माळढोकच्या खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:00 AM2018-10-21T06:00:00+5:302018-10-21T06:00:00+5:30

२००५च्या माळढोक पक्षी गणनेनुसार एकूण ५० माळढोक महाराष्ट्रात होते. २०१० साली ही संख्या १०वर आली, तर यावर्षी एकही माळढोक आढळला नाही. अभयारण्य तर झाले; पण केवळ कायदे करून जैवविविधता सांभाळता येत नाही, हेच यातून अधोरेखित होते. दुसरीकडे अभयारण्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक निर्बंध लादले गेले. त्यामुळे माळढोक नकोच, अशी भावना लोकांमध्ये जोर धरत गेली..

The Great Indian Bustard is vanishing | माळढोकच्या खुणा

माळढोकच्या खुणा

Next
ठळक मुद्देआजही कधीमधी दिसणाऱ्या एका पक्ष्यासाठी सुमारे ३६६ चौ.कि .मी. क्षेत्र राखीव ठेवणे, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय खर्च करणे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे आहे.

प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे 
नामशेष होत जाणारा माळढोक पक्षी, माळढोक अभयारण्य आणि त्यातून उद्भवलेले शेतकऱ्यांचे प्रश्न यासंदर्भातले वाद दरवर्षी रंगतात, तसे ते यावर्षीही रंगले.
‘माळढोक’ महाराष्ट्रातून हद्दपार होतोय की काय? अशा परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना कोण आहे हा माळढोक? आणि त्यावर एवढी चर्चा का, हे प्रश्न पडणे साहजिकच आहे.
‘सारंग’ कुळातील पक्ष्यांपैकी ‘माळढोक’ किंवा ‘मोठा भारतीय सारंग’ हा सर्वांत आकर्षक आणि महत्त्वाचा पक्षी. हा पक्षी फक्त भारतातच आढळतो अन् तेही पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याच राज्यांमध्ये. ‘वाघ जसा जंगलाचा राजा, जंगलाच वैभव तसाच माळढोक हा माळरानाचं वैभव. विस्तृत माळरानावर राहणारा हा पक्षी असल्याने साहजिकच तो डोंगरदºयात, दाट जंगल झाडीत आढळून येत नाही.
सुमारे मीटरभर उंचीचा हा पक्षी २५ ते ३० पौडांचा असतो. पायाला काटकोनात असलेले आडवे शरीर ही त्याची महत्त्वाची ओळख. पूर्वी हा पक्षी भारतातील विविध राज्यांत हजारोंच्या संख्येनं आढळून येत होता; पण बेसुमार शिकारींमुळे या पक्ष्याची संख्या झपाट्यानं कमी होत गेली. त्यामुळे त्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील ७८१८.४७ चौरस किलोमीटर क्षेत्र २७ सप्टेंबर १९७९ रोजी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. मात्र यात शेकडो खेडी, हजारो हेक्टर शेती, मानवी गरजांशी अन् क्षेत्रीय विकासाशी निगडित खूप मोठे क्षेत्र अभयारण्याखाली आल्याने सुरुवातीपासूनच या अभयारण्याला लोकांचा विरोध होता.
स्वातंत्र्यपूर्व काळात हजारोंच्या संख्येत असलेला माळढोक ब्रिटिश आणि स्थानिक शिकाºयांमुळे शेकड्यात आला. बंदुका आणि जीपसारख्या वाहनांमुळे माळरानावर खुरट्या गवतांमध्ये आढळणाºया या पक्षांची शिकार करणे या मंडळींना सोपे होते. याचाच परिणाम म्हणून माळढोकांची संख्या दिवसागणिक कमी-कमी होत गेली. या पक्षांची संख्या कमी होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे माळढोक वीणीच्या हंगामात एकच अंडे घालतो, हे अंडेही माळावर उघड्यावरच (जमिनीवरच, नांगरटीमध्ये) असल्याने त्याला शत्रूही भरपूर, भटकी कुत्री, घोरपडी माळढोकांची अंडी खातात. कधी हे अंडे बैलाच्या पायाखाली तर कधी नांगराच्या खाली, एकूण काय तर माळढोकांच जीणं हे असं खडतर झालेलं.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या एका अहवालानुसार १९८९-९० साली महाराष्ट्रात फक्त ७० माळढोक पक्षी होते, तर संपूर्ण भारतात ही संख्या ७७० होती. यामुळेच माळढोकचा समावेश वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या सुधारित अधिसूची एकमध्ये करण्यात येऊन त्याची शिकार करणाºया व्यक्तीस तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. माळढोक संवर्धनासाठी त्याचा ‘अधिवास’ सांभाळला पाहिजे आणि त्याच्या जीवनशैलीचाही अभ्यास करावयास हवा म्हणून विविध प्रकल्प, संशोधन उपक्रम या अभयारण्य क्षेत्रात राबविले गेले.
२००५ मध्ये तर राज्यव्यापी ‘माळढोक पक्षी गणना’ राबविण्यात आली, जी पुढे काही वर्षे सुरू राहिली. महाराष्ट्राच्या ज्या भागात (उदा. वांबोरी, बेलवंडी, शिरसगाव, वरखडे, वैजापूर, कर्जत आदी) पूर्वी माळढोक आढळल्याच्या नोंदी होत्या, तो परिसर पाटपाण्याखाली आल्याने तेथील खासगी माळरानं ऊसशेतीमध्ये बदलत गेली. अनेकांगाने हा परिसर विकसित होत गेला. हा विकास होत असताना केवळ अभयारण्य आहे म्हणून अनेक निर्बंध शेतकºयांवर येत होते, या निर्बंधांमुळे शेतकºयांना माळढोक हा आपला शत्रू वाटू लागला. ज्या शेतात माळढोकचे अंडे दिसले, त्या शेतकºयाला खरं तर शासनाने नुकसानभरपाई देऊन ते क्षेत्र संरक्षित करायला हवं होते; परंतु त्या काळात ते घडलं नाही. या निर्बंधामुळे म्हणावी तशी औद्योगिक भरभराट नान्नज, करमाहा या भागाची झाली नाही. राजकीय क्षेत्रातील वजनदार स्थानिक नेतृत्वालाही या परिसरातील त्यांच्या मतदारांसाठी उद्योगधंदा सुरू करता आला नाही हे वास्तव आहे. या पक्ष्यामुळे आपले धंदे, व्यवसाय अडचणीत येत आहे ही भावना शेतकºयांमध्ये बळ धरीत गेली आणि आपल्या शेतात, परिसरात माळढोक दिसला किंवा त्याने अंडे घातले हे सांगण्यासही कुणी पुढे येईना. वनविभागाची परिस्थिती तशी नाजूकच होती, या विस्तीर्ण अभयारण्यासाठी तुटपुंजा कर्मचारी वर्ग, वाहतुकीच्या संसाधनाची वानवा, एक ना अनेक याचा व्हायचा तोच परिणाम झाला माळढोकांची संख्या रोडवत गेली.
पक्षी अभ्यासक म्हणून विचार करता माळढोकचा अधिवास आपणास सांभाळता, राखता आला नाही हे मान्य करावे लागेल (याची शास्त्रीय कारणेही विविधांंगी आहेत) केवळ कायदे करून, कायद्याचा धाक दाखवून जैवविविधता सांभाळता येत नाही, हेदेखील यातून अधोरेखित होते. समाजाचा, लोकांचा मनापासून सहभाग यासाठी महत्त्वाचा ठरतो. या अभयारण्यासाठी प्रारंभापासूनच स्थानिक लोक, जनसमुदाय विरोधात होता. त्यांच्या शेती व्यवसायावर, बांधकाम, खाणकाम, विहीर खोदाई, रस्ते निर्माण, लघुउद्योग, औद्योगिक वसाहती यावर शासकीय निर्बंध होते किंवा त्याचा बागुलबुवा सातत्याने स्थानिकांच्या मानगुटीवर स्वार होता. यामुळेच आपल्या परिसरात, शेतात माळढोक दिसला तरीही कोणी शेतकरी त्याची जाहीर वाच्यता करीत नव्हता, सारी भिस्त वनकर्मचारी आणि निसर्ग अभ्यासकांवर, स्वयंसेवकावरच होती.
आजही कधीमधी दिसणाऱ्या एका पक्ष्यासाठी सुमारे ३६६ चौ.कि .मी. क्षेत्र राखीव ठेवणे, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय खर्च करणे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे आहे. ज्या पक्षापायी आपला, आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होत नसेल असा पक्षी, असे अभयारण्य आपणास नकोच ही भावना अभयारण्य ग्रस्तांमध्ये जोर धरत आहे, याचाच परिपाक म्हणून अभयारण्य क्षेत्र घटत चालले आहे.
माळढोकची संख्या कमी कमी होत गेल्याने (हजारांपासून एकपर्यंत) माळरानांवर निसर्गावर नेमका काय दुष्परिणाम झाला, निसर्ग साखळीत कुठे बिघाड झाला याचा अभ्यास अन् समर्पक उत्तरे (जी स्थानिकांच्या पचनी पडतील) आपल्याकडे नाहीत. वाढती लोकसंख्या, वाढती खाद्यान्नाची गरज वाढत्या मूलभूत सुविधा, दळवळण, औद्योगिकीकरण, बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न या ‘माळढोक’शी निगडित आहेत. या प्रश्नांची उकल जोपर्यंत होणार नाही, जनमनाचे समाधान जोवर होणार नाही तोपर्यंत माळढोकच्या खुणा जपाव्यात का? हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.

माळढोकची वस्तुस्थिती काय?
२००५च्या माळढोक पक्षीगणनेनुसार नान्नज अभयारण्य परिसरात फक्त २२ पक्षी होते, तर उर्वरित क्षेत्रात साधारण २८ असे एकूण ५० माळढोक महाराष्ट्रात होते. २०१० साली ही संख्या १०वर आली, तर अगदी अलीकडे २०१५ साली महाराष्ट्रात फक्त तीनच माळढोक दिसून आले आणि यावर्षी महाराष्ट्रात एकही माळढोक आढळला नाही.
२००५ पासून पुढे पाच-सहा वर्षे सातत्याने ‘माळढोक पक्षी गणना’ सुरू होती. अहमदनगर जिल्ह्यामध्ये यादरम्यान एकही माळढोक प्रत्यक्ष दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे. असाच अनुभव इतर जिल्ह्यांमधूनही होता. ही गणना शास्त्रशुद्ध असल्यामुळे विश्वासार्ह होती. या सर्व नोंदीचा अन् विस्तीर्ण क्षेत्राचा अभ्यास करून डॉ. विश्वास सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने अभयारण्याचे क्षेत्र कमी करून ते १२२९ चौ.कि.मी. एवढेच ठेवण्यात यावे असे स्पष्टपणे सांगितले. २०१४ मधील या निर्णयाशी स्थानिकांचे समाधान झाले नाही, ज्या गायरानामध्ये शेतांमध्ये माळढोक वर्षानुवर्षे दिसला नाही अन् बदलेल्या पीकपद्धतीमुळे तो पुन्हा या परिसरात परतण्याची काहीएक खात्री नसताना शेतकऱ्यांनी या निर्णयावर मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या आणि आता ‘माळढोक अभयारण्याचे क्षेत्र ३६६ चौ.कि.मी. एवढेच ठेवण्यात आले आहे.
ज्यावेळेस या अभयारण्याची निर्मिती झाली त्यावेळेस हे भारतातील सर्वांत विस्तृत अभयारण्य होते, जे केवळ ‘माळढोक’ या एकाच पक्षासाठी संरक्षित होते. ज्या वेळेस या पक्ष्यांची संख्या बºयापैकी होती, त्यावेळेस १९६२मध्ये याच्या संरक्षणासाठी कृत्रिम प्रजननसारखे प्रयोग केले गेले, जे निष्फळ ठरले. नंतर ही केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राज्य शासनाचा वनविभाग, भारतीय वन्यजीव संस्था, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व इतर संस्थांनी एकत्रितपणे माळढोक संवर्धनासाठी अभ्यास प्रकल्प राबविले, तथापि त्यांनाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. २०१५ साली एकच माळढोक नान्नज परिसरात दिसल्याचे बोलले जाते, आजही या क्षेत्रामध्ये एकच मादी पक्षी अधूनमधून दिसून येते. एकूण काय तर महाराष्ट्रातून माळढोक हद्दपार होतोय.

(लेखक मानद वन्यजीव रक्षक असून, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे नगर
जिल्हा संघटक आहेत.)

sudhakarkurhade@gmail.com

Web Title: The Great Indian Bustard is vanishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.