‘स्वीमिंग पूल’साठी खोदलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:00 PM2018-08-20T17:00:50+5:302018-08-20T17:01:59+5:30

मित्रांसोबत खेळताना ११ वर्षीय विद्यार्थी नकळत पाणी असलेल्या खोल खड्ड्यात पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी येथील माधवनगरात शनिवारी दुपारी घडली असून, रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

Digging pit for 'swimming pool', student drowns | ‘स्वीमिंग पूल’साठी खोदलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

‘स्वीमिंग पूल’साठी खोदलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या हिंगणा इसासनी परिसरातील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रांसोबत खेळताना ११ वर्षीय विद्यार्थी नकळत पाणी असलेल्या खोल खड्ड्यात पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी येथील माधवनगरात शनिवारी दुपारी घडली असून, रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
अभिषेक अशोक काळे (११, रा. वॉर्ड क्रमांक - ६, इसासनी, हिंगणा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषेक हा इसासनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकायचा.
तो शनिवारी (दि. १८) दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आला आणि काही वेळाने मित्रांसोबत खेळण्यासाठी निघून गेला. तो सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने आई - वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. ही शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, त्याची आई राजकन्या काळे यांनी अभिषेक बेपत्ता असल्याची तक्रारही रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदविली. दरम्यान, कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी रविवारी (दि. १९) अभिषेकचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातच सायंकाळच्या सुमारास माधवनगरातील खोल खड्ड्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. खड्ड्याच्या शेजारी कपडेही आढळून आले. माहिती मिळताच कुटुंबीयांनी तो खड्डा गाठला, तेव्हा तो मृतदेह अभिषेकचा असल्याचे स्पष्ट होताच आई राजकन्या यांनी टाहो फोडला. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला.

मृत्यूबाबत तर्कवितर्क
अभिषेक ज्या खड्ड्यात बुडाला, तो ‘स्वीमिंग पूल’साठी खोदण्यात आला आहे. पावसामुळे त्यात पाणी साचले आहे. अभिषेक त्या खड्ड्यात कसा पडला, याबाबत कुणाला काहीही माहिती नाही. कपडे खड्ड्याच्या काठावर आढळून आल्याने तो पोहण्यासाठी उतरला असावा, असा अंदाज लावला जात असला तरी, अभिषेक एकटा पोहण्याची हिंमत करणार नाही, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शिवाय, या खड्ड्याजवळ सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

Web Title: Digging pit for 'swimming pool', student drowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.