अपहृत बालक आईच्या कुशीत

By admin | Published: February 12, 2016 03:23 AM2016-02-12T03:23:31+5:302016-02-12T03:23:31+5:30

उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा झाला असून, या अपहरणाची तक्रार करणारा कथित बापच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

The abducted child in the mother's womb | अपहृत बालक आईच्या कुशीत

अपहृत बालक आईच्या कुशीत

Next

कथित बापानेच केले होते अपहरण : अजनी पोलिसांची कामगिरी
नागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा झाला असून, या अपहरणाची तक्रार करणारा कथित बापच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या सिनेमातील वाटावी अशी माहिती या अपहरण प्रकरणाच्या निमित्ताने उघड झाली. पोलीस उपायुक्त ईशू सिंधू आणि उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
अजनीच्या विश्वकर्मानगरात भाड्याने राहणारा अजय रामजित पांडे (वय २६) याने मंगळवारी रात्री त्याच्या दोन वर्षीय शब्बू नामक चिमुकल्याचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.
प्रकरण अपहरणाचे आणि चिमुकल्याचे असल्याने अजनीसह संपूर्ण शहर पोलीस दल त्याला शोधण्यासाठी कामी लागले. प्रसार माध्यमानेही आज ठळकपणे या अपहरणाचे वृत्त प्रकाशित केले. तिकडे पोलीस चिमुकल्या शब्बूचा शोध घेत असतानाच आज सकाळी एका महिलेने नियंत्रण कक्षात फोन केला. अपहृत शब्बू आपल्या घरी असल्याचे तिने सांगितले. हे वृत्त नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखा, अजनी पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार मोठा पोलीस ताफा सदर महिलेच्या निवासस्थानी पोहोचला, सोबत चिमुकल्या शब्बूची आई खुशीदेखील होती. पोलिसांनी शब्बूला ताब्यात घेतले. तो तुमच्याकडे कसा आला, अशी ‘त्या’ महिलेला विचारणा केली अन् चक्रावणारी माहिती उघड झाली.
सुखी जीवनाचे स्वप्न दाखवून शेकडो किलोमीटर दूर घेऊन आलेला आरोपी पांडे ऊर्फ दुबे स्वत:च जेमतेम जगत असल्याचे लक्षात आल्यामुळे खुशीनिसा ऊर्फ खुशी गावाकडे परतण्याच्या तयारीला लागली. ते पाहून तिला रोखण्यासाठी आरोपीने कट रचला. त्यानुसार चिमुकल्या शब्बूला घेऊन तो महिलेच्या घरी गेला. पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे याचा सांभाळ करणारे घरात कुणी नाही, त्यामुळे चार-पाच दिवसांसाठी त्याला येथे ठेवा, अशी त्याने विनवणी केली. सदर महिला नोकरदार आहे. तिच्याकडे आरोपी पांडे ऊर्फ दुबे फर्निचरच्या कामाला असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने सद्भावनेने चिमुकल्या शब्बूला घरी ठेवून घेतले. मात्र, आज त्याचा वर्तमानपत्रात फोटो पाहून आणि त्याचे अपहरण झाल्याचे ऐकून हादरलेल्या महिलेने नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना शब्बू आपल्याकडे असल्याची माहिती दिली आणि या कथित अपहरण प्रकरणाचा भंडाफोड केला.
विशेष म्हणजे, पोलिसांनी या अपहरणाचे अँगल तपासताना बालकाचा शोध लावण्यासाठी आरोपी पांडेने नोंदविलेल्या तक्रारीवर जो पत्ता दिला, तेथील (गोरखपूर) पोलिसांशी संपर्क साधला. तेथून आरोपी पांडे आणि खुशीनिसा या दोघांची गावे वेगळी असल्याचे आणि त्यांनी तेथून पलायन केल्याचे कळले. त्यामुळे संशय बळावल्याने पांडेचे घटनेच्या वेळी मोबाईल लोकेशन तपासले. बेसा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ते सुद्धा विरोधाभास दर्शविणारे होते, असे उपायुक्त सिंधू यांनी सांगितले. तक्रार नोंदवून घेण्यास उशीर केला, हा मुद्दा खोडून काढत आरोपी पांडे तक्रार देण्याच्या मूडमध्येच नव्हता. तो पोलीस ठाण्याबाहेरूनच परतला होता आणि त्याने परिसरातील नागरिकांना पोलिसांनी परतवून लावल्याची माहिती दिली, असे सिंधू म्हणाले. भाडेकरू ठेवताना त्यांची खातरजमा करण्याची गरजही त्यांनी विशद केली.
पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे तसेच उपायुक्त ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी विभागाचे सहायक आयुक्त राठोड यांच्या नेतृत्वात अजनीचे ठाणेदार एस.व्ही. पवार, सहायक निरीक्षक एस. के. धोबे, हवालदार नंदकिशोर हिंगे, सुभाष ठाकरे, अनिल ब्राम्हणकर, दशरथ मुळे, नायक प्रशांत कांबळे, शैलेष बडोदेकर, मिलिंद पटले, रूपेश कातरे, राजकुमार तितरे, शिपाई प्रशांत सोनुलकर, मनोज टेकाम, अभिषेक हरदास, देवीदास ठोंबरे, महिला शिपाई गायत्री वर्मा, जिजा शेटे, मीना वाघमारे, नंदिनी कोहळे यांनी या कथित अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

सारीच बनवाबनवी
अपहरणाची तक्रार करणारा अजय रामजित पांडे याचे खरे नाव रविप्रताप रामजित दुबे असल्याचे स्पष्ट झाले. तो गोरखपूर येथील रहिवासी आहे. त्याची धूपखवाडा बिसनपूर (जि. कुशीनगर, बिहार) येथील खुशीनिसा रफीक अन्सारी या महिलेसोबत ओळख होती. तिच्या पतीने तिला वाऱ्यावर सोडल्यासारखे केल्याने ती रडकुंडीला आली होती. रुबी (वय ७), सुलतान (वय ३) आणि शब्बू (वय २) ही तीन मुले कशी सांभाळायची, असा त्याच्यासमोर प्रश्न होता. ते लक्षात घेता आरोपी पांडे ऊर्फ दुबेने तिच्याशी घसट वाढवली. नागपुरात चांगले काम आणि पैसा मिळतो, माझ्यासोबत राहा, असे म्हणत त्याने दीड महिन्यापूर्वी नागपुरात आणले. येथे अजनीतील सारवे नामक घरमालकाला ही आपली पत्नी आहे, असे सांगून रूम भाड्याने घेतली अन् खुशीनिसा अन्सारीला खुशी पांडे बनवून तो तेथे राहू लागला.

Web Title: The abducted child in the mother's womb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.