शाळेसाठी बागायती जमीन विकणारा शिक्षक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:07 AM2018-12-02T09:07:00+5:302018-12-02T09:10:04+5:30

आत्मप्रेरणेचे झरे : शाळेच्या विकासासाठी स्वत:ची तीन एकर बागायती जमीन विकणाऱ्या व थेट पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांना शिक्षणविकासासाठी साकडे घालणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्याध्यापक सचिन सूर्यवंशी यांची मुलाखत. 

a teacher who sold his farm land for school building | शाळेसाठी बागायती जमीन विकणारा शिक्षक 

शाळेसाठी बागायती जमीन विकणारा शिक्षक 

googlenewsNext

- हेरंब कुलकर्णी

* प्रश्न- तुम्ही शाळेच्या विकासासाठी स्वत:ची जमीन विकली हे खरे आहे का?
 -  होय. माझ्या शाळेला आर्थिक मदत व्हावी म्हणून मी माझी तीन एकर बागायती शेती लिलावात विकायला काढली. तीन वर्षे जाहिरात देऊन कोणीच खरेदीला आले नाही. शेवटी शेजारच्या गावातील शेतकऱ्याने जमीन खरेदी केली. त्यातून आलेले २० लाख बँकेत ठेवून त्यावर येणारे ११ हजार रुपये व्याज मी दर महिन्याला शाळेला देतो आहे. लवकरच एक ट्रस्ट करून त्यात ते २० लाख रुपये जमा करणार आहे. याबरोबरच शेतीसाठी सरकारकडून मिळालेले ८० हजार रुपये अनुदानही मी शाळेलाच देऊन टाकले. पालकांच्या मदतीने खैरी नदीच्या काठाची दोन एकर जमीन मिळवून त्यात शेती सुरू केली आहे. त्यातील उत्पन्न विकून शाळेला मदत होते. अशा प्रकारे शाळेला जास्तीत जास्त मदत मिळवतो आहे.

* प्रश्न- शेती विकताना घरून विरोध झाला नाही का?
 -  नाही. घरचे लोक समजूतदार आहेत. त्यांना गावाच्या शाळेसाठी मी हे करतो आहे. त्यामुळे त्यांना हे पटले. त्यामुळे विरोध झाला नाही 

* प्रश्न- तुम्ही शिक्षणाला लोकांनी आर्थिक मदत करावी म्हणून पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांना गुजरातला जाऊन भेटलात, असे समजले ?
 -  आज देशात पुतळ्यांचे राजकारण सुरू आहे. देशातील ‘एज्युकेशन’ सर्वात उंच जायला हवे. याच भावनेतून मी त्यांना भेटलो. जशोदाबेन या पंतप्रधानांच्या पत्नी आहेत आणि विशेष म्हणजे त्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. माझी कल्पना अशी आहे की, देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. प्रत्येक नागरिकाने रोज एक रुपया फक्त या देशातील शिक्षणासाठी खर्च करावा. त्यातून रोज १२५ करोड शिक्षणाला मिळतील. या कल्पनेला गती देण्यासाठी मी चार वेळा गुजराथमध्ये जाऊन जशोदाबेन यांची भेट घेतली. ११,००० रुपयांचे पहिले व्याज त्यांच्या हस्ते शाळेच्या खात्यात ट्रान्स्फर केले. त्यांनी माझ्यासोबत मणिभद्र मंदिरात येऊन माझ्या संकल्पनिर्मितीसाठी पूजा केली व माझ्या मोहिमेला समर्थन दिले. त्यांची सुवर्णतुला करून ती मदत शाळांना देण्याची योजना आहे. त्या १५ आॅगस्टला माझ्या शाळेत येणार होत्या; पण सुरक्षेच्या कारणाने प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली 

* प्रश्न- तुम्ही ‘शिक्षणासाठी रोज १२५ कोटी’ या कल्पनेसाठी आणखी कोणाकोणाला भेटलात?
 -  मी यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सचिवांना दिल्लीत भेटलो. अण्णा हजारे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटलो. विकास आमटे, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, नीलम गोºहे या सर्वांशी संपर्क करून माझी कल्पना मांडली आहे. 

* प्रश्न- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तुम्ही काय कल्पना मांडली?
 -  मी शिक्षणमंत्र्यांना म्हणालो की, आमदार दत्तक शाळा योजना राबवा. आमदारांनी मतदारसंघातील दरवर्षी एक शाळा अत्युत्कृष्ट करून दाखवायची. त्या शाळेची प्रगती बघून इतर शाळा प्रेरित होतील. शिक्षणमंत्र्यांना ती कल्पना आवडली. त्यांनी ती अधिवेशनात मांडलीही; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी फार पुढे गेली नाही. दत्तक गाव कल्पना आली. मग दत्तक शाळा का नको? 

* प्रश्न- शाळा विकासासाठी तुमच्या पुढील कल्पना काय आहेत?
 -  गावोगावी हरिनाम सप्ताह होतो. त्याला ग्रामीण भागातील लोक खूप आर्थिक मदत करतात. त्या धर्तीवर पुढील वर्षी माझ्या गावात मी ‘शिक्षण हरिनाम सप्ताह’ आयोजित करणार आहे. ग्रामीण भागातून शिकून वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे गेलेल्या मान्यवरांची ७ दिवस व्याख्याने मी आयोजित करून ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. असे सप्ताह गावोगावी झाले पाहिजेत.

( herambkulkarni1971@gmail.com ) 
 

Web Title: a teacher who sold his farm land for school building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.