नागपूरनजीक हिंगणा भागातील तलावात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:21 PM2018-08-06T22:21:04+5:302018-08-06T22:23:13+5:30

रविवारी सायंकाळी हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारातील तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

The bodies of the youth who were drowned in the lake in the area of ​​Hingana, Nagpur were fished out | नागपूरनजीक हिंगणा भागातील तलावात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह काढले

नागपूरनजीक हिंगणा भागातील तलावात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह काढले

Next
ठळक मुद्देअग्निशमन दलाची मदत : शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी सायंकाळी हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारातील तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धांत सिडाम (१७, रा. भांडेप्लॉट, उमरेड रोड, नागपूर), सागर सुरेश जांबुळकर (१८, रा. भांडेप्लॉट, सेवादलनगर, नागपूर) आणि बंटी प्रेमलाल निर्मल (१४, रा. भांडेप्लॉट, उमरेड रोड नागपूर) आणि आणखी पाच युवक ‘फ्रेंडशीप डे’च्या निमित्ताने सालईमेंढा परिसरात पिकनिकसाठी गेले होते. तलावाच्या काठावर गेल्यानंतर सिडाम, जांबुळकर आणि निर्मल या तिघांना पोहण्याचा मोह अनावर झाला आणि तेथेच त्यांचा घात झाला. या तिघांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही करुणाजनक घटना घडली. त्याचे वृत्त नागपुरात कळताच खळबळ निर्माण झाली.
माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक तरुणांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास प्रथमेशचा मृतदेह सापडला. नंतर अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी तलावाच्या काठावर मृताचे नातेवाईक, नगरसेवक नागेश सहारे, एसीपी सिद्धार्थ शिंदे, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक विनायक जाधव, अनिल धानोरकर, रवींद्र नेतनराव, कमलेश साहूआणि भांडेप्लॉट वस्तीतील तरुण मोठ्या संख्येत जमले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सागरचा आणि दुपारी १ वाजताच्या सुमारास बंटीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. तेथून ते मृताच्या नातेवाईकांनी भांडेप्लॉट परिसरात आणले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश तीव्र झाला होता. वस्तीतील तीन युवकांचा अशा पद्धतीने जीव गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात होती. सिडामवर जरीपटक्यातील कब्रस्तानात तर जांबुळकर आणि निर्मलवर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय मदतीची मागणी
सिडाम, जांबुळकर आणि निर्मल या तिघांच्याही घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुले शिकून मोठी होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल, अशा आशेवर असलेल्या पालकांना या घटनेमुळे जबर मानसिक धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सुधाकर कोहळे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. नगरसेवक नागेश सहारे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी केली. 

 

Web Title: The bodies of the youth who were drowned in the lake in the area of ​​Hingana, Nagpur were fished out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.