नागपूर जिल्ह्यातील बडेगावनजीक अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 08:53 PM2017-12-01T20:53:09+5:302017-12-01T20:59:24+5:30

अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या  भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते.

A farmer killed due to illegal sand transports at Badegaon in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील बडेगावनजीक अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

नागपूर जिल्ह्यातील बडेगावनजीक अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा रस्तारोको, ट्रक जाळण्याचा प्रयत्नट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले

आॅनलाईन लोकमत

नागपूर : अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या  भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते. मात्र, पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
दामोदर साधू बेंदरे (५५, रा. बडेगाव, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दामोदर बेंदरे हे सायकलने शेतातून घरी परत येत होते. दरम्यान, गावाजवळ रेती घेऊन जात असलेल्या एमएच-४०/वाय-३९०० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला मागून धडक दिली. ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले तर सायकल काही दूरवर फरफटत गेली. अपघाताच्या आवाजाचे गावातील चौकात बसलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. नागरिकांनी बेंदरे यांनी लगेच नजीकच्या रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
रेतीवाहतुकीला आधीच विरोध असल्यामुळे या अपघाताने नागरिक संतप्त झाले. काहींनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्यातच काहींनी रोडवर टायर पेटविले होते. या प्रकारामुळे बडेगाव येथे तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. या अपघातामुळे बडेगाव - टेंभूरडोह मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होता. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक सावन राजू वासनिक (२८, रा. कोराडी, ता. कामठी) यास नंतर अटक केली.

रेतीवाहतूक बंद करण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच खाप्याच्या ठाणेदार अनामिका मिर्झापुरे, तहसीलदार राजू रणवीर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय, दंगा नियंत्रण पथकालाही बोलावण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी तहसीलदार रणवीर यांच्याकडे बडेगाव मार्गे होणारी रेतीची संपूर्ण वाहतूक कायमची बंद करा, अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालक व मालकाविरुद्ध कठोर कारवाई करा तसेच या भागात चौकी सुरू करण्याची मागणी रेटून धरली होती. तहसीलदारांनी तिन्ही मागण्या मान्य करीत मृताच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.

रेती वाहतुकीचा मार्ग बदलविला
टेंभूरडोह शिवारातील कालव्याच्या पुलावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. तरीही हा ट्रक रेती घेऊन खेकरानाला पुलावरून बडेगाव मार्गे जात होता. विशेष म्हणजे, या मार्गे सतत रेतीची वाहतूक केली जाते. बडेगाव येथे अपघातामुळे तणाव असल्याची माहिती मिळताच चालकांनी रेतीच्या सर्व ट्रकचा मार्ग ऐनवेळी बदलला. बडेगाव मार्गे येणारे सर्व ट्रक परत मालेगाव (ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश) रेतीघाटात गेले आणि तिथून सावनेर मार्गे नियोजित ठिकाणी गेले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
टेंभूरडोह शिवारातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्यावरील पुलावरून रेतीची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले होते. या मार्गाने मध्य प्रदेशातील रेती सावनेर तालुक्यात आणली जाते. ओव्हरलोड रेतीवाहतुकीमुळे कालव्यावरील पूल कोसळण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, महसूल व पाटबंधारे विभागाचे ही वाहतूक बंद करण्यासाठी फलक लावण्याशिवाय काहीही केले नाही. वाहतूक रोखण्यासाठी पुलावर सिमेंट खांब रोवले होते. मात्र, रेतीमाफियांनी तेही काही तासांतच पाडले. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

Web Title: A farmer killed due to illegal sand transports at Badegaon in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.