मुंबई : मराठवाड्यातील प्रश्नांसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे सरकार नुसते आश्वासन देत आहे. तुम्हाला या भागाशी आस्था आहे की नाही, असा सवाल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.
गेल्या वर्षभरात मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणांचे काय झाले, अशी विचारणाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
२०१६मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठवाड्याचा विकास आराखडा तयार असल्याचे व त्यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक निर्णयही जाहीर केले होते. मात्र या नुसत्या कागदावरच्या घोषणा ठरल्या आहेत. प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. मराठवाड्यासाठी एक रुपयाचाही अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकला नाही; परिणामी राज्य शासन मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठवाडा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमातही आपण बैठक घेण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला होता. मग आता बैठक घेण्यास टाळाटाळ का करता, असा सवालही मुंडे यांनी पत्रकात केला आहे.