आईची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 07:00 AM2019-02-10T07:00:00+5:302019-02-10T07:00:02+5:30

मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.

Mother's School | आईची शाळा

आईची शाळा

googlenewsNext


आमीन चौहान

बालकाचा पहिला गुरु, संस्काराचे केंद्र अन् सुधारणेची पहिली पायरी असते आई. बालकाला सर्वाधिक प्रेम आणि सहवास देणारी आई. मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.
लहान मुलांसाठी सबकुछ असते ती आई आणि मुलांबाबत सबकुछ माहीत असणारी कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आई. बालक वडिलांपेक्षा आईच्या सहवासात अधिक असतो. व्यवसाय आणि इतर कार्यव्यस्ततेतून अनेक वेळा वडील मुलांसाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये आयोजित पालकसभांना पुरुष पालकांकडून प्रतिसाद कमीच मिळतो.
मुलांच्या गुणवत्ता विकासाबाबत कुणाशी बोलावे, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना पडतो. बालकांविषयी पालकांशी संवाद होणे आवश्यक असल्याने वडिलांऐवजी आईशी संवाद साधता आला तर? याच विचारातून आम्ही गेल्या काही वर्षांपासून आमच्या शाळेत 'आईची शाळा' आयोजित करतो. ही शाळा यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस तालुक्यातील निंबा या गावी असलेली जि.प. उच्च. प्रा. शाळा होय. मकरसंक्रांतीला महिला हळदी कुंकवासाठी सर्वत्र वेळ काढून जात असतात. तेव्हा आईचा वेळ तिच्या पाल्यासाठी मिळवायचा प्रयत्न म्हणून शाळेत असे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आम्ही घेऊ लागलो. यासाठी शाळेतील महिला शिक्षकांचा पुढाकार आवश्यक आणि तेवढाच महत्त्वाचा असतो. संक्रांतीच्या काळात आयोजित या आईच्या शाळेसाठी ‘वाण’ आवश्यक असते. मग यालाही स्वच्छतेची जोड देत स्वच्छता साधने जसे पाणी घेण्याचे ओगराळे, पिण्याचे पाणी गाळण्याची चाळणी, छोटा अंघोळीचा साबण, छोटा हँडवॉश, झाडू, केरसुणी, नेलकटर, स्वच्छतेचं माहितीपत्रक असे साहित्य निवडले.
आईच्या शाळेत महिलांना आधी बौद्धिक, वैचारिक मेजवानी द्यायची आणि नंतर वाण व इतर सोपस्कार पूर्ण करायचे. अशा आईच्या शाळेतून वर्गशिक्षक यांचा थेट माता पालकाशी संपर्क येऊन मुलांबाबत चर्चा होते. मातापालक आणि शिक्षकांचा परिचय होतो. मुलांची बलस्थानं आणि उणिवा थेट पालकांपर्यंत पोचविता येतात. आईशी बालक मनमोकळेपणाने बोलतात. तो आपल्या समस्या, अडचणी, कल्पना, मागण्या आईसमोर मांडतो. तेव्हा आई आणि बालकातील सहज होणाºया या संवादाचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी करून घेण्यात आईची शाळा खूप उपयुक्त सिद्ध झाली आहे. शिवाय मुलांच्याही शाळेविषयी काही समस्या, अडचणी, तक्रारी असू शकतात. मुले या गोष्टी आईशी शेअर करीत असतात. तेव्हा या बाबी शाळेपर्यंत पोचविण्यासाठी आईजवळ ही नामी संधी असते.
अनेक माता पालक या संधीचा उपयोग करुन घेतात. शिक्षक पालक असा संवाद होऊन बरेच समज गैरसमज यातून दूर होतात. शैक्षणिक विकासासाठी शाळांमध्ये वातावरणाची निर्मिती आवश्यक असते. शाळांमध्ये आजकाल अनेक सामाजिक सण, उत्सव साजरे केले जातात. तेव्हा सामाजिक सणांचा अशा वातावरण निर्मितीसाठी उपयोग करायला हवा.
वातावरण निर्मितीचा हा अभिनव प्रयोग मुलांच्या, शाळांच्या व समाजाच्याही उपयोगाचा नक्कीच सिद्ध होईल. गरज आहे ती पुढाकार घेऊन या सणांना सकारात्मक वळण देण्याची.

Web Title: Mother's School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.