ड्रीम क्रूझ, स्वप्नवत सफर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:52 PM2017-08-12T15:52:03+5:302017-08-13T03:10:06+5:30

जगभरातलं सर्वात पसंतीचं पर्यटन सध्या कुठलं असेल तर ते ड्रीम क्रूझ! आशियातील सर्वांत मोठं क्रूझ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. असं इथे आहे तरी काय? भूलोकीवरच्या या नंदनवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष तिथेच जायला हवं.

Dream cruise, dream trip! | ड्रीम क्रूझ, स्वप्नवत सफर !

ड्रीम क्रूझ, स्वप्नवत सफर !

Next


- राहुल रनाळकर

सध्या सर्वाधिक चर्चेतलं पर्यटन म्हणजे क्रूझ पर्यटन. जगभरातील क्रूझमध्ये ड्रीम क्रूझचे नाव आघाडीवर आहे. हे क्रूझ आशियातील सर्वांत मोठं क्रूझ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हाँगकाँगस्थित असल्यानं चीन, मलेशियन, सिंगापूरच्या नागरिकांचे मोठेच्या मोठे तांडे या क्रूझवर मुक्कामी येतात. ड्रीम क्रूझवर विकेंड घालवणं म्हणजे एक भन्नाट अनुभव ठरतो. या क्रूझवर असं काय आहे, जे सर्वांना भुरळ पाडतं?
पर्यटकांच्या याच आकर्षणापोटी येत्या काही काळात मुंबईतही क्रूझ अवतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बीपीटीमध्ये उभारण्यात येणाºया क्रूझ टर्मिनलसाठी ३०० कोटींच्या गुंतवणुकीची पहिल्या टप्प्यात तयारी पूर्ण झाली आहे..
ड्रीम क्रूझवर जाण्यासाठी मुंबईतूनच आमची तयारी सुरू झाली होती. सोबत सामान किती असावं? कपडे कोणते कोणते असावे? अशा बारीकसारीक बाबी. बरं, त्यात हाँगकाँगच्या वातावरणाची नेमकी माहिती नाही. मग गुगल कामाला आलं. आदल्या दिवशीच ‘हॉट डे’ म्हटल्यावर पावसाच्या कपड्यांचा मुंबईतच त्याग केला. कॅथे पॅसेफिकची फ्लाइट रात्री एकची होती. प्रत्यक्ष प्रवासाची वेळ साधारण सहा तास असली तरी हाँगकाँग आपल्यापेक्षा अडीच तास पुढे असल्याने पोहोचलो तेव्हा तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळचे साडेनऊ वाजले होते.
हाँगकाँगचे विमानतळही भन्नाटच! या विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी आणि दूरवरच्या गेटपर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र मेट्रो तेथे धावते. विमानतळावरून बाहेर पडताच, एक ‘मे’ नामक हाँगकाँगस्थित महिला आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. ती आम्हाला एका छोट्या लक्झरी बसमध्ये घेऊन हाँगकाँग शहराकडे निघाली. तेथून सुरू झाला हाँगकाँग दर्शन सोहळा. मोठमोठे फ्लायओव्हर्स आणि गुळगुळीत रस्त्यांवरून एका संथ लयीत बस धावत होती. ‘मे’ने आम्हा पत्रकारांना हाँगकाँगची माहिती देणं सुरू केलं. हाँगकाँगला जायचं म्हणून आधीच ‘गुगल’ करून मिळवलेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती यात मोठा फरक होता. पण ‘मे’कडून मिळणारी माहिती शेवटी ‘फर्स्ट हॅण्ड’ होती!
१९९७ पर्यंत हाँगकाँग ब्रिटिश अधिपत्याखाली होते. पण त्यानंतर करारानुसार ही शहरे चीनकडे हस्तांतरित झाली. ‘वन स्टेट टू सिस्टिम्स’नुसार हाँगकाँगचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून चीनचे अधिपत्य हाँगकाँगने मान्य केले. हाँगकाँग विमानतळ ते क्रूझ टर्मिनल हे अंतर साधारण सव्वा ते दीड तासाचे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी होती, पण अवघ्या काही मिनिटांत ही कोंडी फुटत होती. या प्रवासात सर्वांत महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे हाँगकाँगचं कायझॅक बंदर. हे बंदर ३६५ दिवस २४ तास कार्यरत असतं. या बंदराला सुटी माहीतच नाही. चीनसाठीही हे बंदर अतिशय महत्त्वाचं. चीनच्या पूर्व समुद्रातून हाँगकाँगमार्गे त्यांचा सगळा माल भारतासह अन्य देशांकडे सतत जात असतो. त्यामुळे हे बंदर प्रचंड क्षमतेचे कंटेनर्स घेऊन सदासर्वकाळ तुडुंब भरून जणू वाहत असतं. हाँगकाँगला खास उभारण्यात आलेल्या क्रूझ टर्मिनलमध्ये आम्ही दाखल झालो. जगभरातील क्रूझ हाँगकाँगला येतात. त्यामुळे हाँगकाँगहून क्रूझवर ‘बोर्ड’ करणाºयांची संख्याही हजारोंच्या घरात असते. अतिशय अद्ययावत अशा या क्रूझ टर्मिनलची सफरही आश्चर्यचकित करणारी ठरते. क्रूझ समुद्रमार्गे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याने विमान प्रवासासाठी कागदपत्रांची करावी लागणारी पूर्तता क्रूझवर जातानाही करणं गरजेचं ठरतं. त्यात चेक इन, सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन या गोष्टी आपसूक येतात. हाँगकाँगच्या क्रूझ टर्मिनलवर सर्वांत वरच्या मजल्यावर भलं मोठ्ठं गार्डन बनवण्यात आलं आहे. समुद्राकडचा बहुतांश भाग काचेचा आहे. त्यामुळे ‘डॉक’ होणारी सर्वच क्रूझ, जहाजे टर्मिनलमधून अगदी सहज बघता येतात. ड्रीम क्रूझ ठरलेल्या वेळेत जेव्हा ‘डॉक’ होण्यासाठी आलं तेव्हा ते लांबून पाहूनच सगळे पर्यटक त्याच्या प्रेमात पडले. ड्रीम क्रूझ केवढे असेल? तर ते आहे तब्बल १८ मजली. या अवाढव्य क्रूझची क्षमता ३४०० पर्यटकांना सामावून घेण्याची आहे, क्रूझवर तब्बल दोन हजार कर्मचाºयांचा ताफा कार्यरत असतो. म्हणजे एकूण ५४०० लोकांना घेऊन हे क्रूझ समुद्र सफरीला निघते. या क्रूझचं वजन सुमारे १ लाख ५१ हजार ३०० टन एवढे आहे.
ड्रीम क्रूझवर गेलो तेव्हा पाच दिवस हे क्रूझ जपानला जाऊन आलेले होते. साधारण संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास क्रूझ टर्मिनलवर पोहोचल्यावर क्रूझमध्ये पोहोचायला सर्व कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत ७ वाजले. आत गेल्या गेल्या आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश केला की काय? असे वाटले.
क्रूझवरील प्रत्येक गोष्ट पाहायची झाली तरी किमान पाच दिवसांचा कालावधी हाती असणं गरजेचं आहे. पण प्रमुख गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी मग झुंबड उडते. ड्रीम क्रूझ आम्हाला घेऊन ‘हाय सी’कडे निघालं. साधारण ८ ते ९ तासांचा प्रवास करून ‘हाय-सी’च्या मधोमध ड्रीम क्रूझने नांगर टाकला. तेथे काही तास मुक्काम करून पुन्हा हाँगकाँगच्या दिशेनं ड्रीम क्रूझनं प्रवास केला. हा प्रवास संस्मरणीय ठरला तो या क्रूझवरील भन्नाट सोयीसुविधांमुळेच !

ड्रीम क्रूझचे मुंबई कनेक्शन !
ड्रीम क्रूझचा शुभारंभ मुंबईतून झाला आहे. जर्मनीच्या मेयर रेफ्ट शिपयार्डमध्ये या क्रूझची बांधणी झाली. १२ आॅक्टोबर २०१६ रोजी ते ड्रीम क्रूझच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर जिब्राल्टरची सामुद्रधुनी, मेडिटेरियन समुद्र, सुएझ कालवा पार करत ते मुंबईला पोहोचले. त्यानंतर या क्रूझचा रीतसर शुभारंभ झाला, तो मुंबईच्या समुद्रात. प्रवाशांना घेऊन या क्रूझचा पहिला प्रवास हाँगकाँगच्या दिशेने सुरू झाला तो मुंबईच्या साक्षीनेच!

ड्रीम क्रूझची वैशिष्ट्ये
९९९ सीट्स क्षमतेचे झोडियाक थिएटर
झूक बीच क्लब हे या क्रूझचे खास आकर्षण
खासगी पार्ट्यांसाठीही क्लब उपलब्ध
विशिष्ट दिवशी फटाक्यांची आतषबाजी
अत्याधुनिक जिम्नॅशियम
स्विमिंग पूल विथ जॅकुझी
वॉटर स्लाइड्स
अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स एरिया
मिनी गोल्फ क्लब
बास्केटबॉल ग्राउंड
क्लायबिंग वॉल

ड्रीम क्रूझ आकडेवारीत
पर्यटक क्षमता : ३४००
क्रूझचे वजन : १ लाख ५१ हजार ३०० टन
क्रूझची लांबी : ३३५ मीटर्स
क्रूझची रुंदी : ४० मीटर्स
डेक : १८
स्टोअर रुम्स : १ हजार ६७४
क्रू मेंबर्स : २ हजार १६

(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत rahul.ranalkar@lokmat.com)

Web Title: Dream cruise, dream trip!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.