जर्मनी

By admin | Published: November 4, 2016 04:08 PM2016-11-04T16:08:27+5:302016-11-07T10:57:47+5:30

जगभरात कचऱ्याच्या प्रश्नानं गंभीर स्वरूप धारण केलं आहे. कचऱ्याचे अस्ताव्यस्त ढीग रस्त्यावर आले आहेत.

Germany | जर्मनी

जर्मनी

Next

 - राजू नायक

जगभरात कचऱ्याच्या प्रश्नानं गंभीर स्वरूप धारण केलं आहे.
कचऱ्याचे अस्ताव्यस्त ढीग रस्त्यावर आले आहेत.
अनेक देशांमध्ये माणसाने तयार केलेले काही डोंगर तर कचऱ्याचेच आहेत. 
अनेक गरीब देश कचऱ्याखालीच गटांगळ्या खाताहेत.
कचरा टाकायचा कुठे यावरून जगभरात युद्धं पेटायची वेळ आली आहे.
- याला अपवाद जर्मनीचा. आधी त्यांनी आपल्या देशातला कचरा कमी केला. 
त्यासाठी जागोजागी कचरा प्रकल्प उभारले. हे प्रकल्प चालवण्यासाठी 
जर्मनीला आता त्यांच्या देशातला कचरा पुरेनासा झाला आहे. 
त्यांनी आता शेजारच्या देशांमधून कचरा आयात करायला सुरुवात केली आहे.

मानवाची प्रगती त्याला शाप ठरू शकते, हे त्याला उमजू लागले जेव्हा अधिक श्रीमंती अधिक कचऱ्याची निर्मिती करू लागली. तंत्रज्ञानाने अनेक उत्तरे शोधली; परंतु कचरा कसा संपवायचा याचे कोडे मात्र त्याला उमजलेले नाही.
सध्या तर कचरा कुठे टाकायचा हा सर्वांनाच ग्रासणारा महत्त्वाचा प्रश्न आहे.
जगातील सर्वात सुंदर शहरांना सध्या तो एकच प्रमुख प्रश्न बनून डसतोय. कचऱ्याच्या थप्प्या आणि त्याचे बनलेले डोंगर. ती एक जागतिक समस्या बनलीय. परिणामी सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न, पर्यावरणाचा विध्वंस आणि गरीब देशांना पडलेला विषसदृश परिस्थितीचा विळखा! जगातील अर्ध्याअधिक लोकसंख्येला नियमित कचरा गोळा करण्याची सोय नाही आणि त्यातूनच रोगराईशी मुकाबला करण्यासाठी आरोग्यावर त्यांना मोठा खर्च करावा लागतोय.
शहरांमध्ये आधीच निवासासाठी जमीन अपुरी असते, तेथे कचऱ्यासाठी जागा कुठून आणणार? त्यामुळे शहरे आसपासच्या खेड्यांमध्ये कचरा साठवू लागली आणि त्यामुळे संघर्ष उद्भवू लागलाय.
ज्या देशाचा इतर अनेक बाबतीत अभिमानाने उल्लेख करतात त्या इस्रायलमध्येही कचऱ्याचा प्रश्न आज गंभीर स्वरूप धारण करू लागलाय. कचऱ्याचे डोंगर रस्त्यावर आलेत, काही डोंगर तर कचऱ्याचेच आहेत. बैरूतमध्येही लोक रस्त्यावर आलेत. जगभर कचऱ्याचा प्रश्न उग्र होतोय. 
जेवढे अधिक औद्योगिकीकरण व शहरीकरण, तेवढा अधिक कचरा. दुसऱ्या बाजूला गरीब देश कचऱ्याखाली गटांगळ्याच खाताहेत. 
आफ्रिकी व आशियाई देशांमध्ये लोकसंख्यावाढ, शहरीकरण व ग्राहकीकरणाला आलेल्या वेगामुळे कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढतेय. वाढत्या शहरीकरणाशी नागरी सुविधांची सांगड घालण्यात त्यांना गंभीर अपयश आले आहे. परिणामी अनेक आजार व रोगराई. अनियंत्रित व बेकायदेशीर कचऱ्यामुळे तर नद्या व भूगर्भातील पाणीही प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुन्हा आर्थिक ओझे वाढते आहे.
या सगळ्या जगभरच्या अत्यवस्थ चित्राला जर्मनी मात्र अपवाद. अमेरिका-चीनसारख्यांचा कचरा वाढत असताना जर्मनीने मात्र तो प्रयत्नपूर्वक कमी केलाय. इतका की त्यांनी सुरू केलेले कचरा प्रकल्प चालविण्यासाठी कचरा आयात करण्याची पाळी आता या देशावर आलीय.
- एरवी आपल्याला अचंबा वाटेल अशी ही गोष्ट अलीकडच्याच प्रवासात मी जर्मनीत प्रत्यक्ष पाहिली.
गोव्याचे एक कल्पक शेतकरी अजित मळकर्णेकर यांनी जर्मनीला येण्याचे आमंत्रण देण्यामागे मुख्य उद्देश होता, तो मी तेथे जाऊन कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था पाहावी हा! कारण गोव्यात कचरा व्यवस्थापनासंदर्भात जर्मनीचा मोठ्या अभिमानाने उल्लेख होतो. 
मळकर्णेकर यांची पत्नी जर्मन नागरिक आहे. अजित सतत जर्मनीत ये-जा करीत असतात आणि गोव्यावर नितांत प्रेम असल्याने जर्मनीतील अनेक प्रागतिक गोष्टी आपल्याकडे याव्यात, याकडे त्यांचा कटाक्ष आहे. 
आमच्याकडे गोव्यात साळगावला जर्मनीहूनच कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आणलाय; परंतु तो आम्ही व्यवस्थित चालवत नाही. 
एका टीव्ही चर्चेत प्रसिद्ध आर्किटेक्ट डिन डिक्रुझ यांनी आरोप केला, की हा प्रकल्प दर १५ दिवसांनी बंद पडतो. त्याचे मुख्य कारण त्यांनी दिले ते म्हणजे गोव्यात कचऱ्याची व्यवस्थितपणे विभागणी न करता, आहे तसाच कचरा टाकला जातो. जर्मनीत तसे होत नाही.
- त्याचे प्रत्यक्ष दर्शन मी अलीकडेच घेतले. 
सकाळी फिरायला जाताना मळकर्णेकर यांनी मला प्रत्येक घरासोर व्यवस्थित बांधून ठेवून दिलेला कचरा दाखवला. प्रत्येक घरासमोर चार-पाच थैल्यांमध्ये कचरा गोळा करून ठेवण्यात आला होता. आपल्याकडे ओला व सुका असे दोनच प्रकार. जर्मनीत चार-पाच प्रकारात विभागणी करूनच कचरा जमा करतात. दर दिवशी प्रत्येक प्रकारचा कचरा नेणारे ट्रक सारखे फिरत असतात.
मलाच दाखवण्यासाठी असेल कदाचित; परंतु अजित आणि त्याची पत्नी डॉरीस मला आपला कचरा घेऊन कचरा गोळा करण्याच्या केंद्रात घेऊन गेले. सकाळी १० वाजता हे केंद्र उघडले. त्याचवेळी आम्ही पोहोचलो तर आणखी तीन-चार मोटारी वाट पाहत दरवाजापाशी थांबल्या होत्या. दार उघडताच आम्ही आत शिरलो. चहुबाजूंनी वेगवेगळ्या पेट्या, वेगवेगळ्या आकाराच्या ठेवलेल्या होत्या. डॉरिसबायने पालापाचोळा व गवत कापून आणले होते. ती थैली उचलून ती ट्रकवजा पेटीवर चढली. चढायला लोखंडी पायऱ्या. त्यांनी तो कचरा इतस्तत: कुठेही न सांडता आत ओतला. इतर पेट्या वेगवेगळ्या कचऱ्यासाठी होत्या. कॉम्प्युटर सामानापासून घरातील अडगळ, वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या, कॅन्स, कागद, नाना तऱ्हेचे तसेच टाकून द्यायचे सामान किंवा इतर चिजा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शिस्त लोकांत बाणवली गेली आहे. रस्त्यावर, फुटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कागदाचा एक चिटोरा पाहायला मिळणार नाही. नाही म्हणायला काही टारगट तरुण मुले चॉकलेट्स खाऊन ट्राममध्ये कचरा टाकत असतील; परंतु त्यांची संख्या खूप कमी. नागरिकांना स्वच्छतेची आणि कडक शिस्तीची सवयच. त्यामुळे सरकारचे, सार्वजनिक संस्थांचे मोठे काम होते. शिवाय कचरा नेणाऱ्या ट्रकांना मदत करणारे लोक. लोक स्वत:च आणून कचरा ठेवून देणार.
युरोपियन युनियननेही आता त्यांच्या सदस्य देशांना त्यांचे कचरा-डोंगर नष्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. ब्रिटनसारख्या देशांनी कचरा टाकण्याच्या स्थानांवर खूप जबरदस्त कर लागू केलेत. त्यामुळे सरहद्दीपलीकडे कचरा पाठवून देणे अधिक किफायतशीर ठरतेय. जर्मनीशी स्पर्धा करताना नेदरलँड व स्विडनही आता या व्यवसायात उतरला असला, तरी जर्मनीचे मात्र कचऱ्यावरचे प्रेम वादातीत आहे. 
यजमान अजित मला म्हणाला, इथे शाळांमध्येही लहानपणापासून कचरा टाकू नये, तो व्यवस्थित एकत्र ठेवावा, त्याची योग्य विल्हेवाट लावावी याचे धडे दिलेले असतात. त्यांची कन्या आरती म्हणाली, ‘आमची संपूर्ण जर्मन पिढी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची चळवळ चालवत वाढली आहे.’ येथे जुने कपडेही टाकून दिले जात नाहीत. अनेक दुकानांमध्ये जुने कपडे विकत घेतात. या कपड्यांपासून वेगवेगळ्या चिजा तयार होतात. त्यांचेच सुंदर हातरुमाल व इतर वस्तू अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध असतात.
एका दुकानात तर मी कॉफी मिळणाऱ्या कपापासून तयार केलेली कॅप पाहिली. चहाच्या कपांपासून दिवे तयार केले होते. शिवाय लॅपटॉपच्या बॅगपासून मोटारींच्या एअरबॅगही तयार केल्या होत्या.
बहुतेक रिसायकलिंग प्रकल्पांमध्येही काहीच फेकून दिले जात नाही. तेथील बॉयलर स्वच्छ करताना लोहचुंबकाच्या मदतीने त्यात साठलेले लोह तुकडे गोळा केले जातात. त्यातील राखही रस्ते तयार करणाऱ्या कंपन्यांना दिली जाते. याचा अर्थ, या प्रकल्पातून शेवटास काहीच शिल्लक राहत नाही. शिवाय कचरा कमी करण्याच्या प्रवृत्तीमुळे बाहेरचा कचराही जर्मनी सहज स्वीकारायला लागली आहे आणि युरोपचीही घाण स्वीकारून त्या देशाने एक मोठा पायंडा घालून दिला आहे.
अर्थात, हे प्रयोग सहज यशस्वी झालेत असेही नव्हे. गेल्या वर्षी आयर्लंडचा कचरा उत्तर जर्मनीतील ब्रेमरहॅवन या शहराच्या एका मध्यवर्ती ठिकाणी साचला, तेव्हा त्याला किंचितसा वासही येऊ लागला. त्यावर लोक खवळले. घाणीमुळे लोक हैराण तर झालेच, शिवाय त्यातून माशाही उत्पन्न झाल्या. नेतेमंडळींनी हस्तक्षेप केला व नंतर हा कचरा शेवटच्या स्थळी हॅम्बर्ग येथे हलविण्यात आला. 
हॅम्बर्गमध्ये आधी केवळ ४० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत असे. त्यामुळे तेथील अधिकारी हिरमुसले होते. सध्या त्यांनीही मोठे व आधुनिक प्रकल्प उभारले असून, शहरांमधील कचरा जादा शुल्क आकारून तेथे प्रक्रिया केली जाते. चार वर्षांपूर्वी ही प्रक्रिया पद्धती सुधारण्यात आली तेव्हा कचरा प्रक्रियेसाठी एका टनामागे ते कवळ ३५ डॉलर स्वीकारत, आज हा दर प्रतिटन ५५ ते ८० डॉलर झाला आहे. 
कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा दर वाढत जाईल, तसे इतर देशांना आपली घाण तेथे पाठविणे कठीण जाईल; परंतु शेवटी सर्वांचा उद्देश कचऱ्याचे प्रमाण कमी करणे हाच आहे. कचरा कमी करणे म्हणजेच जबाबदार नागरिक बनणे असाही नवा अर्थ आता आकाराला येऊ लागला आहे. जे आळशी आहेत, त्या देशांसाठी जर्मनीचे प्रकल्प नवनवीन कचरा स्वीकारणारच आहेत; पणजे आळशी आहेत, त्यांना शेवटी कचराच खाणार, हे नक्की!!

कचऱ्याचे डोंगर झालेत बंद!
एक दशकभर आधी जर्मनीने आपल्या सर्व लँडफिल म्हणजे तेथील कचऱ्याचे डोंगर बंद केले आहेत. संपूर्ण जर्मनीत कचरा जाळणारे किंवा खत निर्माण करणारे प्रकल्प त्यातून निर्माण झालेत. त्यातली आणखी एक सुधारणा म्हणजे जर्मनीतील घराघरांतून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही या काळात घटले; कारण सर्वसाधारण जर्मन माणसाने स्वत:च कचऱ्याचे प्रमाण कमी केले किंवा त्याचा नाश करणारी पद्धती स्वीकारली. परिस्थिती इतकी बदलली की जर्मनीतील कचरा प्रकल्पांना प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक कचरा मिळेनासा झाला. लोकसंख्येतील घट आणि जागतिक मंदी हेसुद्धा कारण कचऱ्याच्या टंचाईसाठी दिले गेलेय. त्याचा दुष्परिणाम म्हणजे ज्या कंपन्या कचरा विल्हेवाटीवर जगत होत्या, त्यांच्यावर संक्रांत ओढवलीय.

घराघरातल्या कचऱ्याचे
होते रिसायकलिंग
रिसायकलिंग आणि कचऱ्याचे प्रमाण घटवण्यावर हा देश जेवढे लक्ष देतो, तेवढे क्वचितच कोणी दिले असेल. कचऱ्याचे प्रमाण घटविण्याची ही चळवळ येथे दशकापूर्वी सुरू झाली. १९९१ मध्ये जर्मनीने केरसुणीने कचरा झटकून टाकावा त्याप्रमाणे जोरदार हिसका देणारा कायदा करून रिसायकलिंंगला संस्थात्मक स्वरूप दिले. त्याचा परिणाम अमेरिकेसारख्या देशांमध्येही चळवळी उभ्या राहून तेथेही आज ३४ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज जर्मनीत रिसायकलिंगचे प्रमाण जगातील सर्वाधिक म्हणजे घरगुती कचऱ्याच्या हिश्शात ६५ टक्के आहे. घरांमध्ये किंवा फ्लॅट्समध्ये स्वयंपाकघरातील कचरा गोळा करण्यासाठीच पाच किंवा सहा वेगवेगळे डबे ठेवलेले असतात. मोठ्या शहरांमध्ये तर वेगवेगळा कचरा ठेवण्यासाठी घरासमोरच सोय असते. बर्लिनमध्ये हिरव्या रंगाच्या बाटल्यांसाठी वेगळी पेटी, पिवळ्या पेट्या प्लॅस्टिकसाठी म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या पेट्या वेगळ्या कचऱ्यासाठी वगैरे असतात. ओला कचरा, कागद, सेंद्रिय इतर कचरा अशा अनेक क्रमवारी आहेत.

कचऱ्याच्या ऊर्जेतून
हजारो घरांत दिवाबत्ती!
कचरा प्रकल्पांना जर्मनीतील टाकाऊ घाण पुरत नाही म्हटल्यावर देश आपल्या शेजाऱ्यांकडे वळलाय. आता कचरा असंख्य बोटी व ट्रकांमधून इंग्लंड, आयर्लंड, इटली, स्वित्झर्लंड व इतर देशांमधून आयात केला जातो. दुसऱ्यांचा कचरा कोण स्वीकारणार म्हणून गोव्यात गावागावांमध्ये भांडणे होतात; परंतु आयात केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होते तेव्हा ऊर्जा तयार होते व जर्मनीतील घरांना ऊब मिळते. बर्लिनपासून १०० कि.मी.वर असलेल्या मॅगदेबर्ग येथे कचऱ्यातून बनणाऱ्या विजेवर शहराचा एक तृतीयांश भाग उजळून निघतो व त्यातून सुमारे ५० हजार घरांमध्ये दिवाबत्ती चालते.

Web Title: Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.