नागपुरात चोरट्यांचा असाही निर्ढावलेपणा; कबुतराच्या नावाखाली रोख आणि सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:32 AM2018-01-08T10:32:32+5:302018-01-08T10:33:27+5:30

महिला घरी हजर असताना चोरट्याने वरच्या माळ्यावर जाऊन धाडसी चोरी केली. एवढेच नव्हे तर घरमालकिणीने हटकले असता कबुतर आणायला गेलो होतो, असे सांगून तो पावणेतीन लाखांचा ऐवज घेऊन निघून गेला.

Cash and gold lump in the name of the pigeon in Nagpur | नागपुरात चोरट्यांचा असाही निर्ढावलेपणा; कबुतराच्या नावाखाली रोख आणि सोने लंपास

नागपुरात चोरट्यांचा असाही निर्ढावलेपणा; कबुतराच्या नावाखाली रोख आणि सोने लंपास

Next
ठळक मुद्देघरमालकिणीसह शेजारीही स्तब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला घरी हजर असताना चोरट्याने वरच्या माळ्यावर जाऊन धाडसी चोरी केली. एवढेच नव्हे तर घरमालकिणीने हटकले असता कबुतर आणायला गेलो होतो, असे सांगून तो पावणेतीन लाखांचा ऐवज घेऊन निघून गेला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुनापूर येथे शनिवारी दुपारी १.३० ते २.२० दरम्यान ही खळबळजनक घरफोडीची घटना घडली.
हनुमान मंदिराजवळ पुनापूर, कळमना येथे धर्मराजविजय हजारे यांचे निवासस्थान आहे. ते प्रॉपर्टी डिलर आहेत. घरची पुरुष मंडळी नेहमीप्रमाणे बाहेर निघून गेल्यानंतर शनिवारी दुपारी १.३० वाजता स्वाती धर्मराजविजय हजारे (वय ३२) या आणि त्यांची जाऊ घरकाम करीत होत्या. काही वेळेनंतर त्या जिन्याजवळ येऊन बसल्या. दुपारी २.२० च्या सुमारास वरच्या माळ्यावरून एक तरुण खाली उतरताना दिसला. ते पाहून स्वाती यांनी त्याला तू कोण आणि कशाला वर गेला होता, अशी विचारणा केली. कबुतर आणायला वर गेलो होतो, असे सांगून आरोपी भरभर खाली उतरला आणि निघून गेला. कम्पाऊंडच्या गेटसमोर त्याचा साथीदार एक दुचाकी घेऊन उभा होता. त्यावर बसून आरोपी पळून गेला. काही वेळेनंतर स्वाती आणि त्यांची जाऊ वरच्या माळ्यावर गेले असता त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. कपाटातील रोख २५ हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख, ७५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पतीला ही माहिती दिली. त्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

पोलीसही चक्रावले
या प्रकरणाची परिसरात माहिती कळताच हजारेंच्या घरासमोर मोठी गर्दी जमली. घरच्या महिला घरी हजर असताना निर्ढावलेल्या चोरट्यांनी ही चोरी केल्याचे कळल्याने प्रत्येकजण स्तंभित झाला. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर घटनाक्रम ऐकून काही वेळेसाठी पोलीसही चक्रावले.

Web Title: Cash and gold lump in the name of the pigeon in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा