पुणे : भारतामध्ये दर वर्षी जवळपास १ टक्के लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो. जर २०२० पर्यंत ही परिस्थिती बदलली नाही, तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा १३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
धूम्रपान जगभरामध्ये मानवी आरोग्याला असणाऱ्या महत्त्वाच्या धोक्यांपैकी एक असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सिगारेट, सिगार व तंबाखूची इतर उत्पादने धोकादायक व व्यसन लावणारी असतात. तंबाखूमधील निकोटिन हा घटक मेंदूतल्या रसायनांची पातळी वाढवतो व त्याचे व्यसन लावतो.
तंबाखूसेवन करणारे लोक हे त्यांच्या आरोग्याबरोबर दुसऱ्यांचे आरोग्य धोक्यात टाकतात. सुमारे २७ टक्के युवक सिगारेटच्या धुराचा त्रास घरी सहन करतात व ४० टक्के युवक धुराचा त्रास हा सार्वजनिक जागेमध्ये सहन करतात.
एका सर्वेक्षणानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येतील २२७ दशलक्ष लोक तंबाखूचं सेवन करतात. यामध्ये ४७ टक्के पुरुष, २० टक्के महिला व १२ टक्के युवकांचा समावेश आहे.
त्यामुळे अशाप्रकारच्या समस्येला सामोरे जायचे नसेल, तर सिगारेटचे व्यसन सोडणे गरजेचे आहे. सिगारेट सोडणे हा एका दिवसाचा चमत्कार नसून त्यासाठी सातत्याने चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
याबाबत डॉ. तुषार पाटील म्हणाले, की मेग्नेशियमकार्बोनेट हा तंबाखूमधील सर्वांत हानीकारक घटक आहे. त्यामुळे कर्करोग व तंबाखूशी संबंधित रोगांशी लढण्यासाठी जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत.
डॉ. बर्नार्ड फॅदम म्हणाले, की कर्करोगानंतर किडनीचे आजार, दातांचे आजार, वंधत्वदेखील तंबाखूसेवनामुळे येऊ शकते.
तंबाखूच्या सेवनाने श्वसननलिकेत बिघाड होऊन, कफ, अशक्तपणा, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे असेही आजार होऊ शकतात. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये दीर्घकालीन रक्तदाबाचे विकार, अल्सर तसेच दातांच्या आजारांचा समावेश आहे. तसेच विशिष्ट कालावधीनंतर निकोटिन न मिळाल्यामुळे नैराश्य, वजन वाढणे, अस्वस्थता, निद्रानाश, तसेच तंबाखूसाठी तीव्र इच्छा होण्याचे प्रमाण वाढणे अशा समस्या जाणवतात. तंबाखूमुळे श्वसनसंस्था, मेंदू, हृदय, तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतात.
पुण्यातील एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सिगारेटमुळे सीओपीडी या आजाराचा धोका सर्वाधिक आहे. सीओपीडी हे महाराष्ट्रातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे. याबरोबरच महिलांमध्ये वाढत असलेल्या वंध्यत्वाच्या समस्येलाही तंबाखू हे एक मोठे कारण असल्याचे या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून समजते.
सिगारेट ओढणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वांत प्रमुख कारण आहे. एका वर्षात तंबाखूमुळे कर्करोग होणाऱ्या ३० ते ५० वयोगटातील १५० हून अधिक रुग्णांवर उपचार करावे लागतात, ही खेदाची बाब आहे.
- डॉ. विनोद गोरे, कर्करोग शस्त्रक्रियातज्ज्ञ


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.