केल्याने देशाटन

By admin | Published: July 10, 2016 09:50 AM2016-07-10T09:50:35+5:302016-07-10T09:51:49+5:30

जगातला पहिला प्रवास अन्नासाठीच झाला. पुढे शेती करून पोटभर पिकवल्यावर उरलेलं धान्य विकायला माणूस प्रवासाला निघाला. वास्को-द-गामाने मसाल्यांसाठी समुद्र ओलांडला, ह्यू-एन-त्संगने मूळ धर्मग्रंथांसाठी पर्वतांच्या खिंडींतून वाट काढली. धर्मयुद्धांतल्या सरदारांनी प्रतिस्पर्धी धर्माचा बीमोड करायला मोहिमा काढल्या. काही प्रवास अदृष्टाच्या कुतूहलापोटीही झाले

By doing so | केल्याने देशाटन

केल्याने देशाटन

Next
style="text-align: justify;">डॉ. उज्ज्वला दळवी
 
कशासाठी? पोटासाठी!’ 
जगातला पहिला प्रवास अन्नासाठीच झाला.
पशुपक्षी चाऱ्यासाठी दिशांतराला जातात. आदिमानवही तसाच अन्नासाठी देशोधडीला लागला, आफ्रिकेतून बाहेर पडला. 
आफ्रिकेतून बाहेर
पुढे शेती करून पोटभर पिकवल्यावर उरलेलं धान्य विकायला तो प्रवासाला निघाला. त्यानंतर ‘जे जिथे कमी तिथे पोचवायची हमी’ देत लोकरीचं कापड, रत्नं, कलाकुसरीच्या वस्तू अशा वैविध्यपूर्ण मालाची ने-आण करायला लागला. ग्रीस ते चीन रेशीमवाटांवरून तशा व्यापाऱ्यांचा प्रवास टप्प्याटप्प्यांचा होता, तर मेलुह्हा-मागन-दिल्मूनहून सुमेर-इजिप्तपर्यंतची सागरी सफर थेट अडीच हजार मैलांची होती. मेलुह्हाच्या व्यापाराचे खापर-शिक्के अजूनही त्याची साक्ष देतात. हर्कुफ नावाच्या इजिप्शियन व्यापाऱ्याने साडेचार हजार वर्षांपूर्वी चार लांब पल्ल्याच्या सफरी केल्या. त्यांचा लेखाजोखा आस्वानजवळच्या थडग्यात कोरलेला आहे. 
मसाल्यांसाठी ओलांडला समुद्र
वास्को-द-गामाने मसाल्यांसाठी समुद्र ओलांडला, तर ह्यू-एन-त्संगने मूळ धर्मग्रंथांसाठी पर्वतांच्या खिंडींतून वाट काढली. धर्मयुद्धांतल्या सरदारांनी प्रतिस्पर्धी धर्माचा बीमोड करायला मोहिमा काढल्या. ती सारी स्थलांतरं कुठल्यातरी हव्यासापोटी झाली. पण इतर काही प्रवासांत हरलेल्यांची, हताशांची वणवण झाली. दुष्काळ, पूर, भूकंप वगैरे नैसर्र्गिक आपत्तींनी गावंच्या गावं विस्थापित केली, तर संघर्ष, जुलूम, अन्याय वगैरे संकटांमुळे ज्यूंसारखे धर्म आणि जिप्सींसारख्या जमाती हद्दपार झाल्या. 
काही प्रवास केवळ अदृष्टाबद्दलच्या कुतूहलापोटी झाले. कधीही न पाहिलेल्या ठिकाणांची आंतरिक ओढ लागणं ही मानवाची खासियत आहे. जर्मन भाषेत त्याला ह्याी१ल्ल६ीँह्ण म्हणजे दूरदेशाबद्दलची हुरहुर असा चपखल शब्द आहे. नवलाई धुंडत जाणं हा मानवी स्वभावाचा स्थायिभाव आहे. पृथ्वीला ध्रुव आहे म्हणून आमुंडसेनला तो गाठायचा होता. डॉ. लिव्हिंग्स्टनला जिवात जीव असेतो पुढेच जात राहायचं होतं. कुठल्या ना कुठल्यातरी ध्यासाने झपाटून त्या उद्दिष्टाच्या शोधात घडलेली ती भटकंती होती. त्यांना मुक्कामाला पोचायची कसलीही घाई नव्हती. स्थळकाळाच्या मर्यादा महत्त्वाच्या नव्हत्या. 
कारण कुठलंही असो, त्या मार्गस्थांनी वाटचालीत अनुभवलेला प्रत्येक क्षण मोलाचा होता. घराची ऊब मागेच सोडून त्यांनी सामोऱ्या ठाकलेल्या नव्या स्थळांचे बारीकसारीक तपशील उत्कटतेने अनुभवले. ते त्या स्थळांना, तिथल्या परिस्थितीला, तिथल्या संकटांना, कसोट्यांना उराउरी भिडले. ते तो प्रवास जगले. प्रवासाला निघताना त्यांचे जगाबद्दल काही गैरसमज, पूर्वग्रह होते. त्यांना प्रवासात भेटलेल्या अनेक प्रकारच्या माणसांबरोबर त्यांनी माणुसकीच्या अनेक पैलूंची देवाणघेवाण केली. वाटेतले नवे समाज, रीतिरिवाज त्यांनी सामंजस्याने स्वीकारले. नव्या ठिकाणाबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा वगैरेंचं ओझं त्यांनी भिरकावून दिलं. त्याच्या बदल्यात मौल्यवान डोळस अनुभवांचं, ज्ञानाचं गाठोडं त्यांना लाभलं. 
भ्रमंतीत पाहिलेलं सारं त्यांच्या ध्यानात राहिलंच असं नाही. पण न दिसलेलं बरंच काही त्यांच्या लक्षात आलं. त्यातून ते पुष्कळ शिकले. जगाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. पाहिलेली स्थळं आणि तिथले अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य हिस्सा बनले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांची स्वत:ची ओळख पटली. जागोजागी फिरण्याचा प्रवास संपल्यानंतरही तो जाणिवेचा कायमस्वरूपी प्रवास चालूच राहिला. इबन-बतूता त्याच्या प्रवासाच्या अनुभवांनी प्रथम अवाक् झाला आणि मग तो त्यांच्याबद्दल बोलतच राहिला! त्या प्रवाशांत काही बढाईखोरही होते. त्यांच्या बढाया आणि खऱ्याखुऱ्या उत्तुंग साहसकथा यांच्यातला फरक ताडायची तंत्रंही इतिहासाच्या अभ्यासकांनी शोधून काढली. त्या अनुषंगाने त्या प्रवासांची अधिक ओळख पटली. 
बहुतेक प्रवासी स्वत: आमूलाग्र बदलले, तसंच त्यांनी वाटेतल्या स्थळांवरही आपलं शिक्कामोर्तब केलं. पुरातन काळापासून प्रवासामुळे इतिहास घडला. दूर पल्ल्याच्या वाहतूक रस्त्यांच्या दुतर्फा वस्ती झाली, नवी शहरं वसली, त्यांच्यात व्यापारउदीमासोबतच विचारांची, भाषांची, धर्मांचीही देवाणघेवाण झाली. जगाच्या दूरदूरच्या ठिकाणांना प्रवासाने मानवी तोंडवळा दिला आणि त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. ह्यू-एन-त्संग भारतात येऊन गेला म्हणूनच हर्षवर्धनाच्या वारसाला त्याची गादी मिळवून द्यायला चीनच्या सम्राटाचे दूत सरसावले. बौद्ध धर्म, इस्लाम यांचा प्रसार प्रवासामुळेच झाला. रोमन साम्राज्य टिकवून धरायला त्याच्या शासनकर्त्यांना रस्त्यांची गरज होती. रोमची भरभराट करणाऱ्या त्या राजरस्त्यांवरून प्रवाशांबरोबर आलेल्या प्लेगने ते साम्राज्य कोसळायलाही हातभार लावला. प्रवासामुळे जगाच्या राजकारणात, अर्थकारणात, धर्मकारणात अनेक वेळा, अनेक प्रकारची उलथापालथ झाली. 
साहित्य-कला-विज्ञान यांनाही प्रवासाने पुष्टी दिली. रेशीमवाटांवर बुद्धकलेला प्रोत्साहन मिळालं. दूर पल्ल्याच्या प्रवासासाठी चाक, सुकाणू, होकायंत्र वगैरे तंत्रज्ञानाचा विकास झाला. नाविकांना दिशा दाखवणारं खगोलशास्त्र विकसित झालं. नकाशांनी सगळं जग आखीव चौकटीत बसवलं. डार्विनच्या प्रवासामुळे उत्क्रांतीवाद जन्माला आला.
विसाव्या शतकात रेल्वे आणि विमानं आली, व्यावसायिक प्रवासाचा आवाका वाढला. त्याबरोबरच तरु ण मुलांमध्ये बॅकपॅकिंगचीही पद्धत आली. अनेकांना परदेशी समाज-संस्कृती वगैरेंची जवळून ओळख झाली. वेगवेगळ्या गावांत, प्रदेशांत, राष्ट्रांत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. जग जवळ आलं. मोठ्या प्रमाणावर झालेल्या भटकंतीमुळे सगळ्या जगात सांस्कृतिक घुसळण झाली. इटलीचा पिझ्झा, चीनचा शेझवान सॉस आणि अरबी फिलाफल हे पदार्थ भारतात पोचले, पुणेरी जिभांना भावले. हजार वर्षांपूर्वी भारतातून युरोपात पोचलेल्या जिप्सींचा फ्लॅमेन्को नाच आॅस्ट्रेलियात लोकप्रिय झाला. 
त्यानंतर अंतरिक्ष प्रवास सुरू झाला. त्याचे साथीदार असलेले मानवनिर्मित उपग्रह आंतरजाल, जीपीएस आणि दूरदर्शनवाटे घरादारात माहिती, मार्गदर्शन आणि मनोरंजन पुरवायला लागले. फ्लोरिडातल्या गोळीबाराची बातमी पाहून सिंगापूरकरांच्या डोळ्यांत आसवं आली. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व जगभरातल्या ‘कॉमन मॅन’च्या मनावर ठसलं. खगोलातून भूगोलदर्शन घडल्यामुळे आणि शिवाय पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच्या प्रवासाचे वेध लागल्यामुळे ‘भूतलावरचे ते सगळे आपले’ हे प्रकर्षाने जाणवलं.
अंतरिक्षातील टुरिझम
आता अंतरिक्षात टुरिझम सुरू होतो आहे. सध्यातरी तिथे समान धर्म, समाज, संस्कृती शोधणं शक्य नाही. पण कुणी सांगावं? पुढल्या काही शतकांत आपल्या अंतराळ भटक्यांना कुठल्यातरी दूरच्या ताऱ्यांजवळची, अनोख्या बुद्धिमंतांची वस्ती सापडेलही! मग ‘विश्वबंधुत्वाच्या दिशेने दौडणारं मानवी प्रवासाचं घोडं आकाशगंगेत न्हालं’ असं कृतकृत्यपणे म्हणता येईल! 
(समाप्त)
 
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
 
 
सर्वसामान्यांच्या आयुष्यातही प्रवासामुळे दूरगामी बदल घडले. मध्य आशियातल्या यामनायांनी ५००० वर्षांपूर्वी प्रवास केला म्हणून इण्डोयुरोपियन भाषांचा प्रसार झाला. बहुतेक त्यामुळेच आपण आज मराठी बोलतो. कोलंबसाने अमेरिका गाठली म्हणून आपण उपासासाठी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घातलेला रताळ्याचा कीस करतो आणि वर चार-पाच सहस्रकांपूर्वीच्या खलाशांनी भूमध्यसागरी देशांहून भारतात आणलेल्या जिऱ्याची फोडणी देतो. 
अठराव्या शतकात सुरू झालेला टुरिझम हा मुख्यत्वे अर्थकारण साधणारा प्रवास. म्हणून त्याला तुच्छ लेखलं गेलं. पण त्याच्यामुळेच अनेक ऐतिहासिक स्थळांचं स्थानमाहात्म्य वाढलं, त्यांना बरकत आली. तशा सहलींना जाण्यापूर्वी ज्या प्रवाशांनी तिथल्या इतिहास-भूगोलाचा, सामाजिक स्थितीचा, संस्कृतीचा थोडासा अभ्यास केला त्यांच्या मनात त्या स्थळांना, माणसांना कायमचं स्थान लाभलं. नवं, सलोख्याचं नातं निर्माण झालं.

Web Title: By doing so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.