पाणीटंचाई उपाययोजना ३० जूनपूर्वी पूर्ण करा : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:36 PM2019-05-27T23:36:34+5:302019-05-27T23:42:04+5:30

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

Complete the water shortage solution till June 30: Chandrashekhar Bawankule | पाणीटंचाई उपाययोजना ३० जूनपूर्वी पूर्ण करा : चंद्रशेखर बावनकुळे

पाणीटंचाई उपाययोजना ३० जूनपूर्वी पूर्ण करा : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देपाणीटंचाई कृती आराखड्यानुसार २,३३८ उपाययोजनाआवश्यकतेनुसार तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठाटंचाई आराखड्यासाठी आवश्यकतेनुसार निधीची उपलब्धताशहरातील भूजलाचे सर्वेक्षण करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
बचत भवन सभागृहात नागपूर शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंंचाईसंदर्भात आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आ. समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, गिरीश व्यास, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात केवळ ९६ दलघमी एवढाच म्हणजे ५.४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तोतलाडोह प्रकल्पात मृत जलसाठा असून, त्यामधून नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या. ते म्हणाले, नवेगाव खैरी पेंच प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असताना महापालिकेने पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शहरातील अवैध नळ कनेक्शन आणि वाणिज्य व औद्योगिक वापरासाठी दिलेल्या पाण्यासंदर्भात तपासणी करून अवैधपणे पाणी वापरणाऱ्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
नागपूर शहराला ७१० दलघमी दररोज पाणीपुरवठा होत असून, या पाण्याचे योग्य वितरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच महापालिका क्षेत्रातील ५,२५४ विंधन विहिरींवर हातपंप लावणे, ७५५ विहिरींपैकी २६१ विहिरींची दुरुस्ती करून त्यावरसुद्धा लघु नळ योजना सुरू करण्यात आली आहे. शहरात ३४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये विहिरी स्वच्छ करणे, विद्युत पंप बसविणे आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी झोननिहाय पाणीटंचाई निवारण कक्ष तयार करावे. या कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात. त्यासोबत अवैधपणे पाणी घेणाऱ्याविरुद्ध तसेच विद्युत पंपाविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केल्या.

अंमलबजावणीची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर
टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात, असे निर्देश यावेळी दिले. विधानसभा मतदार संघनिहाय पाणीटंचाई कृती आराखड्याचा आढावा घेताना आ. मल्लिकार्जुन रेड्डी, समीर मेघे, सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव प्राधान्याने सादर करावेत. या प्रस्तावांना तात्काळ मंजूर करुन ही कामेसुद्धा निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.
नगरपालिका क्षेत्रात १० नगरपालिकांमध्ये २८, खासगी व १३ नगर पालिकांचे असे ४२ टँकर सुरू आहेत. तसेच वाडी नगर परिषद क्षेत्रात ३० विंधन विहिरी, कळमेश्वर- ६, रामटेक- ८, वानाडोंगरी- १३, भिवापूर-१७ तर मोवाड नगरपालिका क्षेत्रात विंधन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यासोबतच टंचाई परिस्थिती असलेल्या नगरपालिकांना पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक उपाययोजना लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Web Title: Complete the water shortage solution till June 30: Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.