"नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:08 AM2024-01-06T10:08:51+5:302024-01-06T10:09:15+5:30

Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar Over waghnakh | "नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल

"नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं भारतात आणण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली होती. मात्र त्यानंतर अनेक दिवस झाले असले तरी वाघनखं अद्याप महाराष्ट्रात आलेली नाहीत. यावरून आता काँग्रेसने खोचक सवाल विचारला आहे. "नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"वर्ष संपले, 2024 उजाडले.. आता जानेवारी पण हुकले! वाघनखं काही आली नाही... आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते."

"त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, तो महिना गेला..... वर्ष संपले, 2024 उजाडले.. आता जानेवारी पण हुकले! वाघनखं काही आली नाही... आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार?" असं विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवस्पर्श झालेली ही वाघनखं नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. 

ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे. लंडन येथे ढोल आणि ताशांच्या निनादात आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या जयघोषात अतिशय स्फूर्तिदायक वातावरणात वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर काही दिवसांपूर्वी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांनी स्वाक्षरी केली होती. 
 

Web Title: Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar Over waghnakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.