न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही : न्या. रवी देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:26 AM2018-10-18T00:26:30+5:302018-10-18T00:27:10+5:30

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.

Court does not have to do the work in Marathi: Justice Ravi Deshpande | न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही : न्या. रवी देशपांडे

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही : न्या. रवी देशपांडे

Next
ठळक मुद्देवकिलांना इंग्रजी शिकून घेण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ‘असा मी घडलो’ या शीर्षकाखाली उच्च न्यायालयाच्या सभागृहामध्ये ही मुलाखत घेण्यात आली. एका प्रश्नाचे उत्तर देताना न्या. देशपांडे यांनी न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. न्यायालयाचे कामकाज मराठीमध्ये केले जाऊ शकत नाही. तसे करणे प्रत्येकासाठी गैरसोयीचे होईल. एखाद्यास काही बाबतीत इंग्रजीमध्ये बोलणेअवघड वाटल्यास त्याला मराठी भाषा वापरण्याची परवानगी दिली जाते. परंतु, पूर्णपणे मराठीमध्ये कामकाज करणे अशक्य आहे असे त्यांनी सांगितले.
वकिलीपेक्षा न्यायदानाचे कार्य करणे कठीण आहे. न्यायदान करताना दोन्ही बाजूने समन्वय ठेवावा लागतो. सुनावणीमध्ये पुढे न आलेली महत्त्वाची बाजू तपासून पहावी लागते. न्यायदानावर न्यायमूर्तींच्या वैयक्तिक दृष्टिकोनाचाही फार मोठा परिणाम पडतो. वकिलांनी स्वत:च्या बाजूने निकाल लागण्यासाठी आग्रही न राहता स्वत:ची कामगिरी कशी गुणवत्तापूर्ण होईल यावर जास्त भर द्यायला पाहिजे. स्वत:ची कामगिरी उच्च दर्जाची राहिल्यास निकाल आपोआप आपल्या बाजूने लागतो. वकिलांनी नेहमी सर्वप्रथम पक्षकारांची व्यथा समजून घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे कशी मांडायची यावर परिश्रम घ्यावे अशी सूचना न्या. देशपांडे यांनी केली.
लहानपणी शिक्षणात मुळीच रुची नव्हती. शिक्षणबाह्य बाबींवर जास्त भर देत होतो. त्यामुळे शिक्षणात गती नव्हती. इयत्ता तिसरीमध्ये नापास झालो होतो. शालेय शिक्षण मराठीत झाले. परिणामी, पुढे चालून इंग्रजीची मोठी समस्या उभी राहिली. त्यावर परिश्रमाने मात करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. वकिली व्यवसायात आल्यानंतर इतर सर्व गोष्टी बाजूला पडल्या. स्वत:ला पूर्णपणे वकिली व्यवसायात झोकून दिले. २५ वर्षे वकिली केल्यानंतर न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. तेव्हापर्यंत न्यायमूर्ती होण्याचा विचार मनात आला नव्हता अशी माहिती न्या. देशपांडे यांनी यावेळी दिली. त्यांचे बालमित्र अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी मुलाखतीचे संचालन केले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नागपूरने घडविले
आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व येथील सहकाऱ्यांनी घडविले. आपल्या यशामध्ये या दोघांचा मोठा वाटा आहे. मुंबई व औरंगाबाद येथील लोकांनी कितीही प्रशंसा केली तरी, कार्य करण्याचे खरे समाधान नागपूर खंडपीठातच आहे. आपल्या लोकांसोबत काम करण्यामध्ये नेहमीच आनंद वाटतो अशा भावना न्या. देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

 

Web Title: Court does not have to do the work in Marathi: Justice Ravi Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.