महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:02 AM2019-01-02T00:02:24+5:302019-01-02T00:05:21+5:30

प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी महाराज बाग व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) अपील करण्यात येणार आहे. ‘सीझेडए’ने २ डिसेंबर २०१८ रोजी महाराज बाग व्यवस्थापनाला मेल पाठवून मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नवीन वर्षापासून महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे संचालन मान्यतेविना खरंच करता येईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Demand to the center for approval of Maharaj Bagh Zoo | महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी केंद्राकडे मागणी

महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी केंद्राकडे मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देबायोलॉजिस्ट व एज्युकेशन अधिकाऱ्याची नियुक्ती : पेयजल व्यवस्थेवर भर द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी महाराज बाग व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) अपील करण्यात येणार आहे.
‘सीझेडए’ने २ डिसेंबर २०१८ रोजी महाराज बाग व्यवस्थापनाला मेल पाठवून मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नवीन वर्षापासून महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे संचालन मान्यतेविना खरंच करता येईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मंगळवारी नवीन वर्षात नागपूर आणि लगतच्या भागातील हजारो मुले आपल्या कुटुंबीयांसह महाराज बाग प्राणिसंग्रहालयात फिरायला आले होते. अनेक वर्षांपासून संपूर्ण विदर्भातील लाखो कुटुंबीय मुलांसह कमी शुल्कात वाघ, बिबट, अस्वल, मगर या सारखे वन्यप्राणी पाहायला येतात. पण काही दिवसांपासून महाराज बागची मान्यता रद्द झाल्याच्या वृत्ताने लोक प्राणिसंग्रहालयाबाबत चिंतित आहेत. काही आवश्यक सुधारणा आणि नवेजुने कागदपत्रांसह केंद्र सरकारकडे मान्यतेचा कालावधी वाढविण्यासाठी अपील करण्यात येणार असल्याचा दावा महाराज बाग व्यवस्थापनाने केला आहे.
सीझेडएच्या आदेशानुसार व्यवस्थापनाने पेयजल, पक्ष्यांची जागा वाढविण्यासह प्राणिसंग्रहालयाच्या अ‍ॅक्वेरियममध्ये सुधारणा केली आहे. तसेच १२ डिसेंबरला बायोलॉजिस्ट आणि एज्युकेशन अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन नियुक्तीही करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा आरोग्य अहवाल आदी अपीलला जोडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘मास्टर प्लॅन’ला मंजुरी केव्हा?
गेल्या काही वर्षांपासून सीझेडएची मान्यता डिसेंबरला समाप्त झाल्यानंतर महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील त्रुटी दूर करण्याच्या अटीवर पुन्हा एक वर्षासाठी वाढ मिळत आहे. पण बायोलॉजिस्ट, एज्युकेशन अधिकारी आणि अन्यची नियुक्ती होत नव्हती. सीझेडए काही पायाभूत सुविधा नव्याने करण्यासाठी निर्देश देत राहिले. पण ‘मास्टर प्लॅन’ सीझेडएकडे मंजुरीसाठी चार वर्षांपूर्वीच पाठविल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. अनेकदा प्लॅन परत आल्यानंतर आवश्यक सुधारणांसह पाठविण्यात आला. मास्टर प्लॅनला मंजुरी मिळाल्यानंतरच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे महाराज बाग व्यवस्थापनाने सांगितले.
प्रक्रिया सहा महिने सुरू राहणार
काही दिवसांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला पुन्हा मान्यता मिळाल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी सीझेडएशी जुळलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. पण महाराजबाग व्यवस्थापनाने मान्यतेचा कालावधी वाढविण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही महाराजबाग मान्यतेसंबंधित काही सूचना आल्याची माहिती नसल्याचे सांगितले. पण अपील केल्यानंतर सीझेडएची चमू नागपुरात येऊन निरीक्षण करणार आहे. ही प्रक्रिया सहा महिने सुरू राहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सरकारकडे पाठविले अपील : पार्लावार
पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता आणि प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक डॉ. एन. डी. पार्लावार यांनी सांगितले की, महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रांसह केंद्र सरकारकडे अपील केले आहे. सीझेडएच्या निर्देशानुसार बायोलॉजिस्ट व एज्युकेशन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

 

 

Web Title: Demand to the center for approval of Maharaj Bagh Zoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.