आणि माधवी वैद्य यांनी यापुढे नुक्कडवर वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचा आढावा समारोपीय सत्रात घेतला. देशविदेशातील साहित्यप्रकार आणि इतर भारतीय भाषांमधील साहित्य अनुवादित करून सादर करण्याला प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्याच्या डिजिटल प्रवाहाचे दर्शन घडविणाऱ्या या साहित्य संमेलनाचे खऱ्या अर्थाने सूप वाजले.

Web Title: The flow of digital literature that was released from the platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.