महाराष्ट्रातील ३२० निसर्ग पर्यटन स्थळांचा होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:52 AM2018-02-11T11:52:57+5:302018-02-11T11:53:15+5:30

निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे येत्या दोन वर्षात राज्यातील ३२० पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ प्रकल्पांकरिता ५७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात या कामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Development of 320 Nature Tourist Destinations in Maharashtra | महाराष्ट्रातील ३२० निसर्ग पर्यटन स्थळांचा होणार विकास

महाराष्ट्रातील ३२० निसर्ग पर्यटन स्थळांचा होणार विकास

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाला प्राधान्य : महीप गुप्ता

सविता देव हरकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे येत्या दोन वर्षात राज्यातील ३२० पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ प्रकल्पांकरिता ५७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात या कामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
निसर्ग पर्यटनात सर्वाधिक प्राधान्य पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणास देण्यात आले आहे. लोकांच्या सक्रिय सहभागातून निसर्ग संवर्धन ही यामागील संकल्पना आहे, अशी माहिती राज्याच्या निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महीप गुप्ता यांनी दिली.
या स्थळांवर अद्यावत विश्रामगृहे, होम स्टे, पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा, साहसी पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे. निसर्ग पर्यटन संकल्पनेची विस्तृत माहिती देताना त्यांनी सांगितले की, लोकांची आवड बदलते आहे. साहसी पर्यटनासोबतच जंगल आणि वन्यजीव पर्यटनाकडे त्यांचा कल वाढतो आहे. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने विदर्भात त्यांची ही आवड जोपासणारी अनेक स्थळे आहेत. नागपूरपासून २५० किमीच्या परिसरात सहा व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची गरज आहे. भारतात दरवर्षी पाच दशलक्ष विदेशी पर्यटक भेट देतात. यापैकी १० टक्के पर्यटक जरी महाराष्ट्रात आले आणि एका पर्यटकाने एक हजार डॉलर्स खर्च केले तरी ५०० दशलक्ष डॉलर्स एवढे उत्पन्न मिळू शकते.
अर्थात केवळ उत्पन्न मिळविण्याचा हेतू नसून लोकांच्या मनात निसर्गाप्रती प्रेम निर्माण होणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. वाढता मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी निसर्ग पर्यटन लाभदायक ठरणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. जंगले कुलुपात ठेवली, लोकांना तेथे प्रवेश नाकारला अथवा स्थानिक लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवले तर वनांचे संवर्धन शक्य नाही. लोकसहभागातूनच या अमूल्य संपदेची सुरक्षा होऊ शकते, असे गुप्ता यांचे म्हणणे होते. यासंदर्भात त्यांनी आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कचे उदाहरण दिले. या राष्ट्रीय उद्यानाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक समुदायावर देण्यात आली आहे. हॉट एअर बलूनपासून हेलिकॉप्टर राईडपर्यंत सर्व सुविधा तेथे आहेत. जगभरातील पर्यटक तेथे जातात. जंगल आणि वन्यप्राण्यांमुळे एवढा चांगला रोजगार मिळत असल्याने स्थानिक लोक येथील प्राण्यांची काळजी घेतात.
लोकांना अधिकाधिक निसर्गाच्या सान्निध्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. याअनुषंगाने निसर्गानुभव नावाचा एक प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे जिल्हा परिषद आणि आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना निसर्गानुभव घडवून आणण्यात येत आहे. पुढल्या वर्षी संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जाणार आहे. निसर्ग आपल्या विरोधात नाही, वन्यप्राणी आपले शत्रू नाहीत, ही भावना बालपणापासूनच मुलांच्या मनात बिंबविण्याचा प्रयत्न या माध्यमाने होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
२० आॅगस्ट २००८ रोजी राज्य शासनाने आपले पर्यटन धोरण जाहीर केले होते. त्यात स्थानिक लोकांचा सहभाग, निसर्ग शिक्षण, एकछत्री पर्यटन यंत्रणा आणि कुठल्याही तडजोडीशिवाय पर्यावरण संवर्धनाची संकल्पना अधोरेखित करण्यात आली होती. त्यानंतर ८ डिसेंबर २०१५ रोजी निसर्ग पर्यटन मंडळ स्थापन झाले आणि आता नागपूरच्या सदर भागात मंडळाला हक्काची जागा मिळाली असून या कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. वन राज्यमंत्री अंबरीश राजे आत्राम, वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अशोककुमार मिश्रा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडकिल्ले, सरोवरांचाही समावेश
निसर्ग पर्यटनासाठी महाराष्ट्रातील ३२० स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांशिवाय गडकिल्ले, सरोवर, वनोद्यान, जैवविविधता उद्यानांचा समावेश आहे.

होम स्टे
होम स्टे हे या निसर्ग पर्यटनातील सर्वाधिक आकर्षण असणार आहे. महागड्या रिसोर्टमध्ये राहण्यापेक्षा गावातील एखाद्या घरात राहून स्थानिक संस्कृती जाणून घेण्याची संधी यामुळे पर्यटकांना मिळणार आहे. गावातील लोकांना हे होम स्टे विकसित करण्याकरिता दीड ते तीन लाखापर्यंतचा निधी शासन देईल. सध्या ताडोबा, सिल्लारी, नागझिरा आदी ठिकाणी निसर्ग पर्यटन मंडळाचे ४० होम स्टे आहेत. लवकरच सर्व निसर्ग पर्यटन स्थळांजवळ अशा होम स्टेची व्यवस्था केली जाणार असून येत्या दोन महिन्यात त्यांचे आॅनलाईन बुकिंगही करता येणार आहे.

Web Title: Development of 320 Nature Tourist Destinations in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन