मंत्रचळामुळे तुम्ही सारखे अस्वस्थ असता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 07:00 AM2018-10-14T07:00:00+5:302018-10-14T07:00:00+5:30

आपणच लावलेले कुलूप; पण काहीजण परत परत ते तपासतात, काहीजण सारखे हात धुतात, येता-जाता मंत्र पुटपुटतात, घरातल्या फोटोंना नमस्कार करतात, तसे केले नाही तर अस्वस्थ होतात. काय प्रकार आहे हा?

You are restless.. try mindfulness technique | मंत्रचळामुळे तुम्ही सारखे अस्वस्थ असता?

मंत्रचळामुळे तुम्ही सारखे अस्वस्थ असता?

googlenewsNext
ठळक मुद्देसजगतेच्या व्यायामांनी म्हणजेच माइण्डफुलनेसने मेंदूतील ब्रेक चांगला होतो.

- डॉ. यश वेलणकर
रस्त्याने चालणारा एखादा माणूस अनेक ठिकाणी नमस्कार करीत जातो आहे असे तुम्ही पाहिले असेल. काहीजण जेवायला बसल्यानंतर तीन-चार वेळा हात धुवायला जातात. अशा माणसाच्या या कृत्याला मंत्रचळ म्हणतात. तसे आपण सर्वच जण थोडेसे मंत्रचळी असतो. दाराला कुलूप लावतो आणि चालायला लागतो; पण चार पावले गेल्यानंतर आपल्या मनात शंका येते की, कुलूप नीट लागले आहे की नाही. आपण परत येऊन कुलूप ओढून पाहतो.
आपले परत येऊन कुलूप पाहणे कुलूप लावताना सजगता नसल्याने होते. असे एकदा झाले तर ठीक आहे; पण मंत्रचळ असणारी व्यक्ती चार-चार वेळा पुन्हा पुन्हा येऊन कुलूप ओढून पाहते. असे होते त्यावेळी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होऊ लागतात. हेच प्रमाण वाढते, मनातील विचारामुळे अस्वस्थता येऊ लागते त्याला ओसीडी म्हणजे आॅब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआॅर्डर म्हणतात. मात्र मंत्रचळ आणि ओसीडी यामध्ये फरक आहे.
मंत्रचळ असणारी व्यक्ती अस्वस्थ नसते. तिच्या वागण्याने कुटुंबीय अस्वस्थ होत असतील. पण त्या व्यक्तीला त्यात काही चुकीचे वाटत नसते. मंत्राचळी माणसाकडून केल्या जाणाऱ्या कृती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.
संगणक नक्की शटडाउन झाला आहे की नाही हे पुन: पुन्हा पहाणे, घरातून बाहेर पडताना घरात असलेल्या देवांच्या आणि पूर्वजांच्या सर्व फोटोंना नमस्कार करणे अशी मंत्रचळपणाची अनेक उदाहरणे पाहायला मिळू शकतात. असे वागणे इतरांना आणि त्या व्यक्तीला फारसे त्रासदायक वाटत नाही. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र असे वागणाºया माणसाच्या मनात चिंता आणि अस्वस्थता असते.
आपण नमस्कार केला नाही तर काहीतरी वाईट घडेल असा विचार त्या व्यक्तीच्या मनात येत असतो. त्यामुळे नमस्कार करण्याची कृती होत असते. काहीजण एखादा शब्द किंवा मंत्र मोठ्याने म्हणतात, पुन: पुन्हा म्हणतात. म्हणूनच अशा वागण्याला मराठीत मंत्रचळ शब्द रूढ झाला असेल. असा मंत्र म्हणण्यात किंवा नमस्कार करण्यात आक्षेपार्ह फारसे काही नाही, त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा फारसा दुष्परिणाम होत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण तो शब्द म्हटला नाही किंवा नमस्कार केला नाही तर अस्वस्थ वाटत राहते, भीती वाटते हे मानसशास्रानुसार चिंता रोगाचे प्राथमिक लक्षण आहे.
काही काळाने ही सवय त्रासदायक पातळीवर जाऊ शकते. त्या व्यक्तीला आॅबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआॅर्डर हा विकार होऊ शकतो. भारतात एक टक्का माणसांना हा आजार आहे असे संशोधन आहे.
ओसीडी असलेली व्यक्ती सतत अस्वस्थ असते. आपले वागणे चुकीचे आहे हे तिला समजत असते; पण ते ती थांबवू शकत नाही. त्यामुळेच अस्वस्थता वाढत जाते. कृती करण्याचे कम्पल्शन त्या व्यक्तीला वाटत असते म्हणूनच या आजाराच्या नावात तो शब्द आहे.
या आजाराचे मुख्यत: दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कृती करण्याचे कम्पल्शन असते. दुसºया प्रकारात मात्र अशी कृती असतेच असे नाही. असा त्रास असणाºया व्यक्तीच्या मनात एकच विचार परत परत येतो आणि त्या विचाराचीच तिला भीती वाटू लागते. काही पुरुषांच्या मनात लैंगिक विचार पुन: पुन्हा येत राहतात, त्यामुळे हे पुरुष स्त्रियांशी नीट संवाद साधू शकत नाहीत. मनात येणाऱ्या विचारामुळे त्यांना अपराधी वाटत राहते. मनात येणारा विचार चुकीचा आहे हे त्या व्यक्तीच्या बुद्धीला पटत असते; पण मनातून तो विचार जात नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढत जाते. पॉझिटिव्ह थिंकिंग करायला हवे हे माहीत असते; पण मनात येणाऱ्या या निगेटिव्ह विचाराचे काय करायचे हा प्रश्न काही सुटत नाही. माणसाच्या मेंदूतील प्री फ्रण्टल कोर्टेक्सची काही कामे खूप महत्त्वाची असतात. या कार्यात सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वत:ला थांबवता येणे हे एक महत्त्वाचे काम आहे. हा मनाचा ब्रेक चांगला नसतो त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात. ओसीडी या आजारात हा ब्रेकच सक्षम नसतो. सजगतेच्या व्यायामांनी म्हणजेच माइण्डफुलनेसने मेंदूतील ब्रेक चांगला होतो. त्यामुळे ओसीडीचा त्रास कमी होऊ शकतो.
माइण्डफुलनेस हा मेंदूचा व्यायाम आहे. शारीरिक व्यायाम जसा फिजिओथेरपी म्हणून उपयोगी आहे त्यामुळे तो सर्वच माणसांनी निरोगी राहण्यासाठी करायला हवा. तसेच या मेंदूच्या व्यायामाचेही आहे. तुमचा आमचा मंत्रचळ आजारात परावर्र्तित होण्याचे टाळायचे असेल तर माइण्डफुलनेसचा सराव अंगीकारायला हवा.

का लागतो आपल्याला मंत्रचळ?
मंत्रचळ असणाऱ्या रुग्णांच्या मेंदूची तपासणी केली असता त्यात मुख्यत: दोन पॅटर्न दिसतात. भीतीपोटी कृती करण्याची सवय असते, सतत नमस्कार करणे किंवा हात धुणे असा प्रकार असतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या मेंदूतील अमायग्डला हा भावनिक मेंदूचा भाग अधिक स्क्रिय असतो. असे स्वाभाविक आहे कारण हा मेंदूचा भाग कोणतेही संकट जाणवले की प्रतिक्रि या करतो. त्यामुळेच मनात भीती निर्माण होते ! नमस्कार केला नाही तर देव शिक्षा करेल, काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटते, तीदेखील या अमायग्डलाचीच प्रतिक्रि या असते.
मेंदूतील दुसरा पॅटर्न म्हणजे मेंदूच्या प्री फ्रण्टल कोर्टक्सचे कार्य नीट होत नसते. माणसाच्या मेंदूतील या भागात वेगवेगळी केंद्रे असतात. या भागातील डॉर्सोलॅटरल प्री फ्रण्टल कोर्टक्स हे मुख्य अटेन्शन सेंटर आहे. आपले अटेन्शन कोठे असावे ते हा भाग ठरवतो. प्री फ्रण्टल कोर्टक्सला मेंदूचा सीईओ असे म्हणतात. कारण रोजच्या बिझनेसमध्ये कशाला महत्त्व द्यायचे आणि कशाला नाही हे जसे कंपनीचा सीईओ ठरवतो, तसेच कोठे लक्ष द्यायचे हे मेंदूतील हा भाग ठरवत असतो. ओसीडीचा त्रास असणाºया माणसात हे केंद्र नीट काम करीत नसते. मेंदूचे एक्झिक्युटिव्ह फंक्शन या आजारात थोडेसे बिघडलेले असते.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com

Web Title: You are restless.. try mindfulness technique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.