नागपुरातील जय श्रीराम अर्बन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:03 AM2019-07-15T11:03:38+5:302019-07-15T11:06:24+5:30

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Filing a case on Jai Shriram Urban Society in Nagpur | नागपुरातील जय श्रीराम अर्बन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागपुरातील जय श्रीराम अर्बन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे आदेशानंतर पोलीस सक्रियसव्वाचार कोटींचा घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुंतवणूकदारांची रक्कम हडपण्याच्या या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी संशयास्पद भूमिका वठविली होती. परिणामी गुंतवणूकदार न्यायालयात गेले आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.
खेमचंद सीतारामजी मेहरपुरे (वय ५८), योगेश मनोहर चरडे (वय ३७) आणि सुनीता केशवराव पोळ (वय ४२), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील मेहरपूरे सोसायटीचे अध्यक्ष, चरडे उपाध्यक्ष तर सुनीता पोळ व्यवस्थापक म्हणून काम करीत होत्या.
गणेशनगर कोतवालीतील अग्रगण्य सोसायटी म्हणून जय श्रीराम अर्बन सोसायटीकडे बघितले जात होते. या सोसायटीत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह वेगवेगळया ठिकाणी काम करणारे नोकरदार, टपरीवाले, भाजी, फळ विक्रेते, वाहनचालक गुंतवणूक करीत होते. सोसायटीच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडून विविध गुंतवणुकीच्या योजनांचे मृगजळ निर्माण करण्यात आले होते. गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले जायचे. त्यामुळे कुणी एफडी, कुणी आरडी तर कुणी दैनंदिन बचतीतून आपल्या घामाची कमाई सोसायटीत जमा केली होती. दोन वर्षांतच या सोसायटीने हजारो गुंतवणूकदार जमविले होते. डिसेंबर २०१६ पर्यंत सोसायटीचे कामकाज सुरळीत होते; मात्र नंतर सोसायटीतील आर्थिक घोटाळ्याची कुजबूज सुरू झाली. ठराविक मुदत भरल्यानंतर गुंतवणूकदार आपली रक्कम परत घेण्यास गेले असता, सोसायटीचे पदाधिकारी आणि अधिकारी त्यांना टाळू लागले. आपली रक्कम आपल्याला परत मिळत नसल्याचे पाहून हळूहळू गुंतवणूकदारांचा रोष वाढत गेला. फेब्रुवारी २०१९ मध्ये यासंबंधाने सोसायटीतील संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर घोटाळ्याची ओरड सुरू झाली. गुंतवणूकदारांनी सोसायटीच्या अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह व्यवस्थापकांवरही आरोप लावत कोतवाली पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्या; मात्र पोलिसांनी या प्रकरणात संशयास्पद भूमिका वठविली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा रोष आणखीच वाढला. सोसायटीच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर गुंतवणूकदार निदर्शने करू लागले. घेरावही करण्यात आला. पोलीस ठाण्यालाही दोनवेळा संतप्त गुंतवणूकदारांनी घेराव घातला, तरीदेखील पोलिसांनी या प्रकरणात शांतपणा दाखविला.
त्यामुळे गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही पक्षाची बाजू समजून घेतल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक खरसान यांनी शनिवारी रात्री या प्रकरणात दिनेश वासुदेवराव पडेगावकर (वय ५५, रा. तुळशीबाग, महाल) यांची तक्रार नोंदवून घेतली आणि सोसायटीचे अध्यक्ष आरोपी खेमचंद मेहरपुरे, उपाध्यक्ष योगेश चरडे आणि व्यवस्थापिका सुनीता पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अवैध सावकाराची मुख्य भूमिका
सुस्थितीत असलेल्या या सोसायटीतील घोटाळ्यात एका अवैध सावकाराची मुख्य भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे. अध्यक्ष तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांनी अवैध सावकाराला सोसायटीचे दार मोकळे करून दिल्याने त्याने थेट बँक व्यवहारातच ढवळाढवळ सुरू केली. त्याचमुळे या सोसायटीचा आर्थिक ताळेबंद बिघडल्याची ओरड आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी या सोसायटीत ४ कोटी २६ लाख २१ हजार ९६४ रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. घोटाळ्याची रक्कम ध्यानात घेता या प्रकरणाचा तपास गुन्हे आर्थिक शाखेकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Filing a case on Jai Shriram Urban Society in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.