वाघाचे कातडे, नख्या जप्त

By admin | Published: August 27, 2015 11:11 PM2015-08-27T23:11:01+5:302015-08-27T23:11:01+5:30

पेठनाक्यावर कारवाई : टोळी जेरबंद; साडेबारा लाखांचा माल हस्तगत

The tiger's cloth, cloth seized | वाघाचे कातडे, नख्या जप्त

वाघाचे कातडे, नख्या जप्त

Next

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ पट्टेरी जातीच्या वाघाचे कातडे आणि वाघनख्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या पाचजणांच्या टोळीच्या मुसक्या गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ही कारवाई झाली.
पथकाने ५ लाख ७0 हजार रुपये किमतीच्या वाघाच्या कातड्यासह वाघनखे, मोटार, दोन दुचाकी, पाच मोबाईल हँडसेट असा एकूण १२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत केला.
ओंकार राजाराम सावंत-पाटील (वय २0), दीपक विश्वास पाटील (२0), प्रदीप विठ्ठल पाटील (२१, तिघे रा. सोंडोली, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), महेंद्र वसंतराव पाटील (४५, रा. खेड-शिराळा, जि. सांगली) व सुहास निवृत्ती जाधव (२८, रा. चिंचोली-शिराळा, जि. सांगली) अशी ताब्यात घेतलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. या सर्वांना अधिक तपासासाठी वन विभागाच्या ताब्यात वर्ग करण्यात आले आहे. या सर्वांविरुध्द वन्यजीव हत्या प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला जाईल, असे वन विभागाचे वनक्षेत्रपाल टी. बी. मुळीक यांनी सांगितले.
याबाबत गुन्हे अन्वेषणच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी व अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी घरफोडी, चोरी, जबरी चोरी अशा प्रकारच्या जिल्ह्यात होणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, पथकासमवेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना पेठ येथे पाचजणांचे टोळके संशयास्पदपणे वावरत असल्याची माहिती मिळाली. पाटील यांनी घटनेची वरिष्ठांना माहिती देत, पेठ येथील उड्डाण पुलाजवळ टेहळणी केल्यावर, एक मोटार आणि दोन दुचाकींवरून हे पाचजण आल्याचे दिसून आले. पथकाने या टोळीला जेरबंद करीत त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे पिशवीत लपवून ठेवलेले तीन ते साडेतीन फूट लांबीचे पट्टेरी वाघाचे कातडे, तसेच वाघनख्या सापडल्या.
या कारवाईनंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील या टोळीला पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडील मोटार व दुचाकी, पाच मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. वन्यप्राण्यांची तस्करी करणारी ही टोळी जेरबंद झाल्याने, वन्यजीवांच्या हत्या होत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. (वार्ताहर)

न्यायालयात नेणार
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या या कारवाईनंतर आता या वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. शुक्रवारी या सर्वांना इस्लामपूरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्यासह हवालदार अशोक डगळे, बिरोबा नरळे, विशाल भिसे, संदीप मोरे, संदीप गुरव, चेतन महाजन यांनी या कारवाईत भाग घेतला.

Web Title: The tiger's cloth, cloth seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.