रेल्वेगाड्यांमध्ये उपद्रव करणाऱ्या २२ हजार हॉकर्सवर कारवाईचा बडगा

By नरेश डोंगरे | Published: November 16, 2023 02:26 PM2023-11-16T14:26:33+5:302023-11-16T14:27:13+5:30

२१ हजार, ७३६ जणांविरुद्ध अटकेची कारवाई : दंडापोटी २ कोटी, ७२ लाखांची रक्कम वसुल

Action taken against 22 thousand hawkers causing nuisance in trains | रेल्वेगाड्यांमध्ये उपद्रव करणाऱ्या २२ हजार हॉकर्सवर कारवाईचा बडगा

रेल्वेगाड्यांमध्ये उपद्रव करणाऱ्या २२ हजार हॉकर्सवर कारवाईचा बडगा

नागपूर : परवानगी नसताना रेल्वेच्या विविध गाड्यांमध्ये प्रवेश करून विविध खाद्य पदार्थ तसेच चिजवस्तूंची विक्री करणाऱ्या अनधिकृत हॉकर्सविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाईची मोहिम राबविली आहे. त्यानुसार, गेल्या सहा महिन्यात मध्य रेल्वेच्या पाच विभागात २१ हजार, ७३६ जणांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली.

रेल्वेगाडी साधी असो, एक्सप्रेस असो की मेल, या गाड्यांमध्ये हॉकर्स उपद्रव करताना दिसतात. या गाड्यांच्या विविध डब्यात शिरून ही मंडळी मिनिटामिनिटाला विविध चिजवस्तू, खाद्यपदार्थ आणि खेळणी विकण्यासाठी आरडाओरड करताना दिसतात. या हॉकर्स पैकी कोण अधिकृत आणि कोण अनधिकृत ते कळायला मार्गच नसतो. त्यांच्या उपद्रवाबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी होतात.

अलिकडे या तक्रारींची संख्या प्रचंड वाढल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दलाच्या माध्यमातून 'हॉकर्स विरोधी पथकांची' निर्मिती केली. एप्रिल २०२३ पासून या पथकाने मध्य रेल्वेच्या पाचही विभागात वेगवेगळ्या मार्गावरील वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमध्ये कारवाईची धडक मोहिम राबविली. त्यानुसार, गेल्या सहा महिन्यात नागपूर, मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागात एकूण २१, ७४९ हॉकर्सविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्या सर्वांकडून दंडापोटी एकूण २ कोटी, ७२ लाखांची रक्कमही वसुल करण्यात आली. गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अशा प्रकारे १७, ९६७ गुन्हे नोंदविण्यात आले होते.

नागपूर विभागात २७३१ जणांना अटक

नागपूर विभागात २७३४ गुन्हे दाखल करून रेल्वे प्रशासनाने २७३१ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २७ लाख, ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विभागनिहाय कारवाई

मुंबई विभागात ८,६२९ गुन्ह्यांची नोंद आणि ८,६२४ हॉकर्सना अटक. ९४.७७ लाख दंड वसूल.

भुसावळ विभागात ६,३४९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून ६,३४८ हॉकर्सना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १.१५ कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे विभागात १,८५६ गुन्हे दाखल, १,८५५ हॉकर्सना अटक आणि १२.७१ लाखांचा दंड वसूल.

सोलापूर विभागात २,१८१ गुन्हे नोंदवले, २,१७८ हॉकर्सना अटक केली आणि २१.९२ लाखांचा दंड वसूल करण्याता आला.

Web Title: Action taken against 22 thousand hawkers causing nuisance in trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.