4500 crores expenditure on Nagpur Metro Rail Project | नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पावर ४५०० कोटींचा खर्च 
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पावर ४५०० कोटींचा खर्च 

ठळक मुद्देरिच-१ करिता २७३६ वा अखेरचा सेगमेंट : मेट्रो २०१९ पर्यंत धावणार

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे एकूण बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. रिच-१ मध्ये मिहान डेपो ते सीताबर्डी मुंजे चौक १२ कि़मी. आणि रिच-२ मध्ये लोकमान्यनगर ते मुंजे चौक १२ कि़मी. अशा एकूण २४ कि.मी मार्गावर मेट्रो रेल्वे मार्च-२०१९ पर्यंत धावणार आहे. दोन्ही मार्गावर ९ स्टेशन राहतील. ८६८० कोटींच्या प्रकल्पांपैकी आतापर्यंत ४५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. रिच-१ मध्ये २७३६ व्या अखेरच्या सेगमेंटचे काम पूर्ण होणार असून उद्घाटन शुक्रवारी वर्धा रोडवरील जामठा कास्टिंग यार्डमध्ये महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेकरिता ३६१५ सेगमेंट तयार
पत्रपरिषदेत दीक्षित म्हणाले, रिच-१ मध्ये व्हाय डक्टकरिता दोन पिलरमध्ये टाकण्यात येणारऱ्या अखेरच्या २७३६ व्या सेंगमेंट बनविण्याचे काम सुरू झाले. यार्डमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो रेल्वेकरिता ३६१५ सेगमेंट तयार झाले आहेत. एका सेगमेंटचे वजन ४५ टन, रुंदी ८.५ मीटर, लांबी तीन मीटर असून १०० वर्षांची गॅरंटी आहे. शहरातील महामेट्रोच्या कामात आतापर्यंत एकूण ६१,२२८ टन लोखंड आणि ५.३४,९७८ क्यु.मीटर कॉन्क्रिटचा उपयोग झाला आहे. एकूण १४०० पिलरपैकी १०८० पिलर उभे राहिले आहेत. याकरिता सुमारे १००० अभियंते आणि ६५०९ कामगार कार्यरत आहेत. याशिवाय २३ मोठ्या क्रेन, २७ छोट्या क्रेन, ४६ हॅड्रा आणि २३ लॉन्चिंग गर्डर कामाला आहेत. एक कि़मी. रेल्वे मार्ग उभारण्यासाठी ३६ कोटींची खर्च येत असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
गड्डीगोदाम उड्डाण पुलाला एनएचएआय व रेल्वेची अद्याप परवानगी नाही
नागपूर मेट्रो रेल्वेच्या गड्डीगोदाम येथील उड्डाण पुलाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अजूनही परवानगी आणि रेल्वेकडूनही मान्यता मिळाली नसल्यामुळे काम रखडले आहे. लवकरच मान्यता मिळाल्यास कामाला गती मिळेल. या ठिकाणचे भूमी अधिग्रहण हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भाग आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक पूर्ण जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. रिच-१ आणि रिच-३ मार्गावरील नऊ स्टेशनपैकी तीन स्टेशन पूर्ण झाले असून उर्वरित स्टेशनचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, रिच-१ चे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर, महासंचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य निवासी अभियंते ए.बी. गुप्ता आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Web Title: 4500 crores expenditure on Nagpur Metro Rail Project
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.