'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:44 AM2018-10-29T00:44:06+5:302018-10-29T00:44:29+5:30

ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांचा सवाल

Why not in Maharashtra for a Marathi language? | 'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?'

'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?'

ठाणे : विविध जातींचे मोर्चे नेहमीच निघतात. परंतु, महाराष्ट्रात राहून मराठी भाषेसाठी मोर्चे का निघत नाहीत, असा सवाल करत ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांनी केला. बारावीपर्यंत मराठीची सक्ती करण्याचा धोशा धरला तरच मराठी जगेल आणि टिकेलही, असे मत त्यांनी ठाण्यात व्यक्त केले.

चारशेव्या अभिनय कट्ट्यावर डॉ. वाड यांच्या हस्ते आशा राजदेरकर लिखित ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या विनोदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी कट्ट्याचे संचालक किरण नाकती उपस्थित होते. डॉ. वाड म्हणाल्या की, विनोदी लिखाण हे अवघड आहे. लोकांना रडवणे सोपे असले, तरी हसवणे मात्र कठीण आहे, असेही त्या म्हणाल्या. ठाण्यात सुरू असलेल्या अभिनय कट्ट्याबद्दल त्यांनी ठाणेकरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी पाहून ठाणेकरांचे आणि अभिनय कट्ट्याचे त्यांनी कौतुक केले. ‘आनंदाच्या वाटेवरती’ ही कविता त्यांनी यावेळी सादर केली. डॉ. वाड यांनी साहित्य जगायला शिकवले, असे सांगत नाकती यांनी साहित्य जगले आणि जपले पाहिजे, असा सल्ला सर्वांना दिला. माधुरी कोळी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

व्यासंगाचे रूपांतर व्यसनात होऊ नये : पुरुषोत्तम बेर्डे
सोशल मीडिया ही काळाची गरज असली, तरी त्यात किती रमावे, हे आपल्या हातात आहे. व्यासंगाचे रूपांतर व्यसनात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रागाच्या भरात एखाद्या गोष्टीपासून आपण तुटतो, तेव्हा नवीन गोष्टींना मुकतो, असे मत दिग्दर्शक, लेखक, निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केले.

‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाविषयी सांगताना ते म्हणाले की, या चित्रपटात दाखवलेल्या दहीहंडी उत्सवात प्रामाणिकपणा आहे. या उत्सवाचा मुख्य उद्देश समोर ठेवून आम्ही लहानपणी तो उत्सव साजरा केला. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांत या उत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मूळ हेतू हरवला असून, हा उत्सव जीवघेणा झाला आहे, असे परखड मत पुरूषोत्तम बेर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

सिनेमाचा खरा आनंद सिनेमागृहातच असतो. तो आनंद मी लहानपणापासून अनुभवत आहे. पहिला सिनेमा मी मला हवा तसा केला आणि तो प्रेक्षकांनी उचलून धरला. अभिनय कट्ट्याचे कलात्मक स्वरूप बघून मी भारावून गेलो. कट्टा ही ठाणेकरांसाठी पर्वणी आहे, अशा शब्दांत त्यांनी कट्ट्याचे कौतुक केले. पालकांनी मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी दिला. ही मुलाखत सुषमा रेगे यांनी घेतली.

कट्ट्याने घेतली सर्वप्रथम दखल : जयंत सावरकर
ठाणे : ठाण्यात आल्यावर माझी पहिली दखल किरण नाकती आणि त्यांच्या अभिनय कट्ट्याने घेतली. इथे आल्यावर कळले की, आपला प्रेक्षकवर्ग ठाण्यातही आहे. अभिनय कट्टा आमच्या उमेदीच्या काळात असता, तर आणखी प्रगती झाली असती, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी व्यक्त केल्या.
रविवारी सकाळी अभिनय कट्ट्याच्या चारशेव्या विक्रमी कट्ट्याचे उद्घाटन सावरकर यांच्या हस्ते व कट्ट्याचे संचालक, दिग्दर्शक किरण नाकती, कट्ट्याचे ज्येष्ठ कलाकार राजन मयेकर, फुलपाखरूफेम आशीष जोशी, विठू माऊली मालिकेतील बालकलाकार श्रेयस साळुंखे यांच्या उपस्थितीत झाले.
माझ्या अभिनयाची सुरुवात एकांकिका पाहण्यापासून झाली. नाटकात काम करणे, हा व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग आहे. अभिनय कट्ट्यावर येऊन एकांकिका पाहायला आवडेल. अभिनय करून आनंद घेणे आणि त्या आनंदाची देवाणघेवाण करणे अभिनय कट्ट्यावर शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Why not in Maharashtra for a Marathi language?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.