नागपुरात पतंगीच्या हुल्लडबाजीत १००वर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 08:11 PM2019-01-15T20:11:38+5:302019-01-15T21:58:10+5:30

मकरसंक्रांत पतंगोत्सव मंगळवारी चांगलाच रंगला, मात्र काही जण कुणाची पतंग कशी कापता येईल, यासाठी स्पर्धा करीत होते. जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी काहींनी बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात १००वर जण जखमी झाले.

Due to Hoodloom while flying kites 100 injured In Nagpur | नागपुरात पतंगीच्या हुल्लडबाजीत १००वर जखमी

नागपुरात पतंगीच्या हुल्लडबाजीत १००वर जखमी

Next
ठळक मुद्देमहिलेचा पाय कापला : दोन मुलांचे पाय फ्रॅक्चर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मकरसंक्रांत पतंगोत्सव मंगळवारी चांगलाच रंगला, मात्र काही जण कुणाची पतंग कशी कापता येईल, यासाठी स्पर्धा करीत होते. जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी काहींनी बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात १००वर जण जखमी झाले. यात किरकोळ हात, पाय, बोट व गळा कापलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, पतंग पकडण्याच्या नादात दोन मुलांचे पाय फ्रॅक्चर झाले तर एका महिलेच्या पायावर टाके लागले.
दोरा घेऊन मांजा तयार करणे किचकट. यातही पतंगीच्या कापाकापीत हा मांजा फारसा तग धरत नाही. परिणामी, अनेकजण न तुटणारा नायलॉनचा मांजा वापरतात. यावर बंदी असतानाही मंगळवारी तो मोठ्या प्रमाणात विकला गेल्याची माहिती आहे. अनेक पतंगबाजांकडे हा मांजाही आढळून आला. नायलॉन मांजामुळे सर्वात जास्त धोका दुचाकी वाहनधारकांना असतो. हा दोरा तुटत नाही. यामुळे अडकून पडण्याची किंवा गळ्याभोवती आवळून मृत्यू होण्याची भीती असते. या वर्षी गंभीर घटना सामोर नाही. मात्र नायलॉन मांजामुळे कुणाचे हात, बोट, पाय तर कुणाचा गळा कापल्याच्या किरकोळ घटना पुढे आल्या आहेत. 

मेडिकलमध्ये दिवसभरात असे ३९वर रुग्ण बाह्यरुग्ण विभागात व अपघात विभागात आले होते. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले. मात्र यातील २५ वर्षीय सुनिता पराते ही महिला गंभीर जखमी झाली. पायात मांजा अडकल्याने तिचा पाय कापला गेला. तिला टाके लागले असून शल्यक्रिया विभागाच्या वॉर्ड क्र. १७ मध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गंभीर जखमींची संख्या कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मेयोमध्ये दोन मुले भरती
पतंग पकडण्यासाठी धावत असलेली दहा वर्षांची दोन मुले अडकून पडल्याने त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले. यातील एकाचे नाव मनीष टंडन तर दुसऱ्याचे नाव मोहित अंबादे आहे. अस्थिरोग विभागाच्या वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शिवाय नायलॉन मांजामुळे किरकोळ जखमी झालेल्या ५०वर रुग्णांनी मेयोच्या बाह्यरुग्ण व अपघात विभागात येऊन उपचार घेतला. यात गंभीर असे कुणी नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.
खासगी हॉस्पिटलमध्येही जखमींवर उपचार
रविनगर चौक येथील दंदे हॉस्पिटलमध्ये मांजामुळे हात व रोडवर धावताना झालेल्या अपघातामुळे दहावर किरकोळ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. मानेवाडा, प्रतापनगर चौक, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कामठी रोड व उमरेड रोड मार्गावरील अनेक मोठ्या खासगी इस्पितळांमध्येही मांजा व पतंगीच्या पकडापकडीमध्ये जखमी झालेल्या ३० वर रुग्णांवर उपचार घेतल्याची माहिती आहे.

 

Web Title: Due to Hoodloom while flying kites 100 injured In Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.