या कंटाळ्याचे काय करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:00 AM2018-06-17T03:00:00+5:302018-06-17T03:00:00+5:30

कोणतीही कृती किंवा स्थिती नाविन्याची राहिली नाही की डोपामाईन पाझरणे थांबते आणि माणसाला कंटाळा येऊ लागतो.

Why Do We Get Bored? | या कंटाळ्याचे काय करायचे?

या कंटाळ्याचे काय करायचे?

Next
ठळक मुद्देकंटाळा वाईट नाही. तो सर्जनशीलतेला, क्रिएटिव्ह जगण्याला प्रेरणा देणारा आहे. त्या दृष्टीनं एखादी गोष्ट सवयीची झाली, नेहमीची झाली की ती करताना डोपामाइन पाझरत नाही हे चांगलेच आहे. कारण त्यामुळेच तर माणूस नावीन्याचा शोध घेतो.

डॉ. यश वेलणकर

सध्या कंटाळा सर्वव्यापी झाला आहे. कोटय़वधी रुपयांची एन्टरटेन्मेण्ट इंडस्ट्री हा कंटाळा, बोअरडम दूर करण्यासाठीच काम करते आहे. गंमत म्हणजे दुसर्‍याचा कंटाळा दूर करण्यासाठी या उद्योगात काम करणारी माणसेही स्वतर्‍ कंटाळत असतात. तो कंटाळा घालवण्यासाठी पाटर्य़ा करतात, ड्रिंक्स घेतात, नवीन सेक्स पार्टनर शोधतात, हरणांची शिकारसुद्धा करतात.
का येतो असा कंटाळा? त्याचे काही कारण मेंदूत आहे का? 
- या प्रश्नाचे उत्तर शास्त्नज्ञांना गवसले आहे. या बोअरडमवर विजय मिळवायचा असेल तर कंटाळा येतो त्यावेळी मेंदूत काय घडते, हे प्रमाण कमी करायचे काही उपाय आहेत का? हे समजून घ्यायला हवे.
  कंटाळा ही देखील एक भावना आहे. आपल्या सर्व भावना हा मेंदूतील रसायनांचा खेळ आहे. मेंदूतील डोपामाइन, सेरेटोनीन, एनडोर्फीन आणि ओक्झिटोसीन ही रसायने आनंद, उत्साह अशा भावनांशी निगडित आहेत. यातील मुख्यतर्‍ डोपामाइन हे रसायन कंटाळा, बोअरडम याला कारणीभूत आहे. हे रसायन मेंदूत कमी प्रमाणात असते त्यावेळी माणसाला कंटाळा येतो. निसर्गतर्‍ हे रसायन दिवसभरात अधिक पाझरते आणि रात्नी ते कमी होते. रात्नी ते अधिक असेल तर झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी कंटाळा येणे आवश्यक असते. मेंदूत हे रसायन कमी झाले की मीटिंगमध्ये बसलेली माणसे पेंगू लागतात कारण ती कंटाळलेली असतात. चित्रपट कंटाळवाणा झाला, एखाद्याचे भाषण कंटाळवाणे झाले की मेंदूतील डोपामाइन कमी होते आणि झोप येऊ लागते.
 दिवसादेखील डोपामाइन असे कमी होते, याचे कारण त्यावेळी काहीच घडत नसते. 
जागृत अवस्थेत आपण तीन प्रकारचे अनुभव घेत असतो. काही अनुभव सुखद असतात. काही अनुभव दुर्‍ख देणारे, त्नासदायक असतात. पण बरेचसे अनुभव असुखद किंवा अदुर्‍खद म्हणजे न्यूट्रल असतात. हा न्यूट्रल अनुभव कंटाळा आणणारा असतो.
 गंमत म्हणजे एखादा सुखद अनुभव बराच काळ टिकून  राहिला की त्यातील सुख कमी होऊ लागते, तो हळूहळू न्यूट्रल आणि कंटाळवाणा होऊ लागतो. शास्त्नज्ञांनी असे प्रयोग केले आहेत. चुंबन घेणे, किस घेणे हा अनुभव बर्‍याच जणांना उत्तेजित करणारा असतो, अनेक कवींनी पहिल्या चुंबनावर कविता केल्या आहेत. चुंबन घेण्याच्या कल्पनेनेच मेंदूत डोपामाइन पाझरते, मन उत्तेजित होते, उत्साहते. पण त्याच चुंबनाच्या स्थितीत बराच वेळ राहिले तर तो अनुभवही कंटाळवाणा होतो. त्यावेळी मेंदूतील डोपामाइन कमी झालेले असते, असे शास्त्नज्ञांना आढळले आहे.
कोणतीही कृती किंवा स्थिती नावीन्याची राहिली नाही की डोपामाइन पाझरणे थांबते आणि माणसाला कंटाळा येऊ लागतो.
माणसाला कोणतेही व्यसन लागते त्याला डोपामाइन कारणीभूत असते. हे व्यसन दारू, तंबाखू यासारख्या पदार्थाचे असते किंवा शॉपिंग, कम्पल्सिव्ह सेक्स, पोर्नोग्राफी, जुगार, सोशल मीडिया यांचेही असू शकते. सुरुवातीला या गोष्टी किंवा कृती उत्तेजित करणार्‍या असतात. त्या उत्तेजनामुळे डोपामाइन पाझरते, त्यामुळे छान वाटते. मात्र मेंदूत डोपामाइन सतत अधिक पातळीत राहत नाही, काही वेळाने ते कमी होते. ते कमी झाले की पुन्हा परतून अस्वस्थ, कंटाळवाणे वाटू लागते. तो कंटाळा दूर करण्यासाठी पुन्हा ती कृती केली जाते. हळूहळू ती कृती केल्याशिवाय राहावत नाही, यालाच आपण व्यसन म्हणतो. नावीन्य संपले की डोपामाइनचे प्रमाण कमी होते हे इथेही होते. यामुळेच पेगचे, झुरक्यांचे, गुटख्याच्या पुडीचे प्रमाण वाढत जाते. उत्तेजना वाढण्यासाठी पोर्न वर्णन किंवा व्हिडीओ अधिकाधिक बीभत्स लागतात. सेक्समध्ये विकृती येते. शॉपिंगचे प्रमाण वाढते, काहीतरी थ्रील शोधले जाते.  
डोपामाइन मनात सुखद भावना निर्माण करते; पण ही  सुखद भावना तृप्तीची नसते. तृप्तीची भावना एंडोफ्रीनमुळे येते, प्रत्यक्ष कृतीचा आनंद सेरेटोनीनमुळे मिळतो. डोपामाइन हे प्रेरणेचा, उत्सुकतेचा आनंद देते. 
डिप्रेशनमध्ये सेरेटोनीन आणि डोपामाइन ही दोन्ही रसायने कमी होतात, त्यामुळेच या आजारात काही करावे असे वाटत नाही आणि काही केले तरी आनंद होत नाही. क्लिनिकल डिप्रेशन या मनोविकारामध्ये औषधे देऊनही  सेरेटोनीन आणि डोपामाइन ही रसायने वाढवली जातात. ही रसायने वाढली की उत्सुकता वाढू लागते, सुख अनुभवता येते. 
मेंदू विज्ञानातील आधुनिक संशोधन असे सांगते की ही प्रक्रि या दोन्ही दिशांनी होते. म्हणजे औषधांनी डोपामाइन वाढले की उत्सुकतेचा आनंद वाटू लागतो हे जसे खरे आहे तसेच आपण प्रयत्नपूर्वक उत्सुकता वाढवली की मेंदूतील डोपामाइन वाढते हेही खरे आहे. विज्ञानातील या शोधामुळे हे नक्की झाले आहे की आपण आपल्या मेंदूतील रसायनांचे गुलाम न राहता स्वामी होऊ शकतो. आपल्या भावना मेंदूतील रसायनांवर अवलंबून असतात हे जसे खरे आहे तसेच आपण भावना बदलल्या तर मेंदूतील रसायने बदलतात हेही खरे आहे. 
आपण मनातील उत्सुकता वाढवून मेंदूतील डोपामाइन वाढवू शकतो, आनंदी होऊन सेरेटोनीनची निर्मिती करू शकतो. कंटाळा घालवण्यासाठी मनात उत्सुकता निर्माण करणे हा उपाय आहे. सजगतेचा सराव करताना येणारा कंटाळादेखील उत्सुकता वाढवून कमी करता येऊ शकतो. बोअरडमचा त्नास कुणाला जास्त होतो हे व्यक्तिमत्त्वातील काही घटकांवर अवलंबून आहे का? याचे संशोधन होत आहे. त्यानुसार आत्मभान, सेल्फअवेअरनेस कमी असतो त्यांना कंटाळवाणेपणाचा त्नास जास्त होतो असे स्पष्ट होत आहे. हे आत्मभान सजगतेच्या नियमित अभ्यासाने वाढते. असे आत्मभान असणारी माणसे कंटाळा घालवण्यासाठी सर्जनशील कल्पनांचा पाठपुरावा करतात. त्यासाठी त्यांना मिळणारा वेळ अपुरा आहे असे वाटू लागते. वेळ घालवण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी काय करायचे? हा प्रश्न त्यांना पडत नाही. येणार्‍या काळात बोअरडम ही मोठी समस्या असेल असे समाजशास्त्नज्ञांना वाटते. सतत कानात इअरफोन घालून राहणारी अधिकाधिक माणसे पाहिली की त्याचे प्रत्यंतर येऊ लागते. कंटाळा घालवण्यासाठी सतत बाह्य मनोरंजनाच्या विळख्यात सापडलेल्या या माणसांना आत्मभान आणि माइंडफुलनेस याविषयी जागरूक करणे महत्त्वाचे आहे, ते म्हणूनच!

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे 
अभ्यासक आहेत.)

Web Title: Why Do We Get Bored?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.