अमिगा आणि अमिगो..

By admin | Published: July 10, 2016 09:42 AM2016-07-10T09:42:25+5:302016-07-10T09:43:56+5:30

ब्राझील हा देश मला वेगवेगळ्या रूपात भेटला. थंडगार नारळपाण्यापासून ते चिल्ड बिअरपर्यंत सगळे काही मनसोक्त पिता येणारी जागा म्हणजे इथले समुद्रकिनारे. अत्यंत सुडौल बांध्याचा जमाव, रुमालाएवढ्या बिकिनी घालून ऊन खात पडलेल्या स्रिया, तेवढेच देखणे पुरुष. मोठ्याने बोलणारे, हातवारे करणारे, स्वत:ची फिगर दाखविणारे, स्पर्शाची भाषा ओळखणारे प्रेमळ ब्राझीलिअन तिथे येणाऱ्या सगळ्यांना आपला संसर्ग लावूनच जातात.

Amiga and amigo .. | अमिगा आणि अमिगो..

अमिगा आणि अमिगो..

Next
style="text-align: justify;"> 
सुलक्षणा वऱ्हाडकर
 
ब्राझीलचा एकच गुणधर्म सांगा म्हटले तर चटकन आणि पटकन एक शब्द लक्षात येईल तो म्हणजे, इथले लोक ‘फेलीज’ असतात. म्हणजे खूश असतात. खिशात १० हियाएस असले तरी त्यांना कसली चिंता नसते.. भविष्यात काय होईल? नोकरी असेल का? आजारपणात काय करणार? पाऊस पडेल का? काही म्हणजे काही काळजी नाही. आला क्षण जगायचा तोही अतीव उत्साहाने. म्हणजे सरकारच्या विरोधात निदर्शनं करायला गेलेत तरी कोरिओग्राफी केलेले सामूहिक नृत्य शिकायचे. त्याचा सराव करायचा, घोषणा देताना रंगीत कपडे घालायचे आणि मग ठरावीक वेळेला आपली बियर किंवा आवडीचे ड्रिंक्स घेऊन समुद्रकिनारी सूर्याची उन्हे उघड्या अंगावर घेत आनंद घ्यायचा. सर्फिंग करायचे, बीच टेनिस खेळायचे, व्हॉलिबॉल खेळायचा. दोन खांबांना एक दोरी बांधून डोंबारी जसे त्यावर चालतात तसे चालायचे. सूर्यास्त झाला की टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करायचे. समुद्राच्या पाण्यावर, लाटांवर, सूर्यावर इतके प्रेम करणारे मी अजून तरी कुठे पाहिले नाही.
ब्रिक्समधील एक देश म्हणून आपल्याला ब्राझीलची ओळख आहे. मला हा ब्राझील गेल्या दोन वर्षांत खूप वेगळ्या रूपात भेटला. म्हणजे अगदी थंडगार नारळपाण्यापासून ते चिल्ड बियरपर्यंत सगळे काही समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त पिता येणारी जागा म्हणजे इथले किनारे. अत्यंत सुडौल बांधा असणारा जमाव, रुमालाएवढ्या किंवा त्याहून कमी धाग्यांमध्ये बनलेल्या बिकिनी घालून ऊन खात पडलेल्या सगळ्या स्तरातील स्रिया, तेवढेच देखणे पुरुष. जणूकाही जॉन अब्राहम किंवा सलमान खान, मिलिंद सोमण हेसुद्धा इथल्या गर्दीत ओळख हरवून बसतील इतके रुबाबदार पुरुष इथे पाहायला मिळतात. इथे मैत्रिणीला ‘अमिगा’ म्हटले जाते, तर मित्राला ‘अमिगो’.
ब्राझीलमध्ये जगणे खाण्याशी, पिण्याशी, खेळण्याशी आणि उत्सवाशी निगडित आहे. संगीत, फुटबॉल, नृत्य सगळे काही मनसोक्त. ‘पव द केजो’ म्हणजे चीजचे लहान लहान गरम पाव खाणे असो, हॉटडॉगवर किसलेल्या बटाट्याचा तळलेला कीस टाकून मक्याचे दाणे भुरभुरून त्याचे रूप प्रादेशिक देसी करणे असो, जून-जुलै महिन्यात रेन गॉड आणि काही संतांचा उत्सव साजरा करणे असो, त्यासाठी मक्याचे विविध पदार्थ बनविणे असो, खेड्यातील शेतकरी वर्गासारखे कपडे घालून पावसाचे आभार मानणे असो, रस्त्याच्या मधोमध सांबा करणे असो किंवा वाटले म्हणून लगेच तिथल्या तिथे उन्मुक्त चुंबन घेणे असो.. त्यासाठी पर्समध्ये एक टुथपेस्ट आणि ब्रश कायम बाळगणे असो..
स्वत:चे दिसणे इथे अत्यंत महत्त्वाचे होऊन जाते. सुरुवातीला यात स्वत:च्या प्रेमात पडण्यासारखे वाटेल. पण हळूहळू ही फिलॉसॉपीसुद्धा आवडायला लागते. केसांना रंग देणे म्हणजे पांढरे केस दिसायला नको असे नाही, तर केव्हाही मनात आले की रंग द्यायचा, दिवसातून तीन वेळेस अंघोळ. रिओमध्ये सगळे जण दिवसातून तीन वेळेस अंघोळ करतात. अगदी गरीब वर्गसुद्धा. इथे समुद्रकिनाऱ्यावर जागोजागी शॉवर्स ठेवलेले आहेत. त्याला पैसे लागत नाहीत.
देखणी, टंच फिगर असलेली आई, बाई जेव्हा तिच्या मुलांचा वाढदिवस साजरा करते तेव्हा स्वत:सुद्धा लहान मुलगी बनून जाते. पार्टी हॉल बुक करून, एखादी थीम शोधून असंख्य पदार्थ बनवून, रंगीबेरंगी कार्निवलसारखे वातावरण बनवून, यच्चयावत सगळ्या मित्रमैत्रिणींना आमंत्रणे धाडून (यात घरात जितके जण राहतात त्यांचे सगळ्यांचे मित्र सामील असतात.) धूमधडाक्यात साजरा करते. आणि अगदीच वेळ नसेल तर सगळ्यांना हॉटेलमध्ये बोलावून साजरा केला जातो. इथे वाढदिवसाला हॉटेलमध्ये गेल्यास ज्याने त्याने आपला खर्च करण्याची रीत आहे. तरीही सगळे जण आपले बिल देऊन खूप आनंदाने मज्जा करतात. काही हॉटेल्समध्ये ज्याचा वाढदिवस असतो त्याला सर्व जेवण मोफत असते.
ब्राझीलिअन आईचे मुलांवरील प्रेम इतकेच मर्यादित नसते, तर मुले जर पिकनिकला जाणार असतील तर ही आई त्यांच्या बॅगपॅकमध्ये थंडीसाठी म्हणून गुपचूप एखादे जॅकेट ठेवून देते. हीच आई फुटबॉल सामने असताना तिच्या आवडीच्या टीमची जर्सी घालून, संघाचा झेंडा घेऊन मुलांशी भांडताना दिसते की त्यांची टीम तिच्या टीमपेक्षा खराब खेळते.
आपल्या मुलांनी, मुलींनी घरकोंबडे होण्यापेक्षा बाहेर जाऊन खेळावे मग ते स्विमिंग पूलमध्ये जाणे असो वा समुद्रकिनारी.. तिच्यासाठी मुलांनी मैदानी खेळ खेळले तरच ती मुले त्यांचे बालपण, तरुणपण एन्जॉय करतील. घरात टीव्ही पाहणारी, सतत मोबाइल वापरणारी ब्राझीलिअन मुले म्हणून इथे कमी दिसतात.
इथे सगळ्यांना कुत्रे, मांजरी खूप आवडतात.. म्हणजे मुलांच्या प्ले डेट्स असतात तशाच कुत्र्यांच्यासुद्धा असतात. माझ्या एका मैत्रिणीला आमच्या घरी असलेले आकिचान हे कुत्र्याचे पिलू आवडले तर ती एकदा आठवड्यासाठी त्याला तिच्या घरी घेऊन गेली होती.. कुत्र्यांसाठीचे स्पेशल पार्क्स, मांजरींसाठी स्पेशल घरे रस्त्याच्या बाजूला, पार्कमध्ये हमखास दिसतातच.
मुलांची काळजी करणे, त्यांच्यासाठी खूप प्रकारचे केक बेक करणे, पारंपरिक रेसिपी वापरून स्वयंपाक करणे, मुलांच्या आजारपणात स्वत: नर्स बनून वाहून घेणे हे सर्व करताना आणखी एक एक काम या स्त्रिया करतात ते म्हणजे सोशल नेटवर्किंग. इथे सर्वसाधारण ब्राझीलिअन आईसुद्धा सगळ्या सोशल साइट्स नियमित वापरते. म्हणजे ती इन्स्ट्राग्रामवर असेल, पिनटे्रस्टवर असेल, फेसबुकवर असेल, स्नॅपचॅट, ट्विटर सगळीकडे तिचा मुक्त वावर असतो. ती सतत खूप फोटो अपलोड करते. तुम्ही भाजी घेताना तिला भेटलात आणि हाय हॅलो झाले की लगेचच तिथेच ती तुम्हाला फेसबुकवर जॉईन करते किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही तिच्या घरी ‘काफेझिनो’साठी निमंत्रित असता. तिथे टेबल भरून ब्रेकफास्ट फक्त तुमच्यासाठी मांडलेला असतो.
‘गमबियाहा’ ही रीत मला इथेच समजली. म्हणजे तुमची एखादी समस्या असेल. उदाहरणार्थ किचनमध्ये नळाला पाणी येत नाही आहे. तुम्हाला प्लंबरची आवशक्यता आहे. तुम्ही हे जर तुमच्या शेजाऱ्यांना सांगितले तर ते तुम्हाला सोसायटीच्या आॅफिसमध्ये घेऊन जातील, तिथे तुमची समस्या समजावून देतील. मग पुन्हा तुमच्या घरी येतील. स्वत: परिस्थिती पाहतील. नळाला तपासले जाईल. गुगलवर सर्च करून त्याचे उत्तर शोधण्यात येईल. दहा फोन होतील. जोपर्यंत प्लंबर येत नाही तोपर्यंत ते तुमच्या सोबत राहतील. आणि ती समस्या स्वत:च सोडवून देतील. चेहऱ्यावर तो आनंद घेऊन घरी जातील.
पहिल्या भेटीत खूप मिठ्या मारणारे आणि गालाला गाल लावून दोनदा सिम्बोलिक कीस करणारे इथे रोजच दिसतात. म्हणजे यासाठी पेज थ्री वरील सेलिब्रिटी असण्याची गरज नाही.
कोणताही अवर हप्पी अवर असल्यासारखे वागणारे ब्राझीलिअन तुम्हाला प्रेमात पाडतात हेच खरे. खूप मोठ्याने बोलणारे, हातवारे करणारे, स्वत:ची फिगर दाखविणारे, स्पर्शाची भाषा ओळखणारे प्रेमळ ब्राझीलिअन लोक त्यांचा संसर्ग इथे येणाऱ्या सगळ्यांना लावून जातात, हे खरंय.
 
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
 
ब्राझीलिअन आईला पर्सनल स्वच्छतेची प्रचंड आवड आहे. उन्हाळ्यात ती चारदा अंघोळ करतेच, पण मुलांनासुद्धा अंघोळ करायला भाग पाडते.कमी किंवा जेमतेम कपडे घालणे इथल्या स्त्री-पुरुष दोन्ही वर्गाला खूप आवडते. म्हणजे अगदी आॅफिसमध्ये वकील म्हणून काम करणारी किंवा डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करणारी स्त्रीसुद्धा घट्ट कपडे घालून आत्मविश्वासाने वावरते. स्वत:च्या फिगरसाठी न चुकता वर्कआउट करते, तेव्हा त्यांचे कौतुकच वाटते. बरे हे करताना नवरा, मुलगा, वीकेण्डचे प्लॅन्स, घराचे हप्ते हे सर्व डोक्यात असतेच.

Web Title: Amiga and amigo ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.